प्रशांत ननावरे

हिमालयाचं नाव घेतलं की सर्वप्रथम शिमला आणि कुल्लू-मनाली हीच नावं डोक्यात येतात. पण डोंगरराजीनं नटलेल्या या सुंदर प्रदेशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांची आत्ता कुठे वाच्यता होऊ लागली आहे. यापैकीच एक ठिकाण म्हणजे कसोल. पार्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे छोटंसं गाव आता हळूहळू पर्यटकांच्या नकाशावर येऊ  लागलं आहे. कुल्लूपासून ४० किलोमीटर अंतरावरील कसोल भुंतर-मणिकर्ण या रस्त्यावर आहे. येथे जाण्याचा सर्वात योग्य काळ म्हणजे मार्च ते मे महिना. खीर गंगा, मलाना, द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क येथे ट्रेकिंगला जायचं असेल तर कसोल ही मुक्कामासाठी योग्य जागा आहे.

कसोलला भारताचं मिनी इस्रायल म्हटलं जातं. विविध कारणांसाठी मोठय़ा प्रमाणात इस्रायली लोक इथे आली आणि इथल्या सौंदर्याला भुलून इथेच स्थायिक झाली. असं म्हणतात, कसोलमध्ये येणाऱ्या एकूण पर्यटकांच्या ७० टक्के पर्यटक हे इस्रायली असतात. त्यामुळेच त्यांची खाद्यसंस्कृतीही इथे चांगलीच रुजली आहे. हमुस, फलाफल हे पदार्थ तुम्हाला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये मिळतात. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे पदार्थ अतिशय लज्जतदार असतात. प्रत्येक पदार्थासोबत सलाड आणि फ्रेंच फ्राइज दिले जातात, हे विशेष. त्याव्यतिरिक्त जागोजागी इटालियन आणि जर्मन पदार्थही मिळतात. जर्मन बेकरीच्या अनेक शाखा इथे आहेत. इथले वेगवेगळ्या चवीचे ताजे केक अतिशय प्रसिद्ध आहेत. भारतीय पदार्थामध्ये पराठे आणि पंजाबी पद्धतीचे पदार्थ मोठय़ा प्रमाणात खाल्ले जातात. बाकी मॅगी बनवून देणारे स्टॉल्स जागोजागी दिसतात.