राजेंद्र श्रीकृष्ण भट

आपण अनेक प्रकारच्या अनावश्यक वस्तू विकत घेतो. काही दिवसांनी त्या अडगळीत जातात. वस्तूच नव्हे तर अन्न, कृती, विचार अशा सर्वच बाबींची आपण अनावश्यक गर्दी करून ठेवतो आणि अनेक समस्यांना आमंत्रण देतो. अन्नाचेच उदाहरण घेतल्यास, आपण दिवसातून अनेक वेळा खात असतो. त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात. आवश्यक तेवढाच आहार घेतल्यास प्रकृती उत्तम राहते.

घरात आपण अनेक अन्नपदार्थ वापरतो. पण त्यातील काही टक्के भाग वाया जातो. अन्न शिल्लक राहात असेल, तर त्याचे प्रमुख कारणे म्हणजे, घरातील माणसांच्या प्रमाणात अन्न न शिजवणे, अन्न चविष्ट नसणे आणि घरातील व्यक्तींनी बाहेरून खाऊन येणे.

अन्नासाठी आपण आपले पैसे खर्च करत असलो, तरीही ती राष्ट्राची संपत्ती आहे. अन्न तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी वापरले जाते. त्याला पाण्याच्या फुटप्रिंट्स म्हटले जाते. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो, त्या सर्वाचे फुटप्रिंट्स जगभरातील अभ्यासकांनी तपासले आहेत. त्याची माहिती आपण पुढील एखाद्या लेखात घेऊ.

अपव्यय रोखून शाश्वत विकास साधण्यासाठी चार आरचे सूत्र अवलंबणे आवश्यक आहे. रिफ्युज-एखादी उपभोगाची वस्तू वापरणे नाकारणे, रिडय़ुस-नाकारता येत नसेल, तर त्या वस्तूचा वापर कमी करणे, रीयुज-पुनर्वापर, रीसायकल-त्या गोष्टीचे विघटन करून नवी गोष्ट तयार करणे. अशा प्रकारे आपण राष्ट्राची संपत्ती वाचवू शकतो.