13 December 2019

News Flash

स्तनपानासंबंधी गैरसमज

भरलेल्या स्तनातून दूध येताना सुरुवातीचे दूध अधिक पाणी आणि प्रथिनयुक्त असते.

डॉ. तेजश्री तहसिलदार, स्त्रीरोगतज्ज्ञ

स्त्री गर्भवती राहिली की सुदृढ बाळ होण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बाळाचा जन्म होईपर्यंत विविध पोषणतत्त्वे पुरवली जातात. मात्र बाळाचा जन्म झाल्यावर स्तनपानाबद्दलच्या मूलभूत ज्ञानाबद्दल स्त्रिया अनभिज्ञ असतात. सोपा उपाय म्हणून पावडरचे दूध देऊन बरेच जण मोकळे होतात. स्तनपानासंबधीचे समज-गैरसमज आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात समजून घेऊ.

* बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत येणारा चीक म्हणजे साठलेले खराब दूध असते, त्यास फेकून द्यावे?

सुरुवातीच्या दिवसांत स्तनातून स्रवले जाणारे घट्ट दूध म्हणजे कोलोस्ट्रम किंवा दूधचीक. या दूध चीकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चिकाचे सेवन म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण. कारण या चिकात रोगप्रतिकारक क्षमतेचे घटक म्हणजे इमोनो ग्लोबलिन्स तसेच लढाऊ पेशी असतात. अ जीवनसत्त्व, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांचे प्रमाण अधिक असते. हा चीक आतडय़ांना लेपला जातो त्यातून एसआयक्यूए (इमोनो ग्लोबलिन्सचा एक प्रकार) आतील बाजूस पसरला जातो आणि आतडय़ांचे विकार टळतात. थोडक्यात आयुष्याची संजीवनी या चिकात एकवटलेली असते. त्यामुळे आग्रहाने सोलोस्ट्रम बाळाला द्यावेच.

* आईला सुरुवातीच्या दोन दिवसांत खूपच कमी दूध असते. त्यात सिझर झाले असेल तर आईला दूधच येत नाही. त्यामुळे वरचे दूध द्यावेच लागते?

जन्मावेळी बाळाच्या पोटाचे आकारमान केवळ पाच-सात मिलिलीटर असते. तिसऱ्या दिवसाला ते २०-२५ मिली असते. आईला येणारा चीक हा एवढय़ा छोटय़ा पोटाच्या आकारमानास अनुसरून येतो आणि तो पुरेसा असतो. आईला दूध येण्याची प्रक्रिया ही बाळ आईच्या छातीस ठेवल्याने आणि बाळाने स्तनाग्रांना संवेदना दिल्याने होते. म्हणूनच जन्मानंतर बाळ आईच्या उबेसाठी द्यावे (स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट) आणि लवकरात लवकर दूध पाजण्यास प्रोत्साहित करावे.

बऱ्याचदा सिझर झाल्यानंतर आई रिकव्हरी रूममध्ये आणि बाळ नातेवाईकांसोबत असते. त्यामुळे दूधनिर्मितीसाठी ज्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचून आंतस्राव स्रवले जायला हवे, त्यास उशीर होतो आणि परिणामी सिझर झालेल्या मुलींना दूध उशिराने येते. पण हे टाळता येऊ शकते.

* प्रसूती किंवा सिझरनंतर आईला विश्रांती मिळावी म्हणून बाळाला आईपासून लांब ठेवावे?

आईच्या उबेशी बाळ असल्यास बाळाची हृदयगती, श्वासोच्छ्वास आणि तापमान लवकरात लवकर नियंत्रित होते. यशस्वी स्तनपानाचे मूळ म्हणजे लवकरात लवकर म्हणजे शक्यतो एका तासाच्या आत स्तनपानाला सुरुवात आणि जास्तीत जास्त वेळ आईच्या उबेशी बाळ असणे (स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट). त्यामुळे बाळ जेवढे जास्त वेळ आईसोबत असेल, तेवढे लवकर दूधनिर्मितीसाठी मदत होते.

*आईच्या दुधापेक्षा गाईचे दूध शक्तिशाली असते?

गाईच्या दुधामध्ये प्रथिने, खनिजे, सोडियम यांचे प्रमाण आईच्या दुधाच्या तुलनेने अवाजवी आहेत. हे प्रमाण मूत्रपिंड तसेच आतडय़ांना झेपावणारे नसते. गाय आणि म्हशीच्या दुधात केसिन नावाची प्रथिने असतात. तर आईच्या दुधात व्हे नावाची प्रथिने असतात. रोगप्रतिकारक्षमतेचे घटकदेखील आईच्या दुधाच्या तुलनेने केवळ निव्वळच. बुद्धय़ांक वाढीसाठी लागणारे घटक आईच्या दुधातच असते. गाईच्या दुधातील प्रथिनांची काही बाळांना अ‍ॅलर्जीसुद्धा असते. ज्यामुळे अंगावर चट्टे उठणे, आतडय़ांना इजा होऊन जुलाब होणे, उलटी होणे असे त्रास होऊ शकतात.

* स्तनाग्रे बाहेर नसल्यास बाळाला दूध पिताच येणार नाही?

बाळ स्तनपान करताना केवळ स्तनाग्रेच पकडत नाही तर त्या भोवतालच्या काळ्या भागापर्यंत पकड घेते. बाळास ही योग्य पकड घेऊन ओढेपर्यंत थोडा वेळ लागू शकतो. स्तनांची पकड अगदी योग्य असेल तर ओढण्याच्या प्रक्रियेतून स्तनाग्रे बाहेर ओढली जातात आणि पुढे न दुखता यशस्वी स्तनपान करता येते.

* आईला ताप आल्यास येणारे दूध दूषित आणि संसर्गित होते. त्यामुळे तापात बाळास पाजू नये?

आईला ताप आल्यास त्या जंतुसंसर्गाच्या विरोधात रोगप्रतिकारक घटक रक्तात स्रवले जातात. या इम्युनोग्लोब्युलिन्समुळे बाळाचे त्या जंतूसंसर्गापासून रक्षण होते. तापात आईचे दूध दूषित होत नाही तर त्याची गुणवत्ता वाढते.

* ज्या स्त्रीच्या छातीचा आकार लहान आहे, त्या स्त्रीमध्ये कमी दूध तयार होते?

स्तनाच्या रचनेत दोन भाग असतात. एक म्हणजे दुग्धग्रंथींचा भाग तर दुसरा या भागास आधार देणारा चरबीचा भाग. स्तन मोठे असेल तर त्यात चरबीचा भाग वाढलेला असतो. दुग्धग्रंथी मात्र सारख्याच असतात. दूध तयार होणे छातीच्या आकारावर अवलंबून नसून स्तनांच्या जास्तीत जास्त मिळणाऱ्या उत्तेजनांवर अवलंबून असते. जितक्या जास्त वेळेस बाळ दूध पिऊन स्तनांना उत्तेजित करणार तितक्या जास्त प्रमाणात दूध तयार होणार.

*स्तनपान करताना एका वेळी दोन्ही छातींचे दूध थोडे थोडे द्यावे. कारण एका छातीत पाणी आणि दुसऱ्या छातीत दूध असते?

भरलेल्या स्तनातून दूध येताना सुरुवातीचे दूध अधिक पाणी आणि प्रथिनयुक्त असते. तर नंतरचे दूध स्निग्धपदार्थानी युक्त  असते. बाळाच्या सर्वागीण वाढीसाठी दोन्ही घटक मिळाले पाहिजे. यासाठी एका वेळी एका स्तनानेच पाजावे. एका स्तनाचे थोडे आणि लगेच दुसऱ्या स्तनाचे दूध दिल्याने बाळाला फक्त सुरुवातीचे दूध मिळते. त्याने बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढणार नाही.

* प्रसूती झालेल्या स्त्रीने पाणी जास्त पिऊ नये. त्यामुळे दूध पातळ होते?

आईच्या स्तनातून दिवसाला साधारण ७५०-९०० मिलीपर्यंत दूध तयार होते. या दूधनिर्मितीसाठी शरीरात पाण्याचे प्रमाण मुबलक असावे लागते. त्यामुळे आईने पुरेसे पाणी प्यायला हवे. आईने प्यायलेले दूध त्वरित दुधात उतरत नाही. रक्तात शोषले जाऊन दूधनिर्मितीच्या प्रक्रियेत उपयोगी ठरते.

* पावडरचे दूध आईच्या दुधापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे?

– आईचे दुधातील घटक बाळाच्या वाढत्या वयासोबत अगदी जन्मापासून वाढीच्या प्रत्येक टप्प्यासोबत बाळास सर्वोत्तम पोषण मिळण्याच्या दृष्टीने बदलत जातात. पावडरचे दूध मात्र कृत्रिमरीत्या बनवलेले असते. मेंदूच्या वाढीसाठी असणारे डीएचए, फ्री फॅटी अ‍ॅसिड, अ‍ॅलर्जीविरोधक घटक

पावडरच्या दुधात नसतात. आईचे दूध प्यायलेल्या बाळांचा बुद्धय़ांक पावडरचे दूध पिणाऱ्या बाळापेक्षा जास्त असतो.

First Published on August 6, 2019 2:16 am

Web Title: misconceptions about breastfeeding zws 70
Just Now!
X