मारुती सुझुकीने एप्रिलपासून डिझेल कारची विक्री व निर्मिती बंद करण्याचे ठरविले आहे. यापुढे फक्त कंपनीच्या पर्यावरणस्नेही कार बाजारात येणार आहेत. यात सीएनजी व हायब्रिड प्रकारातील वाहने असतील असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी ‘मिशन ग्रीन व्हेईकल’ हाती घेतले असून पुढील तीन वर्षांत १० लाख पर्यावरणस्नेही कार विकण्याचे धोरण आहे.

युरोपीय मापदंडानुसार उत्सर्जन मापदंड नीती तयार करीत भारत सरकारने २००० मध्ये प्रदूषणाबाबत ‘भारत स्टेज’ हे धोरण लागू केले. यानुसार सध्या भारतात ‘भारत स्टेज ४’ (बीएस ४) उत्सर्जन मानक लागू आहे. मात्र, शहरांमधील वाढते प्रदूषण ही एक गंभीर समस्या देशापुढे आहे. यात वाहन प्रदूषणाचा वाटा मोठा आहे. यामुळे पर्यावरणस्नेही धोरण आखत शासनाने बीएस ४ ऐवजी बीएस ६ हा उत्सर्जन मानक लागू करण्याचे जाहीर केले असून १ एप्रिलनंतर ‘बीएस ४’ वाहनांच्या विक्री व उत्पादनावर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे बॅटरीवर चालणारी वाहने यापुढे भारतात चालतील असेही धोरण ठरविले आहे. ‘बीएस ६’ या धोरणानुसार वाहन उत्पादक कंपन्यांनीही पुढाकार घेत नवीन धोरणानुसार वाहने बाजारात उतरवली आहेत.

यात भारतातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने आणखी एक पाऊल पुढे टाकत शासनाच्या या धोरणाला पुढे नेण्यासाठी ‘मिशन ग्रीन व्हेईकल’ हाती घेतले आहे. यात यापुढे पर्यावरणस्नेही व खरेदीदारांना परवडणाऱ्या कार बाजारात आणण्याचे ठरवले आहे. याचे पहिले पाऊल कंपनीने उचलले असून त्यांनी डिझेल कारचे उत्पादन व विक्री बंद करण्याचे जाहीर केले असून यापुढे सीएनजी व हायब्रिड कार तयार करण्यात येणार आहेत. अशा दहा लाख कार विकण्याचे त्यांचे नियोजन आहे.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने येत आहेत. मात्र या वाहनांच्या किमती त्यांच्या चार्जिगसाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी ही दीर्घकालीन बाब आहे. डिझेलच्या मोटारीची किफायतशीरता पेट्रोल व डिझेल या दोन इंधनांतील फरक कमी झाल्यामुळे कधीच ओसरली आहे. त्यात आता लागू होत असलेल्या बीएस ६ मानकांतर्गत सध्याची बहुतेक डिझेल इंजिने बाद ठरतात. त्यामुळे मागणी पाहता डिझेल मोटारी खरेदी करण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. हे ओळखत मारुतीने डिझेल मोटारींचे उत्पादन बंद करण्याचे ठरविले आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारींबाबत सावध भूमिका घेत पुढील तीन वर्षांत सीएनजी व हायब्रिड प्रकारातील वाहने बाजारात उतरविण्याचे ठरविले आहे.

सध्या मारुतीच्या सीएनजीवर चालणाऱ्या आठ कार बाजारात आहेत. इंधनाच्या बाबतीत सीएनजी गॅस चांगला परवडत असल्याने आणि पर्यावरणाचीही हानी होत नसल्याने या मोटारी घेण्याकडे खरेदीदारांचा कल दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात ‘सीएनजी’वरील सुमारे पाच लाख मोटारी मारुती सुझुकी बाजारात उतरवणार आहे. हायब्रिड प्रकारातील अडीच ते तीन लाख कार असतील असे कंपनीचे धोरण आहे. सद्य:स्थिती हायब्रिड तंत्र मारुती सुझुकी कंपनीकडे आहे. नवीन येत असलेल्या हॅचबॅक स्वीफ्टमध्ये याचा अवलंब केला आहे. या गाडीची इंधनक्षमता ३२ किलोमीटर प्रति लिटर इतकी आहे. सध्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या वाहनांत या कारचा समावेश होतो. कंपनीकडे हे नवे तंत्रज्ञान असल्याने कंपनी डिझेल कारला पर्याय म्हणून या कार बाजारात आणत आहे.

मारुतीची स्वीफ्ट

मारुतीने हायब्रिड तंत्रावर आधारित आपली स्वीफ्ट ही कार बनवली असून ती दिसायला जुन्या स्वीफ्टसारखीच आहे. मात्र ही गाडी जास्त शक्ती देणारी, इंधन बचत करणारी व पर्यावरणस्नेही असेल. साधारण ऑक्टोबपर्यंत ही कार भारतात प्रदर्शित होत असून तिची किंमत ही ७ ते ८ लाखांपर्यंत असेल. ती सध्या जपानमध्ये प्रदर्शित झाली आहे.

स्मार्ट हायब्रिड कार

अशी गाडी जी एकपेक्षा अधिक इंधन प्रकारांवर चालते. ज्या गाडीत इंजिनाबरोबर इलेक्ट्रिक मोटारही लावलेली असते. गाडी इंजिन व मोटार या दोन्हींवरही चालते. यात चांगले मायलेज मिळण्यासाठी मदत होते. यात कमीत कमी तीन ते पाच किलोमीटरचे लिटरमागे मायलेज अधिक मिळते. दुसरा फायदा म्हणजे काही प्रमाणात ही कार इकोफ्रेंडली आहे. यात वाहन चालविताना चालक क्लच व ब्रेकचा वापर करीत असतात. यात गाडीची शक्ती कमी होत असते. मात्र हायब्रिडमध्ये इलेक्ट्रिक मोटर लावलेली असल्याने कल्च व ब्रेक दाबल्यानंतर वाया जाणारी शक्ती ही इलेक्ट्रिक मोटरमध्ये जमा होते. त्यामुळे गाडीला चांगले मायलेज मिळण्यास मदत होऊन इंधन बचत होते.

फॉक्सवॅगनचे मिशन २.०

युरोपच्या सर्वात मोठय़ा वाहन उत्पादन कंपनीने भारतात मिशन २.० हा प्रकल्प हाती घेतला असून यात भारतीय वाहन खरेदीदारांच्या पसंतीचा विचार करीत एसयूव्ही प्रकारात परवडणाऱ्या कार बाजारात उतरविण्याचे ठरविले आहे. यातील पहिल्या कारचे सादरीकरण केले असून ती मध्यम आकारातील एसयूव्ही आहे. आधुनिक भारतीय ग्राहकांच्या गरजांना साजेशी स्टाइल, कामगिरी व आकर्षकतेचे सुरेख संयोजन यामुळे ही कार भारतीय बाजारात पसंतीस उतरेल अशी अपेक्षा कंपनीची आहे. कंपनी पुढील काळात या प्रकल्पांतर्गत १ मिलियन ब्युरोची गुंतवणूक करीत आहे.