08 December 2019

News Flash

मोबाइल डेटाची बचत

आज भारतीयांकडून मोबाइल डेटाचा मुबलक प्रमाणात वापर होताना दिसतो.

(संग्रहित छायाचित्र)

मोबाइल इंटरनेट डेटाचे दर सर्वात कमी असणारा देश अशी भारताची ओळख आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एक सर्वेक्षणानुसार भारतात एक जीबी इंटरनेट डेटा सरासरी एक रुपया ४१ पैसे इतक्या कमी दरात उपलब्ध आहे. याउलट अमेरिकेत एक जीबी इंटरनेट डेटासाठी वापरकर्त्यांना तब्बल १२ डॉलर मोजावे लागतात. ब्रिटनसारख्या देशांतही मोबाइल डेटाचे दर सहा डॉलरच्या आसपास आहेत. भारतात गेल्या तीन वर्षांत मोबाइल डेटाचे शुल्क प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे. जिओच्या मोबाइल सेवेला सुरुवात झाल्यापासून देशभरातील दूरसंचार कंपन्यांनी मोबाइल डेटाचे दर कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज भारतीयांकडून मोबाइल डेटाचा मुबलक प्रमाणात वापर होताना दिसतो.

अर्थात मोबाइल डेटाचे दर कमी आहेत म्हणून त्याचा अमर्याद वापर करणे, योग्य नाही. अनेकदा आपण कारण नसताना निव्वळ टाइमपास म्हणून इंटरनेटवर ब्राऊजिंग करत असतो किंवा फेसबुक, ट्विटर यांसारख्या अ‍ॅपचा अवाजवी वापर करत असतो. हे अ‍ॅप आपल्या मोबाइल डेटाचा मोठा भाग गिळंकृत करतात. डेटा स्वस्त असल्याने आपण त्याचा फारसा विचार करत नाही. परंतु एका ठरावीक मासिक मर्यादेनंतर मोबाइल डेटाचा वेग कमी होतो. मोबाइल डेटाचे प्लॅन जाहीर करताना कंपन्यांनी तशी तरतूदच केलेली असते. या पाश्र्वभूमीवर आपल्या मोबाइल डेटाचा वापर व्यवस्थितपणे केल्यास खरोखरच गरज असेल तेव्हा आपल्याला वेगवान आणि स्वस्त इंटरनेटचा लाभ घेता येतो.

मोबाइल डेटाचा वापर कुठे जास्त होतो, हे सांगणारी यंत्रणा आपल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असते. परंतु, त्यातून पुरेशी माहिती मिळत नसेल तर तुम्ही खासगी अ‍ॅपचा वापर करून आपल्या मोबाइल डेटावर नियंत्रण आणू शकता. सध्या गूगलच्या प्ले स्टोअरवर असे असंख्य अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातीलच ‘माय डेटा मॅनेजर’ (My Data Manager) हे अ‍ॅप तुमच्या फोनच्या डेटावापराचे चोख विश्लेषण करते. या विश्लेषणाच्या आधारे डेटा वाचवण्यासाठी ते टिप्सही देते. या अ‍ॅपच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वेळी डेटाचा अतिरिक्त वापर होत असल्यास सूचना मिळते. तुम्ही ठरवून दिलेली डेटाची मर्यादा ओलांडल्यास हे अ‍ॅप पूर्वसूचना देते तसेच कोणते अ‍ॅप तुमचा जास्त डेटा वापरत आहेत, याची माहितीही देते.

आपण डाऊनलोड केलेले अ‍ॅप सातत्याने ‘सिंक’ होण्यासाठी इंटरनेटशी जोडले जात असतील तर, तुमचा मोबाइल डेटा मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. ‘नेटगार्ड’ (Net Guard) हे अ‍ॅप तुमच्या सर्व अ‍ॅपच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण आणते. हे अ‍ॅप हाताळण्यासाठीही अतिशय सोपे आहे.

‘बॅकग्राऊंड डेटा’वर निर्बंध

अनेकदा अ‍ॅप आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च करतात. हे थांबविण्याकरिता सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा युसेजचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणते अ‍ॅप किती डेटा वापरतो याची माहिती मिळेल. त्यानंतर प्रत्येक अ‍ॅप सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस असलेला ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय निवडावा. ज्यामुळे अ‍ॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही.

ऑटो अपडेट टाळा

गूगल प्लेमध्ये होणारे अ‍ॅप अपडेशनमुळे मोबाइलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो. बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अ‍ॅप्स’ असा पर्याय निवडता ज्यामुळे मोबाइलमधील अ‍ॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाल्यावर लगेच त्यांचे अ‍ॅप अपडेट होते ज्यासाठी मोबाइलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो. हा डेटा खर्च वाचविण्याकरिता प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अ‍ॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अ‍ॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. त्यामुळे अ‍ॅप आपोआप अपडेट होणार नाहीत.

First Published on August 15, 2019 12:15 am

Web Title: mobile data saving mobile internet abn 97
Just Now!
X