News Flash

मोबाइलचे डॉक्टर

कोणत्याही संगणकाप्रमाणेच स्मार्टफोनलाही व्हायरसचा धोका संभवतो.

स्मार्टफोन हा कितीही ‘स्मार्ट’ असला तरी, त्यावर हल्ला करणारेही तितक्याच ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांची माहिती चोरू शकतात वा त्याचे नुकसान करू शकतात. कोणत्याही संगणकाप्रमाणेच स्मार्टफोनलाही व्हायरसचा धोका संभवतो. वापरकर्त्यांच्या नकळत विविध माध्यमातून व्हायरस फोनमध्ये शिरकाव करतो आणि आतील गोपनीय माहिती चोरतो. अनेक व्हायरस हे केवळ वापरकर्त्यांला उपद्रव देण्यासाठीच बनवण्यात आलेले असतात. तर अशा व्हायरसच्या माध्यमातून फोन ‘हॅक’ किंवा ‘लॉक’ करून वापरकर्त्यांकडून खंडणी उकळण्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. यासाठी आपल्या स्मार्टफोनचा वापर करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. मात्र, यानंतरही व्हायरसचा धोका टळत नाही. अशा वेळी ‘अँटिव्हायरस’ अ‍ॅप उपयुक्त ठरू शकतात. अशाच काही अँटिव्हायरस अ‍ॅपविषयी आपण जाणून घेऊ.

कॅस्परस्काय

हा अँटिव्हायरस संगणकासोबत मोबाइलसाठीही उपयुक्त आहे. हा अँटिव्हायरस तुमच्या स्मार्ट फोनची फोन मेमरी पूर्णपणे स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइली डिलीट करण्यास मदत करतो. यामुळे तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा व्हायरसपासून सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता. या अँटिव्हायरसमधील ‘थेफ्ट प्रोटेक्शन’मुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे तुम्हाला त्यात नव्याने घातलेल्या सिम कार्डची माहिती मिळू शकते. विंडोज, अ‍ॅपल किंवा अँड्रॉइड अशा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर हा अँटिव्हायरस काम करतो.

वेबरूट

अँड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस आणि मालवेअर्स फाइल्स हा डिलीट करतो. ‘इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनर’मुळे तुम्ही ‘थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स’ डाऊनलोड केले तरी ते आपोआप ‘स्कॅन’ होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन फेटाळून लावतो. कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यामध्ये आहे. ‘सिक्युअर वेब ब्राऊझिंग’ हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्टय़. तुम्ही एखादे वेबपेज सुरू केल्यानंतर त्यातील काही लिंक धोकादायक असतील तर हे अ‍ॅप त्या आधीच ‘ब्लॉक’ करतं.  वेबरूटच्या पेड व्हर्जनमध्ये आपल्याला  डिव्हाईस लॉक, वाईप डेटा, डिव्हाईस स्कीम अशा वैशिष्टय़ांचाही फायदा घेता येतो.

 अव्हास्ट

अव्हास्ट या कंपनीचाही मोबाइल अँटिव्हायरस असून  यामध्ये आपल्याला व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शिल्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. आपण माहितीची देवाण-घेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अँटिव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही हा आपला प्रश्न असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. यामुळे आपण आलेली माहिती स्कॅनिंग करून घेऊन त्यातील व्हायरस काढून टाकला जातो.

नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी

हा अँटिव्हायरस तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास  मदत करतो. आपोआप व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, कॉन्टॅक्ट्स बॅकअप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्टय़ं आहेत.  स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते, तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकटर, सिक्युअर डेटा ब्राऊजिंग ही वैशिष्टय़े या अ‍ॅपमध्येही आहेत. यामधील ‘अँटिलॉस्ट’ सुविधेमुळे फोन हरवल्यास त्यातील अलार्म वाजतो. या माध्यमातून तुम्ही हरवलेल्या फोनचे ठिकाणही शोधून काढू शकता. सुरुवातीला ३० दिवसांसाठी हे अ‍ॅप मोफत आहे. मात्र, त्यानंतर याचा वापर करण्यासाठी रीतसर सशुल्क नोंदणी करावी लागते. अ‍ॅण्ड्रॉइड, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.

मॅककॅफे

स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, स्पायवेअर्सपासून तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम मॅककॅफे करतो. ‘साइट अ‍ॅडवायजर’ हे यातील महत्त्वाचं वैशिष्टय़ं. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरीत्या नेट सर्फिग आणि ऑॅनलाइन शॉपिंग करू शकता. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अँटिव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा फोन सुरक्षित राहतो. हा अँटिव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक लिंक ब्लॉक करतो. अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 1:10 am

Web Title: mobile doctor mobile repairs
Next Stories
1 न्यारी न्याहारी : काकडी कूलर
2 भारतातील तंत्रक्रांती
3 ताणमुक्तीची तान: चिंतन, आप्तेष्टांशी गप्पा हेच ताणमुक्तीचे उत्तम माध्यम
Just Now!
X