ऋषिकेश मुळे

तंत्रज्ञानाने आपल्या जगण्यातील मोठा भाग व्यापला आहे. रेल्वेचे तिकीट बुक करण्यापासून किराणा माल खरेदी करण्यापर्यंत आणि विजेचे बिल भरण्यापासून ऑनलाइन औषधे मागवण्यापर्यंत प्रत्येक कामात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान काही व्यक्तींसाठी आयुष्याचा मोठा आधार बनले आहे. दृष्टिहीन व्यक्तींसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे मदतीचा हात ठरत आहे.  दृष्टिहीन व्यक्तींना रोजच्या जीवनात खास करून शैक्षणिक अवस्थेत उपयोगी येणाऱ्या अशाच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात..

पीडीएफ रीडर

अनेकदा अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनातील पुस्तकेदेखील वाचायला(ऐकायला) आवडतात. मात्र अनेकदा मराठी भाषेतील पुस्तके ऐकण्यास अडथळा निर्माण होतो. अंध विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी बाजारात विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र पीडीएफ रीडरद्वारे पुस्तके वाचण्यासाठी खास सुविधा उपलब्ध आहेत. या पीडीएफ रीडर अ‍ॅप्लिकेशद्वारे मराठी पुस्तकेही ऐकण्यास येतात. तसेच काही मराठी शब्दांचे विश्लेषण देणारी सुविधादेखील या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

व्हॉइस ड्रीम रीडर (अँड्राइड आणि आयफोन)

व्हॉइस ड्रीम रीडर हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची पुस्तिका या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाचणे- ऐकणे सोपे जाते. वाचताना समोरून येणारा आवाज आपल्याला नियंत्रित करता येतो. आपल्याला मोबाइलमध्ये आलेला मजकूर या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ऑडिओमध्ये रूपांतरित करण्यात येतो.

ब्लाइंड स्क्वेअर (आयफोन)

ब्लाइंड स्क्वेअर या अ‍ॅपचा अंध आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अधिक फायदा हा होत असतो. ज्याप्रमाणे गुगल मॅप एखादा प्रदेश, एखादे ठिकाण आपल्याला दर्शवते त्याप्रमाणेच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ब्लाइंड स्क्वेअर या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग होतो. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे एखादे ठिकाणी लवकर आणि चांगल्या प्रकारे मोबाइल वापरकर्त्यांला सांगते. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्याची विस्तृत माहिती, त्याचबरोबर तुम्हाला अमुक एका ठिकाणी कसे जायचे, प्रवासाची साधने, एकूण अंतर यांची इत्थंभूत माहिती ब्लाइंड स्क्वेअर अ‍ॅप्लिकेशन देत असते.

केएनएफबी रीडर (अँड्राइड आणि आयफोन)

अनेकदा अंध नागरिकांना बँकेत किंवा इतर ठिकाणी एखादा मजकूर लिहिण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी अडथळा निर्माण होतो. कोणाची तरी मदत घेऊन मजकूर लिहावा लागतो. अशा वेळेस अंध विद्यार्थ्यांना केएनएफबी रीडर हे अ‍ॅप्लिकेशन कामी येते.

केएनएफबी रीडर या अ‍ॅप्लिकेशनद्वारे फॉर्मचा किंवा भरावयाच्या मजकुराचा फोटो काढून आपल्याला कोणती माहिती त्यात भरायची आहे याची माहिती केएनएफबी रीडर या अ‍ॅप्लिकेशनद्वारे सांगितली जाते. कागदाचा फोटो काढल्यावर २५ हून अधिक पाने या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ऐकण्यास येतात. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या भाषांमधून माहिती ऐकता येते.

मनी रीडर (आयफोन)

अनेकदा पैसे मोजताना अंध व्यक्तींना मोठा त्रास निर्माण होतो. कधी कधी त्यांना फसवणे जाण्याची दाट शक्यता असते. मात्र दृष्टिहीन विद्यार्थ्यांना आता पैसे मोजण्याच्या बाबतीत घाबरण्याचे काही एक कारण नाही. पूर्वी स्पर्शावरून अंध व्यक्ती नोटेचा अंदाज घेऊन त्याची किंमत सांगत असत. मात्र आता मनी रीडर हे एक असे अ‍ॅप बाजारात आहे ज्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे नोटेसमोर मोबाइल सुरू करून कॅमेरा धरला तर लगेच मोबाइल आवाजाने नोट किती रुपयाची आहे आणि कोणत्या देशाची आहे याची माहिती देते. नोट किंवा नाण्यासमोर मोबाइल कॅमेरा धरल्याबरोबर पाच सेकंदांच्या कालावधीत हातातील नोट किती रुपयांची आहे ते सांगितले जाते.

सुपर नोवा सॉफ्टवेअर

काही व्यक्ती या पूर्णपणे अंध नसतात मात्र त्यांची दृष्टी ही कमी असते. अनेकदा वाचताना शब्द धूसर दिसतात. तर कधी शब्द लगेच लक्षात येत नाहीत. त्यावेळेस सुपर नोवा हे सॉफ्टवेअर कामी येते. मॅग्निफायर सॉफ्टवेअरप्रमाणेच सुपर नोवा हे सॉफ्टवेअर काम करते. या सॉफ्टवेअरचा वापरसुद्धा संगणकावरील अक्षर समजण्यासाठी केला जातो. सुपर नोवा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अक्षर वाचताना अंधूक दिसत असेल तर ते अक्षर स्पष्ट दिसतेच त्यासोबत त्याचे विश्लेषणदेखील अंध विद्यार्थ्यांला ऐकू येते.

ब्रेल मित्र सॉफ्टवेअर

सर्वसामान्य मुलांकडेसुद्धा सध्या वेगवेगळी पुस्तकांची सॉफ्टवेअर पाहायला मिळतात. मात्र विशेष मुलांसाठी खासकरून अंध व्यक्तींसाठी पुस्तके वाचण्याकरिता ब्रेल मित्र हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ब्रेल लिपीत असलेले हे सॉफ्टवेअर हाताळण्यास सोपे आहे. साधारण ४ हजारहून अधिक पुस्तके या सॉफ्टवेअरमध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये बुक मार्कसारखे अनेक विविध पर्याय पाहायला मिळतात. हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांनी फक्त त्यांचा सॉफ्टवेअरशी निगडित ओळख क्रमांक टाकल्यावर वाचनास सुरुवात करता येते.