22 November 2019

News Flash

मोबाइल भिजला तर..

मोबाइल भिजू देऊ नये किंवा त्याचा पाण्याशी संपर्क होऊ न देणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पावसाळा सुरू होताच दरवर्षी मोबाइलच्या सुरक्षिततेची समस्या भेडसावू लागते. मोबाइलच्या बाह्य भागाचे लॅमिनेशन करणे, प्लास्टिकच्या पिशवीत तो व्यवस्थित गुंडाळणे, पावसातून जाता-येता तो न हाताळणे अशा प्रकारची खबरदारी आपण सर्वच जण आवर्जून घेतो; परंतु एवढे करूनही आपला मोबाइल अजिबात भिजणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. एखाद्या मुसळधार पावसात किंवा अचानक आलेल्या सरींमध्ये मोबाइलही ‘न्हाऊन’ निघतो आणि मग चिंता सतावते, आता याचे काय करायचे?

असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला दरवर्षीच्या पावसाळय़ात एकदा तरी पडतो. खरे म्हणजे, मोबाइल भिजू देऊ नये किंवा त्याचा पाण्याशी संपर्क होऊ न देणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

मात्र चुकून मोबाइल भिजलाच तर तुम्हाला या गोष्टी करून आपल्या मोबाइलचा ‘जीव’ वाचवता येईल.

* मोबाइल बंद करा आणि उभा ठेवा.सिम कार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा.

* जर तुमच्या फोनमधील बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर बॅटरी काढून बाजूला ठेवा. मात्र ‘नॉन रिमूव्हेबल’ बॅटरी असेल तर ती बळजबरीने मोबाइलपासून वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका.

* कोरडय़ा कपडय़ाने किंवा कागदी नॅपकिनने फोन पुसून घ्या. पुसताना मोबाइलवरील पाणी अलगद टिपा. घाईने किंवा रगडून मोबाइल पुसण्याच्या प्रयत्नात मोबाइलच्या स्क्रीनवर ओरखडे निर्माण होण्याची किंवा पाणी आतल्या भागात शिरण्याची शक्यता असते.

* सिम कार्ड, मेमरी कार्ड किंवा चार्जिगसाठीच्या ‘स्लॉट’मध्ये गेलेले पाणी फुंकर मारून किंवा छोटय़ा ‘ब्लोअर’च्या मदतीने बाहेर काढा.

* मोबाइल फोन कोरडा करण्यासाठीचे विशेष ‘पाऊच’ बाजारात मिळतात. त्यांची मदत घ्या.

* मोबाइल पूर्णपणे सुकल्याखेरीज त्यात सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड टाकू नका. तसेच तो चार्ज करण्याचा प्रयत्नही करू नका.

* कोरडा झालेला फोन सुरू केल्यानंतर स्क्रीन, आवाजाची बटणे, चार्जिग पोर्ट तपासून पाहा. कॅमेरा, स्पीकर यांचीही चाचणी घ्या.

तांदळाचा आधार

तुमचा मोबाइल पाण्यात भिजल्याने बंद पडला तर मोबाइलच्या आकारापेक्षा मोठय़ा वाटीत वा भांडय़ात तांदूळ घेऊन त्यात किमान २४ तास मोबाइल बुडवून ठेवा. तांदूळ मोबाइलवरील पाणी पूर्णपणे शोषून घेतो. साधारण २४ तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे कोरडा होईल. त्यानंतरही तो सुरू न झाल्यास आणखी काही तास तांदळात तो बुडवून ठेवा. ही प्रक्रिया अधिक वेगवान करायची असेल तर तुम्ही तांदळाऐवजी सिलिका जेलचा वापरही करू शकता. ‘सिलिका जेल’चे पाकीट आजकाल अनेक नव्या वस्तूंमध्ये आढळते. नव्या पाकीटबंद वस्तूंमध्ये निर्माण होणारे बाष्प शोषून घेण्याचे काम सिलिका जेल करतात.

First Published on June 13, 2019 12:34 am

Web Title: monsoon mobile security issues
Just Now!
X