05 August 2020

News Flash

पेटटॉक : श्वानालाच पसंती, पण कोणत्या?

खूप वर्षांपूर्वी भारतात येऊन पोहोचलेल्या अनेक प्रजातींचे श्वान इथल्या वातावरणात पुरते मिसळले आहेत.

रसिका मुळय़े  rasika.mulye@expressindia.com

भारतातच नाही तर जगभरातील प्राणीप्रेमींकडून कुटुंबात दाखल करण्यासाठी श्वानालाच ‘पेट’पसंती दिली जाते.. श्वानपालनाची हौस येत्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज आहे. खूप वर्षांपूर्वी भारतात येऊन पोहोचलेल्या अनेक प्रजातींचे श्वान इथल्या वातावरणात पुरते मिसळले आहेत. त्यामुळे कोणत्या प्रजातीचे श्वान घरी आणावे या प्रश्नावर मुबलक पर्याय उपलब्ध आहेत.

प्रजाती कोणती?

कुटुंबात राहणारा कुत्रा हा मिसळणारा, शांत, माणसं हवी असणारा असावा लागतो. मात्र घराची राखण करण्यासाठी हवे असणारे कुत्रे हे काहीसे आक्रमक असणे अपेक्षित असते. कुत्र्याच्या प्रजातींची त्याच्या आकारमानानुसार ढोबळपणे छोटे आणि मोठे अशी वर्गवारी करता येईल. छोटय़ा कुत्र्यांमध्ये साधारणपणे पग, बिगल, डशहाउंड, मिनिएचर पिसिंचर, शिझू, पॉमेरिअन, मल्टिस, शिबा इनु, चिवाव्हा, अशा काही प्रजाती दिसतात. यांना जागा, खाणे, व्यायाम तुलनेने कमी लागतो. ही कुत्री खेळकर असतात. यातल्या काही प्रजाती या राखण करणाऱ्या म्हणता आल्या नाहीत तरी इशारा देणाऱ्या आहेत. फ्लॅटमध्ये पाळण्यासाठी हे सोयीस्कर पर्याय आहेत. मात्र त्याचवेळी या सर्व प्रजाती नाजूक असतात हेदेखील लक्षात घ्यायला हवे. घरात लहान मूल असेल तर खेळण्यात, मस्ती करण्यात या कुत्र्यांना इजा होऊ  शकते, याचाही विचार करायला हवा. लॅब्राडॉर, गोल्डन रिट्रिव्हर, कोली, सयबेरिअन हस्क, पुडल, बॉक्सर, डॉल्मेशिअन, कॉकर स्पॅनिअल, स्पिट्झ, अफगाण हाउंड, बेल्जियन मॅलीनॉईस, जर्मन शेफर्ड, डॉबरमन, रॉटविलर, ग्रेटडेन, मॅस्टीफ, सेंट बर्नार्ड या मध्यम आणि मोठय़ा प्रजाती. यातील काही प्रजाती या तीन ते चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये पाळणे जवळपास अशक्य. मात्र काही फ्लॅटमध्ये व्यवस्थित राहू शकतात. मात्र रोज व्यायाम, खेळ, स्वच्छता यांसाठी या प्रजातींकडे अधिक लक्ष द्यावे लागते.

केसीआय नोंदणी

श्वान विक्रीच्या जाहिरातींत केसीआय नोंदणी असलेले असा उल्लेख असतो. केसीआय म्हणजे केनल क्लब ऑफ इंडिया ही संस्था. विविध प्रजातींच्या श्वानकुळांचे तपशील ही संस्था ठेवते. कुत्र्यांची विक्री, ब्रीडिंग यावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे. या संस्थेने चॅम्पियन वा प्युअर ब्रीड म्हणून दिलेले प्रमाणपत्र हे अंतिम मानले जाते. जन्मदात्यांपैकी एक जर चॅम्पियन असेल तर त्याचा बाजारभाव वाढतो.

पिल्लू की मोठे श्वान

श्वान विकत घेणे हा पर्याय जसा आहे तसाच अनेक स्वयंसेवी संस्थांकडून दत्तक घेण्याचाही पर्याय मिळतो. मात्र कुटुंबात श्वानाला सामावून घेताना त्याचे वय किती असावे हा नेहेमी गोंधळ उडवणारा प्रश्न ठरतो. पिल्लू घ्यायचे असेल तर ते सहा आठवडय़ांपेक्षा कमी वयाचे असू नये. सहा आठवडय़ांपर्यंत पिल्लू त्याच्या आईजवळ असणे आवश्यक असते. पिल्लाचे डोळे चौदा दिवसांनी उघडल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी आई शिकवते. त्या आईनेच शिकवणे आवश्यक असते. त्याच्या पोषणासाठी आईचे दूधही गरजेचे असते. सहा आठवडय़ांपेक्षा कमी वयाचे पिल्लू विकणे हा गुन्हा आहे. पिल्लू घ्यायचे की वयाने मोठा श्वान घ्यायचा याबाबत संभ्रम असतो. याबाबत श्वान प्रशिक्षक विक्रम होशिंग यांनी सांगितले, ‘पिल्लू आणल्यास त्याला पूर्णपणे प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी वेळ अधिक लागतो. नैसर्गिक विधींच्या सवयी, खाण्याच्या सवयी याची शिस्त लावावी लागते. मोठे कुत्रे घेतल्यास ते रुळणार कसे अशी अनेकांना शंका असते. चार-पाच महिने ते दीड वर्षांपर्यंत श्वान घेतल्यास ते नवे ठिकाण स्वीकारू शकतात. त्याचवेळी त्यांचे मूलभूत प्रशिक्षण झालेले असते. वेळापत्रक निश्चित झालेले असते. त्यामुळे या श्वानांना रुळवून घेण्यासाठी वेळ कमी लागतो. ’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 12:58 am

Web Title: most popular pet dog in india facts about pet dogs zws 70
Next Stories
1 आम्ही बदललो : निव्वळ चेहऱ्यानं नाही, विचारांनी बदललो!
2 पूर्णब्रह्म : व्हेगन व्होल व्हीट बिस्कीट
3 आरोग्यदायी संक्रांत
Just Now!
X