भारतात स्मार्टफोन, मोबाइल वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येसोबतच ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. ऑनलाइन खरेदी किंवा ऑर्डर करण्यासारखे प्रकार केवळ सुशिक्षित आणि सुखवस्तू मंडळींकडूनच केले जातात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, ‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स संकेतस्थळाने केलेल्या पाहणीत तो खोटा ठरला आहे. एवढेच नव्हे तर, भारतीय ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी इंग्रजीऐवजी मातृभाषेला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

‘ऑनलाइन शॉपिंग’ ही संकल्पना गेल्या दशकभरापूर्वीची असली तरी, गेल्या पाचेक वर्षांतच ती प्रामुख्याने भारतात रुजली आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळावर सहज उपलब्ध होणारी वस्तू, तिचे किफायतशीर दर, त्या खरेदीवरील आकर्षक सवलती आणि घरपोच सुविधा यांमुळे ऑनलाइन खरेदी अनेकांना सोयीस्कर वाटते. मात्र, याचा झपाटय़ाने प्रसार होण्यास स्मार्टफोन आणि इंटरनेट यांचा वाढता वापर कारणीभूत आहे. सधन किंवा चांगले अर्थार्जन करणारे शहरी भागातील नागरिक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे सांगितले जात असले तरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागांतही ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते.

‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स संकेतस्थळाने गेले सहा महिने केलेल्या व्यापक अभ्यासातून अनेक वैशिष्टय़पूर्ण माहिती उजेडात येत आहे. या उद्योगाशी जोडले गेलेल्या नवीन ग्राहकांपैकी जवळपास ९० टक्के वापरकर्ते हे निमशहरी किंवा त्याहून कमी विकसित अशा ग्रामीण भागांतील असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. ‘ई-कॉमर्स’च्या वापराबद्दलचे प्रचलित विचार आणि अनुभव जाणून घेण्यासाठी तसेच ऑनलाइन खरेदीमध्ये भारतीय ग्राहकांना वाटणारे अडथळे समजून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यासाठी आठ ते १२ हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या तसेच कमी किंमत श्रेणीतील स्मार्टफोन वापरणाऱ्या २५ ते ३५ वयोगटातील तरुणांची निवड करण्यात आली. तसेच पदवीपेक्षा कमी शिक्षण झालेल्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य देण्यात आले. लखनऊ, कोईम्बतूर यासारख्या शहरांतील वापरकर्त्यांशी संवाद साधून मिळालेल्या माहितीच्या आधारे फ्लिपकार्टने हा निष्कर्ष बांधला आहे.

त्यानुसार, ‘ई-कॉमर्स’ उद्योगाशी नवीन २० कोटी भारतीय ग्राहक जोडायचे असल्यास त्यांच्यासाठी या संकेतस्थळांवर सुलभ वातावरण निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. ई-कॉमर्सचा वापर हे ग्राहक कसा करतात, हे पाहण्यासाठी फ्लिपकार्टने अनेक प्रश्न विचारले. त्यातून असे दिसले की, इंग्रजी-हिंदी कीबोर्डला सर्वाधिक ग्राहकांची पसंती आहे. तसेच उत्पादनांचे परीक्षणही ग्राहकांना मातृभाषेत वाचायला अधिक आवडते. त्यातही प्रमाण भाषेपेक्षा सोप्या बोली भाषेला ७५ टक्के ग्राहकांची पसंती असते. उत्पादनांची सविस्तर माहितीही सोप्या व स्थानिक भाषेत मिळावी, अशी अपेक्षा बहुतेक ग्राहकांनी व्यक्त केली.

भारतातील ग्राहक केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर वापरले जाणारे साइनअप, साइन इन, सॉर्ट, फिल्टर, माय कार्ट, अ‍ॅड टु कार्ट, यूज माय करंट लोकेशन, टॅप टु ऑटोफिल, सीव्हीव्ही, सर्टिफाइड बायर, विश लिस्ट, फ्रिक्वेन्टली बॉट टुगेदर, इन ट्रान्झिट, रॉम, टॉप रिवूअर, ऑर्थेटिक, एक्स्पांडेबल इ. शब्दप्रयोगांशी सुपरिचित नाहीत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाषांतरित आणि अनुवादित शब्दांचे योग्य मिश्रण असल्यास ग्राहक स्थानिक भाषेच्या इंटरफेसकडे आकर्षित होतात, असे या अहवालात म्हटले आहे.

अहवालातील ठळक मुद्दे

  •  स्थानिक भाषेत ई-कॉमर्स संकेतस्थळांची निर्मिती झाल्यास अधिकाधिक ग्राहकांचा त्याकडे ओढा वाढेल.
  • शुद्ध स्थानिक भाषेपेक्षा रोजच्या व्यवहारातील बोली भाषेला ग्राहक अधिक पसंती देतात.
  •  मात्र, स्थानिक भाषेत टायपिंग करणे कठीण असल्याचे अनेकांनी मान्य केले.
  • ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उत्पादनांखाली प्रसिद्ध झालेली परीक्षणे स्थानिक भाषांत अनुवादित करायला हवीत, असेही प्रतिसादकर्त्यां तरुणांचे म्हणणे आहे.
  • स्थानिक भाषेला पसंती देणारे बहुसंख्य ग्राहक हे कमकुवत नेटवर्क आणि कमी साठवणूक क्षमता असलेल्या स्मार्टफोन्सचा वापर करणारे आहेत.