महेंद्र सूर्यभान पांगारकर

मु. पो. शिंदे, ता. जि. नाशिक

‘करोना’मुळे आज समाजातच नव्हे तर घरातही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आजी आजोबा, मुलगा, सून, नातवंडे हे सर्व पूर्णवेळ घरातच एकत्र असल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. सध्या मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आम्ही विविध वस्तू बनवत आहोत. ‘एम सील’ पासून नेम प्लेट बनविणे. शाडूची माती, क्ले पासून  वेगवेगळ्या वस्तू बनवणे असे उद्योग आम्ही सुरू  केले आहेत.

या निमित्ताने तीनही पिढय़ांना निवांतपणा मिळाला आहे. या  पिढय़ांना सांधणारा, जुन्या पिढीकडे असलेला समृद्ध वारसा नव्या पिढीकडे सोपविण्याचा, नव्या पिढीला त्याच्याशी ओळख करून देण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.

माझी आई मथुराबाई ७७ वर्षांंची असून तिच्याकडे जुन्या म्हणी, वाक्प्रचार यांचा खूप मोठा संग्रह आहे. त्या सर्व परंपरेने चालत आलेल्या आहेत, कोणत्याही पुस्तकांत त्यांचा उल्लेख नाही.(उदा. अचानक ध्यानीमनी नसलेल्या एखाद्य गोष्टीचा उल्लेख आला म्हणजे लगेच त्या गोष्टीचा हट्ट धरणे, पाठपुरावा करणे या अर्थाची एक म्हण आहे (गावाचं नाव ‘पुरी’ तर म्हणे दे मला पुरी!) याबरोबर आईकडे ओव्यांचाही समृद्ध साठा आहे. यात वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या छोटय़ा छोटय़ा ओव्या (आजच्या भाषेत चारोळ्या) असून यात नातेसंबंध, भक्तिभाव, सणवार अशा अनेक विषयांचे वैविध्य आहे.

उदाहरणार्थ भावा-बहिणीच्या नात्यांवरील ही ओवी

बहीण भावंड एका भाकरीचा काला,

भाऊ  तुझा माझा जनम एका हुरुदात झाला

(हुरुदात = हृदयात)

बहीण भावंडाबरोबर माय लेकाचे प्रेम, सासू सूनेचा खोचकपणा, नणंद भावजयीचे भांडण, पती पत्नी अशा अनेक विषयांवरील विविध गाणीही आहेत.

नणंद भावजयीतील हेवेदावे दर्शविणाऱ्या या ओळी

भाऊ  घेई साडी, भावजय डोळे मोडी,

घाल शिंप्या घडी, लेण्याची काय गोडी

याचबरोबर लग्नातील गाणी, हळदीची गाणी यांचाही भरपूर ठेवा आहे.

मध्यंतरी अ. द. मराठे यांचे ‘मराठी भाषेतील असभ्य म्हणी व वाक्प्रचार’ हे पुस्तक वाचनात आले होते. या पुस्तकात लेखकाने मराठी बोलीभाषेतील हा समृद्ध ठेवा, मोठय़ा मेहनतीने लिखित स्वरूपात जतन केला आहे. या पुस्तकावरूनच मला ही संकल्पना सुचली. त्याच धर्तीवर मराठी बोलीभाषेतील हा ‘सभ्य’ ठेवा आपण आपल्यापरीने जतन करून ठेवण्यास हातभार लावू हा विचार मनात आला आणि आम्ही तातडीने याची अंमलबजावणी सुरू केली.

माझी मुलगी श्रावणी, (इयत्ता आठवी) हा सर्व एका वहीत लिहून संग्रहित करून ठेवत आहे. त्यामुळे कुठेही लिखित स्वरूपात नसलेला, परंपरेने चालत आलेला हा अनमोल वारसा एक  प्रकारे जतन करण्याचे आणि त्याचे दस्तावेजीकरण करण्याचे काम होतत आहे. आजच्या मुलांनाही तेव्हाचे गाणे, ओव्या त्यातील शब्द, त्यांची मजा अनुभवता येत आहे. आई विविध शब्दांचे, ओळींचे अर्थ आणि त्याच्याशी निगडित आठवणी सांगते. त्यानिमित्ताने गप्पा-टप्पा होऊन त्याकाळच्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळत आहे.

अचानक मिळालेल्या या सुट्टय़ांमुळे तीन पिढय़ांतील दुरावा कमी होऊन एक प्रकारे सांस्कृतिक ठेव्याचे जतन केले जात आहे.  आजच्या पिढीला कालची ओळख होत आहे. अशिक्षित आजीला इतक्या ओव्या, गाणी तोंडपाठ कशी? याचेही मुलांना आश्चर्य वाटत आहे.  ‘करोना’च्या या सुट्टीमुळे आम्ही तीन पिढय़ा नव्याने एकत्र आलो आहोत. लुप्त होऊ  पाहणाऱ्या सांस्कृतिक ठेव्याच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच त्याचा आनंदही आम्ही सर्व जण घेत आहोत.