13 December 2019

News Flash

जादुई मोझार्टचे साल्झबर्ग

व्हिएन्ना हे जरी ऑस्ट्रियाचे राजधानीचे शहर असले, तरी या देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून मात्र साल्झबर्ग हेच शहर जगभर ओळखले जाते.

| August 9, 2019 12:23 am

(संग्रहित छायाचित्र)

विजय दिवाण

ऑस्ट्रिया हा मध्य युरोपात आल्प्स पर्वतांच्या कुशीत विसावलेला एक नितांतसुंदर देश आहे. तिथले अप्रतिम निसर्गसौंदर्य, तिथली समृद्ध संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात त्या देशाने मिळवलेली जागतिक प्रसिद्धी हे तिथे जाऊनच अनुभवायला हवे. तिथल्या उंच पहाडांमध्ये असणाऱ्या खोल हिरव्या दऱ्या, गोठलेल्या हिमनद्या आणि रानफुलांनी गच्च भरलेली गवताळ कुरणे मनाला मोहून टाकणारी आहेत.

व्हिएन्ना हे ऑस्ट्रियाचे राजधानीचे शहर आहे. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वीच्या काळापासून इसवीसनाच्या १५व्या शतकापर्यंत सेल्टिक, ज्यू, रोमन, नाझी आणि नंतर मित्रराष्ट्रांच्या राजवटींचा अनुभव घेतलेल्या या देशात एकूण नऊ  छोटी-छोटी राज्ये आहेत. जर्मन भाषेची एक उपभाषा असणारी बव्हेरीयन भाषा ही ऑस्ट्रियाची अधिकृत भाषा आहे.

व्हिएन्ना हे जरी ऑस्ट्रियाचे राजधानीचे शहर असले, तरी या देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून मात्र साल्झबर्ग हेच शहर जगभर ओळखले जाते. ऑस्ट्रियाच्या उत्तर भागात साल्झबर्ग नावाचे एक राज्य आहे. त्या राज्यात एकूण १० शहरे समाविष्ट आहेत आणि ‘साल्झबर्ग’ याच नावाचे एक शहर या साल्झबर्ग राज्याची राजधानी आहे. या साल्झबर्ग शहराच्या मध्य भागातून ‘साल्झाक’ नावाची एक नदी वाहते. जर्मन भाषेत ‘साल्झबर्ग’ या शब्दाचा अर्थ मिठाची गढी असा होतो. या राज्यात आल्प्स पर्वतांनजीकच्या एका पठारावर वसलेले हॅलेइन् नावाचे एक गाव आहे. तिथे भूगर्भात मिठाच्या अनेक खाणी आहेत. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून या खाणींची मालकी साल्झबर्ग राज्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या खाणींतील मिठाचे उत्पादन आणि व्यापार यांमुळे साल्झबर्ग राज्याला आणि शहराला भक्कम आर्थिक आधार मिळालेला आहे. या खाणींतील मिठाच्या गोण्या घेऊन शिडांची अनेक जहाजे ‘साल्झाक’ नदीद्वारे साल्झबर्ग शहराकडे येत आणि ते सारे मीठ या शहरात व्यापारासाठी वितरित करत. मिठाच्या व्यापारासाठी या शहरात एक भक्कम गढीही बांधली गेली होती. त्यामुळेच या शहराचे नाव मिठाची गढी ऊर्फ ‘साल्झबर्ग’ असे पडले. या शहराला विविध कला-कौशल्यांचा मोठा वारसा लाभलेला आहे. अगदी जुना असा मध्यवर्ती भाग हा त्यातील बॅरॉक शैलीच्या इमारतींसाठी साऱ्या युरोपात प्रसिद्ध आहे. बॅरॉक वास्तुशैलीचा प्रसार युरोपमध्ये १७व्या शतकात झाला. या वास्तुशैलीतील इमारतींवर बाहेरून आणि आतून खूप नक्षीकाम आणि कलाकुसर केलेली असते. मध्य युरोपातील कॅथॉलिक चर्चेसच्या इमारती बॅरॉक वास्तुशैलीत बांधलेल्या आहेत. साल्झबर्ग शहरात या नक्षीदार वास्तुशैलीत बांधली गेलेली एकूण २७ चर्चेस आहेत. त्याशिवाय तेथील मिरॅबेल प्रासाद, हेलब्रुन पॅलेसेस् या इमारतीही बॅरॉक वास्तुशैलीतच बांधलेल्या आहेत. त्यामुळे या शहरास १९९६ साली युनेस्कोतर्फे जागतिक वारसास्थळाचा दर्जाही दिला गेला आहे. इथे तीन मोठी विद्यापीठेही असून तिथे येणाऱ्या देशोदेशीच्या विद्यार्थ्यांची संख्याही बरीच मोठी असते.

या शहरात फिरताना जागोजागी खूप सुंदर उद्याने दिसतात. जॉर्ज डॉनर सारख्या शिल्पकाराची उत्कृष्ट शिल्पे दिसतात, शिवाय रस्त्याकडेला छान रांगोळी-चित्रे काढणारे कलावंत आणि खास ऑस्ट्रियन परंपरेचे पोशाख घालून ऐटीत फिरणारे प्रेमिकही दिसतात. एका पॅलेसच्या आवारात आम्हाला सात-सीटर टॉप-बाईक नावच्या सायकलवर जाणाऱ्या दोन तरुणी दिसल्या, तर दुसरीकडे डोंबाऱ्यासारखे खेळ करणारा एक तरुणही आम्ही पाहिला.

हे साल्झबर्ग शहर अवघ्या युरोपात अभिजात पाश्चिमात्य संगीताचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरातच वुल्फगँग अ‍ॅमॅडियस मोझार्ट या विश्वविख्यात युरोपीय संगीतकाराचा जन्म झाला होता. या मोझार्टचे मूळ घर साल्झबर्ग शहरात गेट्रिडगासे नामक एका गल्लीत होते. हे घर १२व्या शतकात बांधलेले आहे. १७५६ मध्ये मोझार्टचा जन्म तिथे झाला आणि त्याचे बालपणही त्याच घरात गेले. २००६ साली आम्ही या साल्झबर्ग शहराला भेट दिली तेव्हा आवर्जून त्या गेट्रिडगासे गल्लीत जाऊन मोझार्टचे ते घर पाहून आलो. हा मोझार्ट त्याच्या वयाच्या ५व्या वर्षांपासूनच समर्थपणे व्हायोलिन आणि पियानो वाजवू लागला होता. वयाच्या १७व्या वर्षी त्याची नेमणूक साल्झबर्गच्या राजवाडय़ाचा संगीतकार म्हणून झाली. नंतर काही काळाने तो ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात स्थायिक झाला. तिथे राहून त्याने अनेक सिंफनीज, संगीतसभा, आणि ऑपेराज् दिग्दर्शित केले. त्याने स्वत: संगीत दिलेल्या जगप्रसिद्ध गीतरचनांची संख्या ६००हून अधिक आहे. १८व्या शतकातील अभिजात पाश्चात्त्य संगीताच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा संगीतकार म्हणून त्याने नावलौकिक कमावला होता. १७९१ साली वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी मोझार्ट मरण पावला.

इसवी सन १८८० पासून मोझार्टचे ते राहते घर एका म्युझियमच्या स्वरूपात जतन करण्यात आले आहे. त्या म्युझियममध्ये मोझार्ट वापरत असे ती व्हायोलिन्स, हार्प स्वरमंडळे, पियानो, बासरी ही वाद्ये, त्याची जुनी पत्रे, तो वापरत असलेले कपडे, फर्निचर आणि त्याची अनेक तैलचित्रे तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली आहेत.

हुबेहूब मोझार्टचाच पोशाख घातलेले स्वयंसेवक स्वागतासाठी घराच्या दारातच उभे असतात. त्या गेट्रिडगासे गल्लीतील अनेक माडय़ांवरून मोझार्टच्या सिंफनीजचे नादमधुर स्वर ऐकू येतात. अगदी तरुण वयात अवघ्या पाश्चिमात्य जगाला आपल्या जादुई संगीताने मोहून टाकणाऱ्या एका ऑस्ट्रियन संगीतकाराचे ते ऐतिहासिक जन्मस्थान पाहून आपण भारावून जातो.

vijdiw@gmail.com

First Published on August 9, 2019 12:23 am

Web Title: mozart salzburg austria abn 97
Just Now!
X