18 January 2019

News Flash

संगीत-नाटक घरा आले..

घराच्या संरचनेप्रमाणे नाटय़प्रयोग करणे आणि घरांमधील खोल्यांच्या आणि वस्तूंचा नेपथ्य म्हणून वापर केला जात आहे.

शास्त्रीय संगीत आणि नाटकासारख्या अभिजात कलांचे प्रयोग घरोघरी करून या कलेला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मुंबई आणि पुण्यातील काही तरुण मंडळी करीत आहेत. शास्त्रीय संगीतासारखा ठरावीक वर्गापर्यंत मर्यादित राहिलेल्या कलेचा प्रसार तळागाळापर्यंत करण्यासाठी आणि नाटकाची मांडणी वेगळ्या दृष्टिकोनातून करण्याच्या उद्देशाने घरोघरी प्रत्यक्ष जाऊन त्याचे कार्यक्रम वा प्रयोग करण्याचा नवा प्रवाह यामुळे रुजविला जात आहे. कोणते तरी निमित्त अथवा ठरवून या अभिजात कलांचे सादरीकरण ही तरुण मंडळी घरीच करीत आहेत. मुंबई पुण्याबरोबरच कोकणातही शब्द-सुरांचा प्रवाह सुरू झाला आहे.

नाटकांपासून दुरावत चाललेल्या प्रेक्षकांना पुन्हा नाटय़गृहामध्ये येण्यास भाग न पडता नाटकच त्याच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न मुंबई, पुणे आणि कोकणातील काही नाटय़प्रेमी मंडळी करीत आहेत. घराच्या संरचनेप्रमाणे नाटय़प्रयोग करणे आणि घरांमधील खोल्यांच्या आणि वस्तूंचा नेपथ्य म्हणून वापर केला जात आहे.

या शिवाय एका विशिष्ट वर्गापर्यंतच मर्यादित राहिलेल्या शास्त्रीय संगीताची गोडी तळागाळातील लोकांना लावण्याच्या हेतूने संगीताचे शिक्षण घेणारे काही विद्यार्थी धडपड करीत आहेत. यासाठी चाळींमध्येही फिरून शास्त्रीय संगीताच्या बैठकीचे आयोजन केले जात आहे.

भजन ते शास्त्रीय गायन..

मुंबई विद्यापीठात संगीतात पदवीचे शिक्षण घेणारा मिलिंद ठाकूर उत्तम हार्मोनियम वादक आहे. त्याचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू असतात. मात्र शास्त्रीय संगीताची गोडी तळागाळात पोहोचविण्याच्या उद्देशाने तो त्याच्या मित्रांसमवेत शास्त्रीय संगीताच्या बैठकींचे घरी वा परिसरात आयोजन करीत असतो. मुळातच मिलिंद हा मध्यमवर्गीय असल्याने त्याच्या घरी आणि आसपासच्या परिसरात शास्त्रीय संगीताबाबत रुची नव्हती. त्यामुळे घरापासूनच सुरुवात करण्याच्या उद्देशाने त्याने स्वत:च्या घरीच शास्त्रीय बैठकांचे आयोजन सुरू केले. दरवर्षी मिलिंद भांडुप परिसरातील ‘साई हिल’ येथे संगीत महोत्सव भरतो. या वेळी सुगम संगीत, भजन, भक्तिगीते आणि शुद्ध शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होतात. मित्रांच्या घरी महिन्यातील एखादा वार ठरवून संगीताची बैठक भरते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या कलाकारांच्या नातेवाईकांमध्येही संगीताची रुची निर्माण करण्याचे काम या निमित्ताने मिलिंद आणि त्याचे मित्र करीत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही नातेवाईक वा शास्त्रीय संगीताचे वातावरण नसणाऱ्या घरांमध्ये जाऊन बैठक करीत असल्याचे मिलिंद म्हणाला. या मुलांकडून अशा पद्धतीच्या बैठकीचे आयोजन केले जात असल्याचे समजल्यावर समाजातील काही उच्चभ्रू मंडळी आता या कलाकारांना घरी कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. बदलापूर येथील एका उद्योजकाच्या घरी दर एकादशीला शास्त्रीय गायनाची बैठक होत असल्याचे मिलिंद याने सांगितले.

प्रयोगाचं ओझंआनंददायी

‘थिएटर फ्लेमिंगो’ या गटाने पुणे-मुंबई ते अगदी कोकणापर्यंत उपक्रम सुरू केला आहे. घरीच जाऊन नाटकाचा विनामूल्य प्रयोग सादर केला जात आहे. पुण्यातील ललित केंद्रामधून नाटय़शास्त्राचे शिक्षण घेतलेल्या विनायक कोळवणकर याला सिनेमा वा मालिकांमध्ये करिअर करण्यापेक्षा नाटय़क्षेत्रात वेगळं काहीतरी करण्याची इच्छा होती. यासाठी नाटय़क्षेत्रातही वेगळा पायंडा पाडण्याकडे त्याचा कल होता. नाटकाला प्रेक्षक येत नाहीत, अशी ओरड नेहमीच कलाकार आणि नाटय़निर्माते करीत असतात. मात्र प्रेक्षकांना नाटकाला बोलावण्यापेक्षा नाटकच प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेलो तर, अशी भन्नाट कल्पना विनायकच्या मेंदूत जन्माला आली आणि घरोघरच्या नाटय़प्रयोगाला सुरुवात झाली. मुख्य म्हणजे नाटकांचे वेगवेगळ्या जागांमध्ये जाऊन प्रयोग करणे ही त्यामागील मूळ संकल्पना. त्यासाठी मग ‘थिएटर फ्लेमिंगो’ गटातील कलाकारांनी गावगावांत जाऊन प्रयोग करण्यास सुरुवात केली. याचा पुढचा टप्पा म्हणजे गावकऱ्यांवरच नाटक बसवून त्याचे सादरीकरण करण्यात आले. या दोन्ही प्रयोगांना मिळालेल्या यशामुळे या नाटय़चळवळीचा मोर्चा शहरी भागातील घरांकडे वळविण्यात आला.

मुंबईत घरोघरी जाऊन नाटकाचे प्रयोग सादर करण्याची जबाबदारी ग्रुपमधील सदस्य सुमेध म्हात्रे याने उचलली. यासाठी आसाराम लोमटे लिखित ‘आलोक’ या कथासंग्रहातील ‘ओझं’ ही कथा निवडण्यात आली. या कथेची बांधणी दोन्ही पद्धतीने म्हणजे नाटय़गृह आणि घराच्या चार भिंतीत करण्याच्या पद्धतीने करण्यात आली आहे. . प्रयोगाच्या वेळेच्या दोन तास आधी जाऊन आम्ही घराची पाहणी करतो. त्यानंतर घरातील कोणत्या जागेचा आणि वस्तूंचा वापर प्रयोगासाठी होईल, याची आखणी केली जात असल्याची माहिती सुमेधने दिली. आजवर या ग्रुपने पुण्या-मुंबईतील घरोघरी जाऊन ३० हून अधिक प्रयोग केले आहेत.

First Published on June 13, 2018 12:56 am

Web Title: music drama