डॉ. सलील कुलकर्णी, संगीतकार

करोनामुळे देशभर लागू झालेला टाळेबंदीचा काळ मी जास्तीतजास्त सकारात्मकपणे घालवत आहे.  ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन त्याचे संकलन शेवटच्या टप्प्यात आले होते. या चित्रपटाचे उर्वरित संकलन मी अभिजीत देशपांडेशी स्काईपद्वारे संवाद साधत पूर्ण केले. अभिनेता सुमीत राघवन, मोहन आगाशे, उर्मिला कानेटकर, मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या दरम्यान मला इंटरनेटच्या विविध पैलूंशी ओळख झाल्याचे सलील कुलकर्णी सांगतात.

दुसरी चांगली गोष्ट म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट दोनदा टीव्हीवर दाखवण्यात आला. लहानपणापासून विविध गाण्यांचे कार्यक्रम आणि गीतकार, संगीतकार भूमिकेतून स्वत:ला छोटय़ा पडद्यावर पाहिले आहे. मात्र दिग्दर्शक म्हणून स्वत:चा चित्रपट टीव्हीवर पाहणे हा वेगळा अनुभव असतो. चित्रपट पाहिल्यावर सर्वसामान्य माणूस कथा, संवादाशी भावनिक रीत्या जोडला जाणे हे माझ्या कामाचे यश मानतो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सुट्टीत मोकळा वेळ मिळत असल्याने आगामी चित्रपटाचे लेखनही करण्यास सुरुवात केली आहे.

मराठी कलाकारांनी आपल्या कामाची नोंद करणे गरजेचे असल्याचे माझे मत आहे. १९९८ ला  ‘एका माकडाने काढले दुकान’ हे पहिले बालगीत मी गायले होते, ते माझ्या संग्रही आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे समाजमाध्यमांचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल याचा अभ्यास करत आहे. मुलगा शुभांकरसोबत बालगीतांवर यू-टय़ुबचे सेशन करण्याचे ठरवले. यात बालगीते म्हणजे काय, त्याचे प्रकार, गाण्यामागील कहाणी, किस्से यावर गप्पा मारतो. या महिन्यात आम्ही याचे नऊ भाग करण्याचे निश्चित केले. शुभांकरला दहावीमुळे कमी वेळ मिळत असला तरीही एक तास तो यासाठी देतो आहे. करोनामुळे मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करत दोन्ही मुलांसोबत मी वेळ घालवतो आहे. ते काय पाहतात यावर माझे बारीक लक्ष असते. मुलांना काही चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट सुचवतो. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतो. नुकतेच मी त्यांचे केस कापायलाही मदत केली, असे त्यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना याचा फटका बसतो आहे. माझ्याबरोबर काम करणारा चालक, घरी काम करणाऱ्या मावशी यांची विचारपूस करतो आहे. वैद्यकीय शिक्षण घेतले असल्याने या काळात कोणती काळजी घ्यायची याबाबत इतरांनाही मार्गदर्शन करतो. संदीप खरे हा माझा चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र केलेल्या कविता, बालगीते, कार्यक्रमांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या उस्फूर्त प्रतिसादाची आठवण येते. यावर उपाय म्हणून आम्ही लाईव्ह गप्पा मारतो. सध्या कलाकार, लघुपट, गाणी, लाईव्ह सेशन या माध्यमातून संवाद साधतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. एक मार्ग बंद झाल्यास दुसरा मार्ग शोधणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे समाजमाध्यमाचा प्रभावीपणे उपयोग करत कलाकार व्यक्त होत आहेत. मीसुद्धा संगीताद्वारे व्यक्त होतो. संगीत ही माझ्यासाठी साधना आहे. त्यामुळे स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी संगीताची साधना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संकलन – मानसी जोशी