News Flash

बालक पालक

आताच्या तरुणांमध्ये लैंगिकता, लैंगिक विषयांबाबत चर्चा करण्याची मोकळीकता आहे.

चिन्मय पाटणकर

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळातही लैंगिक आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या विषयावर समाजात चर्चा होत नाही. त्यामुळे या विषयाची नेमकी माहिती मिळण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं तरुणांना वाटतं असा निष्कर्ष ‘नारी’ संस्थेच्या संशोधनातून पुढे आला आहे.

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचे वर्ष सुरू  झालेले असताना, इंटरनेट-स्मार्टफोनसारख्या माध्यमांतून विविध प्रकारच्या माहितीचा २४ तास मारा होत असताना, २१ व्या शतकातील विसावे वर्ष सुरू असताना लैंगिकता, लैंगिक शिक्षण, लैंगिक आरोग्य अशा विषयांबाबत आजही समाजात ‘अळीमिळी गुपचिळी’च आहे. मित्र-मैत्रिणींमध्ये मोकळेपणाने बोलले जाणारे लैंगिक विषय अजूनही त्यांच्यापुरतेच मर्यादित राहत आहेत. त्यामुळेच लैंगिक आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या विषयाबाबत नेमकं मार्गदर्शन मिळण्यासाठी पालकांचा सहभाग हवा असल्याची भूमिका १८ ते २४ वयोगटातील तरुणांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेतील (आयसीएमआर-नारी) संशोधकांनी या संदर्भात केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. संशोधनावर आधारित ‘अ क्वालिटेटिव्ह एक्स्प्लोरेशन टू अंडरस्टँड द सेक्शुअल बिहेवियर अँड नीड्स ऑफ यंग अडल्ट्स : अ स्टडी अमंग कॉलेज स्टुडंट्स ऑफ पुणे’ हा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राधिका ब्रह्मे , डॉ. मेघा मामूलवार, गिरीश राहाणे, सचिन जाधव, नारायण पांचाळ, राजेश यादव यांनी हे संशोधन केलं. अर्थात हे संशोधन पुणे आणि परिसरातील विद्यार्थ्यांवर आधारित असलं, तरी राज्यातील स्थिती काही फारशी वेगळी नाही. त्यामुळे कमी-अधिक फरकाने सर्वत्रच लागू होणारा हा विषय आहे. म्हणूनच हे प्रातिनिधिक स्वरुपातील संशोधन महत्त्वाचं आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

या संशोधनासाठी विधी, विज्ञान, कला आणि वाणिज्य या अभ्यास शाखांतील विद्यार्थ्यांसह नोकरदार तरुणांना सहभागी करून घेण्यात आले. आठ ते दहा जणांचा गट या प्रमाणे एकूण ७४ तरुणांचा यात सहभाग होता. त्यात ४० मुले आणि ३४ मुली होत्या. लैंगिक वागणूक, नातेसंबंध, विवाहपूर्व लैंगिक संबंध, एचआयव्ही, संसर्गजन्य आजार, समलैंगिक संबंध, निरोधक, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोबाइल, समाजमाध्यमांचा परिणाम, सुरक्षित शारीरिक संबंध अशा विषयांवर त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. या चर्चेदरम्यान तरुणांनी मांडलेल्या मतांचे विश्लेषण करण्यात आले. ८९ टक्के तरुणांनी पौगंडावस्थेत लैंगिक शिक्षण महत्त्वाचं असल्याचं मत मांडलं. लैंगिक शिक्षणाचा भाग म्हणून ७० टक्के तरुणांनी शाळा किंवा महाविद्यालयातील कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला. ९३ टक्के तरुण समाजमाध्यमांचा नियमितपणे वापर करतात. २४ टक्के तरुणांनी समाजमाध्यमांचा मोठा परिणाम होत असल्याचे मान्य केले. ४६ टक्के तरुणांनी समाजमाध्यमांचा मानसिक आरोग्य आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे मान्य केले. तसेच त्याशिवाय गुप्तरोग आणि एचआआयव्हीची चाचणी करून घेण्याबाबतची योग्य माहिती मिळण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध होण्याची गरजही तरुणांनी व्यक्त केली.

‘पौगंडावस्थेतील मुलांवर अनेक संशोधनं झाली आहेत. पौगंडावस्था ओलांडल्यानंतर तरुणांमध्ये काही एक प्रगल्भता आलेली असते, मोकळपणाने त्यांची मतं सांगू शकतात. तसंच त्यांच्या गरजा काय, समाजमाध्यमांचा वापर कसा करून घेता येईल हे शोधण्याचा प्रयत्न होता. व्यापक स्तरावरील संशोधन करण्यापूर्वी चाचणी म्हणून मर्यादित स्तरावरील एक संशोधन केलं जातं. त्यासाठी पुणे आणि परिसरातील विद्यार्थी-तरुणांशी संवाद साधण्यात आला. तरुणांना लैंगिक विषयातील माहिती मिळवण्यासाठी समाजमाध्यमे किंवा इंटरनेट हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे या संशोधनातून दिसून आले. आताच्या तरुणांमध्ये लैंगिकता, लैंगिक विषयांबाबत चर्चा करण्याची मोकळीकता आहे. या विषयांची माहिती ते समाजमाध्यमातून मिळवतात. मात्र, आजही समाजात लैंगिकता, लैंगिक संबंध, लैंगिक शिक्षण हा विषय ‘सोशल टॅबू’च आहे. त्यामुळेच तरुणांना पालक, शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणं महत्त्वाचं वाटतं. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे नैसर्गिकरीत्या आकर्षित होण्याशिवाय मित्रांकडून असलेलं दडपण, बाजूला काढलं जाण्याची भीती, वेगळं काहीतरी करण्याची उत्सुकता, मानसिक-भावनिक पाठिंब्याची गरज आणि पॉर्नोग्राफी अशी कारणं या तरुणांकडून देण्यात आली. या चर्चेदरम्यान लैंगिकता, लैंगिक आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या बाबत मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक माहिती असल्याचं दिसून आलं. तरुणांना शाळा-महाविद्यालयांमध्ये लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण या विषयावर वैज्ञानिकदृष्टय़ा बोलणं जाणं, पालकांसाठी या विषयावर कार्यशाळा घेतली जाणं महत्त्वाचं वाटतं,’ अशी माहिती वरिष्ठ संशोधिका डॉ. राधिका ब्रह्मे यांनी दिली.

‘मोकळी चर्चा हवी’

आता या संशोधनाच्या निमित्तानं काही मूलभूत मुद्दे समोर येतात. शालेय स्तरावर लैंगिक शिक्षण देण्यात येत असलं, तरी त्यात मोकळीक किती असते, की औपचारिकता म्हणून हे शिक्षण दिलं जातं याचा विचार व्हायला हवा. विशेषत: मासिक पाळीसंदर्भात मुलींमध्ये अद्यापही पुरेशी जागृती झालेली नाही. मासिक पाळीच्या काळात मुलींची शाळेतील उपस्थितीही कमी होत असल्याचं शिक्षण विभागाच्या संशोधनातून दिसून आलं होतं. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड्स किंवा तत्सम स्वच्छता साधनांचा वापर करण्याचे महत्त्वही पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नाही. ‘पॅडमॅन’ या चित्रपटातही हाच मुद्दा हाताळण्यात आला होता. शाळा-महाविद्यालयाच्या काळात एखाद्या मुलीशी किंवा मुलाशी मैत्री असली तरी अनेकदा त्याकडे निखळ मैत्री म्हणून पाहिलं जात नाही, त्या विषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जातात. प्रेमसंबंध असल्याचं मोकळेपणानं सांगितल्यास पालकांकडून ओरडाही बसतो. स्वाभाविकच पालकांनी-शिक्षकांनी मोकळेपणानं समजून घ्यायच्या वयात विद्यार्थ्यांमध्ये भीती बसते. घरात एकत्र दूरचित्रवाणी पाहताना चित्रपटात किंवा गाण्यात लैंगिक प्रसंग आला, तरी ती वाहिनी बदलली जाते. घरांमध्येच लैंगिक विषयावर मोकळेपणा नसल्यानं, असा विषय आल्यास विषय बदलला जात असल्यानं मुलांमध्ये गैरसमजुती निर्माण होतात. त्यातूनच पुढे जाऊन अनेक समस्या निर्माण होतात.

आता ही परिस्थिती कधी बदलणार, लैंगिकता-लैंगिक शिक्षण या विषयाकडे पाहण्याची मोकळी दृष्टी कधी येणार, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना खुलेपणानं कधी स्वीकारलं जाणार या प्रश्नांची ठोस उत्तरं मिळणं कठीण आहे. लैंगिक संबंध, संततीनियमनसारख्या विषयावर निकोप चर्चा होण्यासाठी र. धों. कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आग्रह धरला होता. आताचा काळ पुढे जात असताना समाजात, मानसिकतेमध्ये मोकळीकता येण्याऐवजी एकूणच दृष्टी संकुचित होताना दिसते. त्यामुळे प्रत्येक शिक्षक, पालकांनी विचार करून लैंगिक आरोग्य-लैंगिक शिक्षण या विषयाला बाजूला न बसवता त्यावर मोकळेपणानं चर्चा करणं आवश्यक आहे इतकंच म्हणता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 5:07 am

Web Title: nari organization sexual health and sexual education zws 70
Next Stories
1 चलती का नाम.. : त्याचं-तिचं दिसणं..
2 पेटटॉक : कायद्याचे भान ठेवा      
3 व्हेगन रेड लेन्टिल सूप
Just Now!
X