सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

आज ५ सप्टेंबर. शिक्षक दिन. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात व आपल्याला घडवतात. आजच्या दिवशी मानव जातीचे पहिले शिक्षक यांच्याबद्दल बोलू या! आपला पहिला शिक्षक कोण? सांगू शकाल? आपला पहिला शिक्षक म्हणजे निसर्ग!

मानव निसर्गाचे निरीक्षण करून त्याची नक्कल करून आजवरचा विकासाचा टप्पा गाठू शकला आहे. अगदी बुटाचे वेलक्रो ते बुलेट ट्रेनचा विकास अशा उदाहरणांची चर्चा करता येईल. बुटांची लेस मुलांना बांधता येत नाही किंवा त्यात वेळ जातो म्हणून लेसची जागा आज वेलक्रोने घेतली. १९४०-४१ या काळात एक स्विस इंजिनीअर जॉर्ज मेस्टलेर यांनी याचा शोध लावला. एकदा पाळीव कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर कुत्र्याच्या केसांना गोखरूचे बीज अडकलेले मेस्टलेर यांनी पाहिले. गोखरूच्या बीजावर हुकच्या आकाराचे अनेक आकडे असतात. हे आकडे प्राण्यांच्या केसांमध्ये अडकतात. निसर्गात या आकडय़ाच्या संरचनेचा बीजप्रसारासाठी उपयोग होतो. याचे निरीक्षण करून इंजिनीअरनी वेलक्रोचा शोध लावला. अगदी बूट, सँडलपासून ते अंतरिक्षयात्रीच्या स्पेस सूटपर्यंत हा वेलक्रो वापरला जातो.

सध्या अनेक रोग व ‘ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया’ हे संशोधक व डॉक्टरांसमोर मोठे आव्हान आहे. म्हणून बॅक्टेरियावर उपचार करण्याऐवजी जर त्यांच्या वाढीवर प्रतिबंध आणता आला तर रोग नियंत्रणात आणता येतो. याचे उत्तम उदाहरण निसर्गात पाहावयास मिळते. गॅलॅपगॉस शार्कच्या अंगावर अणकुचीदार काटे (कोनिकल प्रोजेक्शन) असतात. या काटय़ांमुळे त्याच्या अंगावर बॅक्टेरिया वास करू शकत नाहीत. या शार्कला बॅक्टेरियाचा त्रास होत नाही हे शास्त्रज्ञांना माहीत होते. असा अनुमान होता की त्याच्या जलद गतीमुळे असे असावे; परंतु हा शार्क संथगतीने पोहतो. सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्या अणकुचीदार काटय़ांबद्दल कळले. हे काटे बॅक्टेरियाला प्रतिरोध करतात व त्यांना शार्कच्या अंगावर बसू देत नाहीत. या अणकुचीदार काटय़ांची नक्कल करून असा पृष्ठभाग तयार केला आहे जो दवाखान्यातील भिंतींवर लावून बॅक्टेरिया येण्यावर मज्जाव आणते.

मानवाच्या विमान उड्डाणाच्या कल्पनेची प्रेरणा पक्ष्यापासून मिळाली आहे. लिओनादरे दा विंचीपासून ते राइट बंधूपर्यंत सर्वानी पक्षी उड्डाणाचे निरीक्षण करून विमानाचे विविध आकार तयार केले. आजदेखील गरुडाच्या उड्डाणाचे निरीक्षण करून विमाने सुरक्षित कशी उतरवता येतील याचा अभ्यास चालू आहे. तसेच गरुडापासूनच प्रेरणा घेऊन विनाधावपट्टी विमान उतरवता येईल का, यावर संशोधन चालू आहे.

पक्ष्यांची हाडे मजबूत पण पोकळ असतात. असे असल्याने त्यांचे वजन कमी होऊन उड्डाणासाठी मदत होते. इथूनच कमीत कमी संसाधनांचा उपयोग करून मजबुती मिळवण्यात इंजिनीअर्सना यश आले आहे. कीटकांच्या शरीररचनेपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. यांच्या शरीरावर कायटिन नावाचे आवरण असते. कायटिन कीटकाच्या शरीराला ओले होऊ  देत नाही. कायटिन मजबूत आहे, त्यातून हवा आरपार जाऊ  शकते. त्याच्या बांधणीतून विविध रंग तयार होतात. हे सर्व करण्यासाठी आपल्याला सात वेगवेगळी आवरणे वापरावी लागतात. आपण जर त्यांच्यापासून शिकून एकच आवरणामध्ये हे सर्व गुणधर्म आणू शकलो तर किती तरी मानवाचा फायदा होईल. नैसर्गिक संसाधनांवरचा ताण आपोआपच कमी होईल.

बुलेट ट्रेनचा शोध लागल्यावर जेव्हाही ट्रेन बोगद्यातून बाहेर येते तेव्हा तिच्या अतिशय वेगवान गतीमुळे मोठा आवाज निर्माण होई. हा आवाज टाळण्यासाठी किंगफिशर पक्ष्याच्या चोचीच्या आकाराचा व पाण्यात त्याच्या सूर मारण्याचा अभ्यास करून त्याप्रकारे बुलेट ट्रेनला आकार दिला गेला. अशा आकाराने बुलेट ट्रेनच्या गतीला होणाऱ्या हवेच्या रोधालादेखील प्रतिबंध आला व आवाजदेखील कमी झाला.

अशा प्रकारे मानवाने निसर्गाचा अभ्यास करूनच हा विकासाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे निसर्ग हाच मानवाचा पहिला गुरू आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. म्हणूनच या निसर्गाचे जतन करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

चूकभूल

‘घरातलं विज्ञान’ या सदरातील दि. २९ ऑगस्ट रोजीच्या ‘तापमापी’ या लेखात ‘फॅरेनहाइटनेच १९१४ साली पाऱ्याचा समावेश असलेली तापमापी बनवली’ असा उल्लेख झाला आहे. प्रत्यक्षात १७१४ साली पाऱ्याचा समावेश असलेली तापमापी बनवण्यात आली होती. त्याचप्रमाणे या लेखात अन्य एका ठिकाणी ‘अंश फॅरेनहाइट’च्या ऐवजी ‘शून्य फॅरेनहाइट’ असे अनवधानाने प्रसिद्ध झाले होते. सजग वाचकांनी ही चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.