|| आशुतोष बापट

नवरात्र म्हणजे शक्तीची आराधना करण्याचा उत्सव. देवीची विविध रूपे, त्यांच्याशी संबंधित आख्यायिका जाणून घ्यायच्या असतील, तर राज्यात ठिकठिकाणी असलेल्या देवीस्थानांना भेट द्यायला हवी. राज्याच्या विविध भागांतील देवीस्थानांचे स्थापत्य आणि तेथील शिल्पकला प्रेक्षणीय आहे.

शक्तीचा उत्सव, तिचा जागर, तिची उपासना नवरात्रीच्या निमित्ताने सर्वत्र सुरू आहे. नवरात्रपर्व म्हणजे प्रसन्न, उत्साही आणि भारावलेले दिवस. आदिशक्तीची विविध रूपांत केली जाणारी पूजा, उपासना यांचे हे दिवस. देवीची ही बहुविध रूपे माणसाला कायमच मोहवत आलेली आहेत. याची प्रचीती अगदी प्राचीन काळच्या नाण्यांवर असलेल्या देवीच्या अंकनापासून दिसून येते. देवी या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. विविध लोककथा, लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते. सर्वसामान्य जनतेला अत्यंत जवळची वाटणारी ती देवता आहे. प्रत्यक्ष आई असेच तिला संबोधन असल्यामुळे तिच्याशी असलेले नाते विलक्षण आहे.

या नवरात्रीनिमित्ताने अनेक लोक विविध व्रते पाळताना दिसतात. देवीस्थानांची भटकंती हे व्रत जर आपण घेतले तर आपल्याला आपले आराध्य दैवत आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यांत विविध रूपांत वसलेले दिसेल. देवता तीच परंतु तिची उपासना किती वैविध्यपूर्ण पद्धतींनी केली जाते हे समजेल. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार.. या न्यायाने माणसाला शहाणपण येण्यासाठी देशाटन हा एक मार्ग सांगितलेला आहे. मग देवीस्थानांची भटकंती ही जर का ठरवून केली तर आदिशक्तीचे विविध रूपांतील दर्शन तर होईलच परंतु त्याचसोबत निरनिराळ्या प्रांतात पर्यटनसुद्धा सध्या होईल. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात एकेक आकर्षक आणि तितकेच वैशिष्टय़पूर्ण असे देवीचे स्थान वसलेले आहे. त्या ठिकाणी आवर्जून भेट देऊन देवीची विविध रूपे न्याहाळावीत.

मराठवाडय़ात नांदेडजवळील मुखेडला जावे. तिथे असलेल्या दाशरथेश्वर मंदिरावर नृत्यमग्न सप्तमातृका दिसतील. शंकराने अंधकासुरवधाच्या वेळी देवांकडे त्यांच्या शक्ती मागितल्या आणि त्यांच्या मदतीने अंधकासुराचा वध केला. याच त्या सप्तमातृका. मुखेडला या नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्या मूर्ती जरी काही अंशी भग्न झाल्या असल्या तरीसुद्धा त्यातला उठावदारपणा आणि सौंदर्य केवळ नजरेत साठवून ठेवण्यासारखे असते. मराठवाडय़ातच अंबडला जावे. तिथे असलेल्या मत्स्योदरी देवीचे दर्शन घ्यावे. ‘मत्स्यश्वरदरम यास्यासामत्स्योदरी’ या उक्तीप्रमाणे या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे. समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा हा डोंगर दिसतो. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अंबरीष ऋषींनी कठोर तपश्चर्या करून आणि अनुष्ठाने करून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन स्वरूपांत इथे देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. अंबड परगणा हा होळकरांच्या खासगी दौलतीचा एक भाग होता. ही खासगी दौलत पेशव्यांकडून मल्हारराव होळकरांना एक विशेष अधिकार म्हणून मिळाली होती. आपले राज्य वृद्धिंगत व्हावे यासाठी अनेक सेवा, इनामे होळकरांनी दिली होती. डोंगरावर वसलेले हे ठिकाण मोठे रमणीय आहे. मंदिरावरील तीन धडे आणि एकच तोंड असलेल्या माशाचे वैशिष्टय़पूर्ण शिल्प मुद्दाम बघावे.

कोकणात कोटकामते या गावी जावे. देवगड तालुक्यातले हे आख्खे गावच देवीला इनाम म्हणून दिले आहे. या गावाला पूर्वी एक प्राचीन कोट होता. त्याची साक्ष म्हणून रस्त्याकडेला फक्त एक बुरूज आणि थोडीफार तटबंदी आजसुद्धा दिसते. मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याची नोंद म्हणून मंदिराच्या भिंतीवर एक देवनागरी लिपीमधील ऐतिहासिक शिलालेख बसवला आहे. मंदिराच्या आवारात तोफा आहेत.

कोकणातच गजलक्ष्मीच्या मूर्ती बऱ्याच बघायला मिळतात. तिकडे त्यांना ‘भावई देवी’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोठोस, झाराप इथल्या गावच्या ग्रामदेवता असलेल्या भावईचे दर्शन घ्यावे. कमलासनावर देवी बसलेली आहे आणि दोन बाजूंनी दोन हत्ती तिच्यावर घागरीतून पाणी ओतून अभिषेक करताहेत असे हे देखणे शिल्प. हिलाच गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी असेही म्हणतात. तसेच कोकणात कुणकावळे गावी जावे. तिथेही दुर्गेची उभी असलेली फार सुंदर मूर्ती दिसते. देवीची वस्त्रे आणि तिच्या अंगावर असलेले विविध दागिने फारच सुंदर दिसतात.

नगर जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या अकोले तालुक्यातल्या टाहाकारी गावी जावे. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते.

अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादव कालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हाताच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दिसतात. मंदिराच्या अंतराळावर असलेल्या छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक अप्रतिम दगडी झुंबर कोरलेले आहे. टाहाकारी मंदिराच्या बाह्य़ अंगावर अनेक अप्सरा ज्यांना सूरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सूरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपीय पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे.

काही मंदिरे जशी देवीसाठी प्रसिद्ध आहेत, तशीच काही मंदिरे तिथे असणाऱ्या स्थापत्य चमत्कारांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या राशीनला जावे. गावात इ.स. च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेले श्रीयमाई किंवा श्रीजगदंबा देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. या डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. हा स्थापत्य चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे. पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वरांचे राशीन हे गाव. मंदिरातल्या एका ओवरीमधील एका संस्कृत आणि एका मराठी शिलालेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. इथे एकूण पाच शिलालेख आहेत.

गावोगावी नुसत्या पाषाणरूपात असलेल्या सटवाई, भैराई, पावणाई अशा देवींपासून ते अगदी सुबक शिल्पकाम केलेल्या मंदिरात स्थित देवींपर्यंत विविध देवीस्थानांची आपल्याकडे रेलचेल आहे. गरज आहे फक्त बाहेर पडून मुद्दाम त्यांचे दर्शन घेण्याची. या नवरात्रीचा मुहूर्त साधून हे नवनवीन स्थाने पाहण्याचे व्रत हाती घ्यावे त्याने मनाला आनंद तर मिळेलच शिवाय ज्ञानात आणि अनुभवातही मोठी भर पडेल.

ashutosh.treks@gmail.com