• हिमालयातच नव्हे तर कुठेही ट्रेकसाठी जाताना तेथील निसर्गाचे सर्व नियम पाळा. आपल्या आनंदासाठी किंवा सोयीसाठी आपण तेथील नैसर्गिक संपदेवर घाला तर घालत नाही ना, याचे भान सतत राखा.
  • काही ट्रेकर्स जेवताना प्लेटवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल घेतात किंवा लॅमिनेटेड पेपर प्लेट वापरतात. ही फॉइल किंवा प्लेट वापरून झाल्यावर तिथेच फेकून देतात. नैसर्गिकरीत्या विघटन होऊ न शकणारा हा कचरा परिसरात पसरून पर्यावरणाची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे जेवणासाठी धातूच्या किंवा प्लास्टिकच्या प्लेट वापराव्यात. वापरून झाल्यानंतर त्या पाण्याने धुवाव्यात.
  • बर्फावरून घसरताना (स्लाइड करताना) प्लास्टिकच्या पिशवीवर बसून घसरू नका. त्यामुळे स्वत:चा वेग नियंत्रित ठेवणे कठीण जाते.
  • अति थंड हवामानात ओले कपडे अंगावर असतील तर हायपोथर्मिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा हवामानात ओले कपडे लवकरात लवकर बदलावेत.
  • हाय अल्टिटय़ूड सिकनेसची चिन्हे दिसत असतील तर ही बाब इतरांच्या लक्षात आणून द्यावी व त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. हाय अल्टिटय़ूड सिकनेस कमी होत नसेल तर लवकरात लवकर कमी उंचीच्या ठिकाणी जावे.
  • हाय अल्टिटय़ूड सिकनेस होऊ नये म्हणून काही ट्रेकर्स घरातून निघाल्यापासून प्रतिबंधक गोळ्या घेणे सुरू करतात. तसे करणे चुकीचे आहे. विरळ हवेशी नैसर्गिकरीत्या जुळवून घेणे म्हणजेच योग्य प्रकारे अ‍ॅक्लिमटाइज होऊन नंतरच उंची गाठणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
  • हृदयरोग, उच्च रक्तदाब, दमा, मधुमेह किंवा इतर काही आजार असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच अशा अति उंचीवरील ठिकाणी किंवा हिमालयातील ट्रेकला जावे.