मानवाने त्याच्या या कायम शोधक बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर करून तंत्रज्ञानाची प्रगती केली आणि बदलत्या काळासोबत मानवनिर्मित असे हे तंत्रज्ञानदेखील बदलत गेले. तंत्रज्ञानामध्ये काळानुरूप अद्ययावतीकरण होऊन मानवाची दैनंदिन जीवन अधिक सुखकर झाले. या तंत्रज्ञानाला जागतिकीकरणाची साथ मिळून तंत्रज्ञान ही मानवाच्या प्रमुख तीन गरजांसोबत चौथी महत्त्वाची गरज होऊन गेली. गेल्या दहाएक वर्षांत ही प्रगती होत असताना २०२० हे वर्ष त्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून मानलं जात आहे. तेच वर्ष कालपासून सुरू झालं. अशा या नव्या वर्षांत आपल्यासमोर तंत्रज्ञानानं काय वाढून ठेवलंय, त्यावर एक दृष्टिक्षेप.

नेकमसाजर

धकाधकीच्या आयुष्यात व्यक्तीला अधिक व्याधी जडू लागल्या आहेत. रोजच्या खटाटोपातून निवांतपणा मिळावा याकरिता अनेक जण मालिश करून घेण्यास प्राधान्य देतात. मात्र आता एका अद्ययावत यंत्राच्या साहाय्याने अतिशय उत्तमप्रकारे घरच्या घरी स्वयंचलित उपकरणाद्वारे मालिश करता येणार आहे. ‘नेकमसाजर’ हे स्वयंचलित मालिश करणाऱ्या उपकरणाची नव्या वर्षांत बाजारात विक्री होणार आहे. हे उपकरण केवळ व्यक्तीला त्याच्या मानेला लावायचे आहे. त्यानंतर संपूर्ण मान आणि पाठीला आराम मिळेल अशाप्रकारे हे यंत्र मालिश करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही यासारखी यंत्रे बाजारात होती मात्र इतर उपकरणांच्या तुलनेत ‘नेकमसाजर’ यंत्रात अधिक अद्ययावतीकरण असणार आहे.

एक्स वॉच-

बाजारात अनेक स्मार्ट घडय़ाळे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खेळाडूंपासून ते व्यवसाय करणाऱ्या व्यस्त माणसांना सोयीस्कर होईल अशा सुविधा या स्मार्ट घडय़ाळ्यांमध्ये दिसून येतात. मात्र नव्या वर्षांत असेच एक नवे स्मार्ट घडय़ाळ ग्राहकांना विकत घेता येणार आहे. ‘एक्स वॉच’ असे या स्मार्ट घडय़ाळ्याचे नाव असून या घडय़ाळ्याद्वारे स्वत:च्या आरोग्याचा तंतोतंत तपशील वापरकर्त्यांला मिळणार आहे. तुमच्या आरोग्यावर परिपूर्ण लक्ष ठेवणारे आणि विविध समस्यांवर उपाय सुचवणारे असे हे घडय़ाळ आहे.

टॅपअ‍ॅनचार्ज चार्जर

टॅपअ‍ॅनचार्ज हे चार्जर बाजारात नव्याने दाखल होणार असून सर्वच नव्या मोबाइल फोनच्या वापरासाठी हे गॅजेट महत्त्वाचे ठरणार आहे. या चार्जरचे वैशिष्टय़ म्हणजे हे चार्जर वायरलेस असून कोणत्याही वायरीशिवाय मोबाइल चार्ज करता येणार आहे. हे चार्जर नव्या आवृत्यांच्या सर्वच मोबाइल फोनला सपोर्ट करते. मोबाइल फोन या चार्जरच्या पृष्ठभागावर ठेवल्यानंतर मोबाइल फोनचा वायफाय सुरू करावा लागतो. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मोबाइल पूर्ण चार्ज होतो. त्यामुळे अल्पवधीतच या चार्जरला बाजारात मोठी मागणी वाढली आहे.

इकोबीट

नव्या वर्षांत इकोबीट हे इयरफोन वस्तूंमधील एक अग्रगण्य उत्पादन असणार आहे. अ‍ॅपल कंपनीच्या एअरपॉडसारखेच दिसणाऱ्या, मात्र आवाज, रंग आणि आकाराची नावीन्यता इकोबीटमध्ये असणार आहे. तसेच ग्राहकांना परवडेल अशी या इकोबीटची किंमत असणार आहे. सायकल चालवणे, चालणे आणि धावणे यांसारख्या इतर कोणत्याही परिस्थितीत इकोबीट कानातून पडणार नाही अशाप्रकारे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. एकदा कानात घातल्यावर स्वत: हाताने जोपर्यंत इयरफोन काढत नाही तोपर्यंत ते निघणार नाही, असे या इयरफोनचे वैशिष्टय़ आहे.

ड्रोन एक्स

बाजारात सध्या मोठय़ा प्रमाणात ड्रोनची मागणी मोठय़ा प्रमाणात असली तरी नव्या वर्षांत ‘ड्रोन एक्स’ या उपकरणाला जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. मोबाइलच्या आकाराचा असलेला हा ‘ड्रोन एक्स’ शिकाऊ  छायाचित्रकारांच्या वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच त्याची किंमतही अतिशय कमी असून तो वापरणेही सोयीचे ठरत आहे.

संकलन- ऋषिकेश मुळे