25 May 2020

News Flash

लठ्ठपणा अन् आहार

लठ्ठपणा हा फक्त वजनाशी निगडित नसून शरीराची चयापचय क्रियेशी (मेटाबॉलिझम) निगडित आहे.

डॉ. जयश्री तोडकर

लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालणाऱ्या असल्यामुळे यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे जडलेली स्थूलता किंवा लठ्ठपणा यांवर मात करण्यासाठी आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

पोटाचा वाढलेला घेर, वाढलेले वजन आपण लठ्ठपणाकडे झुकत आहोत हे जरी दिसून येत असले तरी वैज्ञानिक पद्धतीने लठ्ठपणाचे प्रमाणही मोडले जाते. लठ्ठपणाचे वर्गीकरण करण्यासाठी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) वापरण्यात येतो. बॉडी मास इंडेक्स हा वजन आणि उंचीनुसार मोजला जातो.

१) बीएमआय १८ ते २५ – सामान्य

२) बीएमआय २५ ते ३० – लठ्ठ

३) बीएमआय ३० ते ३५ – लठ्ठपणाची पहिली अवस्था

४) बीएमआय ३५ ते ४० – लठ्ठपणाची दुसरी अवस्था

५) बीएमआय ४० च्या वर – लठ्ठपणाची तिसरी अवस्था

कंबरेचा घेर स्त्रियांमध्ये ८० सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ते अनेक आजारांना आमंत्रण असते.

सर्वसाधारणपणे लठ्ठपणा हा कुटुंबामध्ये दिसून येतो.

आनुवंशिकतेमुळे आढळणारा लठ्ठपणा केवळ १० टक्के असतो. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ज्या घरांमध्ये मधुमेह असतो, त्या घरांमध्ये लठ्ठपणामुळे अत्यंत लहान वयात मुलांनाही मधुमेहाची बाधा होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा हा फक्त वजनाशी निगडित नसून शरीराची चयापचय क्रियेशी (मेटाबॉलिझम) निगडित आहे.

लठ्ठपणामुळे येणाऱ्या व्याधी

* अवेळी सांध्यांची झीज होणे, अतिवजनामुळे गुडघेदुखी, पाठीच्या मणक्यावर येणारा ताण, पायावर सूज येणे, व्हॅरीकोज व्हेनिस – पायावरच्या शिरा फुगणे आणि हिरव्या आणि निळ्या होणे, हर्निया तयार होणे.

* श्वसनाला अडथळा होणे.

* लघवीचा कंट्रोल निघून जाणे.

* वाढत्या पोटामुळे लघवीचा कंट्रोल निघून जाणे, मळमळ, जळजळ, आम्लपित्त(अ‍ॅसिडिटी) होणे.

* झोपल्यानंतर अन्न वर येणे, घोरण्याचा आजार. यामध्ये शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन श्वास बंद पडण्याचा धोका असतो. आणि मृत्यू होण्याचाही धोका असतो.

* वजनाचा हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होऊन हृदयविकाराचे प्रमाण हे लठ्ठ लोकांमध्ये १५ टक्के जास्त आढळते.

* चयापचय क्रिया अतिरिक्त चरबीमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये बिघाड होणे, हार्मोन्सचे असंतुलन होणे यांमुळे खालील विविध आजार होऊ शकतात.

* उच्च रक्तदाब, टाइप २ मधुमेहाचे, कोलेस्टेरॉलचे आजार, रक्तवाहिन्या आतून जाड होणे आणि विविध अवयव बंद पडण्याचा धोका असतो. यातूनच हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व येणे असे विविध आजार होऊ शकतात.

*  शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण विषम झाल्यामुळे प्रजननक्षमता कमी होणे. नपुंसकता येणे हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. पाळी अनियमित येणे. शुक्रजंतूंची वाढ न होणे, मुलांमध्ये छातीचा आकार मोठा होणे आणि मुलींमध्ये दाढी, मिश्या येणे इत्यादी प्राथमिक लक्षणे दिसतात.

वयानुसार आहारामध्ये बदल आवश्यक

आपल्याकडे आहाराबद्दल प्रचंड जागरूकता किंवा कमालीची उदासीनता अशी दोन टोके दिसून येतात. काही घरांमध्ये अति वजनाच्या व्यक्ती तर काही घरांमध्ये कुपोषित किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असलेल्या व्यक्ती आढळतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यानुसार आहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे. आहारामध्ये सर्वसामान्यपणे कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि उष्मांक. (कॅलरीज) असे चार प्रमुख घटक मानले जातात. आपल्या आहारात सर्वसाधारणपणे काबरेदकांचे प्रमाण सर्वाधिक असते. जेवण आणि न्याहरी याचे प्रमाणही समजून घेणे आवश्यक आहे.

आहाराची मूलतत्त्वे

* आहारामध्ये विविधता असणे हे योग्य. सर्व प्रकारची धान्ये आणि डाळी हे मुख्य मूलघटक आहेत. आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी अंडी, मांसाहारी पदार्थ, मासे, विविध डाळी, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असावा. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्वे, सूक्ष्म पोषक घटक (मायक्रोन्यूट्रियन्स) आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. विविध प्रकारचे आजार किंवा वजनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी हे नेहमीच्या आहारात असणे आवश्यक आहे. आहारात स्थानिक भाज्या, फळांचा समावेश असावा.

* आहारात तेल, तेलबिया आणि मांसाहारी पदार्थाचा वापर शक्यतो कमी असावा. तसेच तेल, तूप, लोणी, वनस्पती तूप यांच्या वापरावर नियंत्रण असावे. काही मूलघटकांचे रक्तामध्ये शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थ उपयुक्त असतात. स्निग्ध पदार्थामुळे भूक भागल्याची भावना वारंवार निर्माण होते. आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यास कोलॅस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आजार बळावण्याचा संभव असतो.

* लठ्ठपणा आणि वजनवाढ रोखण्यासाठी जास्तीचे खाणे टाळावे. अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ, तेलकट पदार्थ, जंकफूड खाल्ल्यामुळे चरबी अधिक वाढण्यास मदत होते. त्यामुळे स्थूलत्व येते.

* योग्य वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोजचा व्यायाम, शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे.

* आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. मिठाच्या अतिवापरामुळे उच्चरक्तदाब किंवा मूत्रपिंडाच्या समस्या सुरू होतात.

* अन्न शिजवण्याच्या योग्य पद्धतीचा वापर करावा. अन्न शिजविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्या पदार्थामधील पोषक मूलद्रव्ये निघून जातात.

* दिवसभरात तीन लिटर पाणी घ्यावे. सर्वसाधारण सामान्य प्रकृतीच्या व्यक्तींनी दिवसभरात कमीतकमी तीन लिटर पाणी प्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 2:41 am

Web Title: obesity and diet zws 70
Next Stories
1 आजारांचे कुतूहल : टॉन्सिल्स
2 योगस्नेह : भ्रामरी प्राणायाम
3 आरोग्यदायी आहार : बाजरी खिचडी
Just Now!
X