|| शैलजा तिवले

लहान मुलांमधील लठ्ठपणा किंवा स्थूलता दिवसेंदिवस वाढत असून आता ग्रामीण भागांतही नोंद घेण्याइतपत दिसून येत आहे. जंकफूड किंवा बंद पाकिटातील ‘रेडी टू ईट’ पदार्थाचे सेवन, कमीत कमी शारीरिक हालचाल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अतिवापर यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

लहान मूल जितके गुटगुटीत तितके ते अधिक सुदृढ असा आपल्याकडे पारंपरिक गैरसमज आहे. त्यामुळे मुलांचे गुबरे गाल हे कोणत्या मर्यादेपर्यंत योग्य आहेत, मुलाचे वजन वाढत असले तरी ते लठ्ठपणाकडे किंवा स्थूलतेकडे झुकत नाही ना, याबाबतची साक्षरता अजून तरी आपल्याकडे आलेली नाही. यामुळेच मग मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात.

स्थूलता किंवा लठ्ठपणा हा आत्तापर्यंत मोठय़ांमध्ये आढळणारा आजार असे मानले जायचे. परंतु गेल्या काही वर्षांत हे अनुमान बदलले असून किशोरवयातील आणि त्याखालील वयोगटातील मुलेही लठ्ठपणाच्या तक्रारी घेऊन येत असल्याचे ओबेसिटी सर्जन डॉ. अभय अगरवाल सांगतात. लहान मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण गेल्या वीस वर्षांत दहा पटीने वाढले आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. पूर्वी मुले दिवसभरात काही तास खेळायची त्यामुळे शारीरिक हालचाल होत असे. परंतु आता मैदानी खेळ हरवलेच असल्याने मूल घरात किंवा शाळेत बसूनच असते. त्यामुळे शारीरिक हालचाल किंवा व्यायाम होत नाही. अशा परिस्थितीत जंकफूड किंवा रेडी ईट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने मुले स्थूल होण्याकडे कल वाढत आहे.

मुलांमधील लठ्ठपणाबाबत अधिक विश्लेषण करताना आबेसिटी सर्जन डॉ. संजय बोरुडे सांगतात, सर्वसाधारणपणे मुलांमधील स्थूलतेचे दोन भाग असतात. दहा वर्षांखालील मुलांना शक्यतो आनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर त्यावरील मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणा येतो.

आनुवंशिक लठ्ठपणा

आई-वडील स्थूल असल्यास मुलामध्येही स्थूलता येण्याची शक्यता असते. काही मुलांमध्ये आनुवंशिकपणे स्थूलता आलेली असते. या प्रकारच्या स्थूलपणामध्ये मुलांचे वजन कमी करण्यासाठी बहुतांश करून आहार आणि व्यायामावर भर दिला जातो. मोठय़ा माणसांना लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी काय करायला हवे हे सांगून करून घेता येते. मात्र लहान मुलांना या बाबी पटवून देणे आणि त्यांच्याकडून आहारावर नियंत्रण आणि व्यायाम करून घेणे अवघड आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा वेळी मग पालकांना आहाराबाबत समुपदेशन केले जाते. आनुवंशिक लठ्ठपणा आलेल्या मुलाला भविष्यातही लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठे झाल्यावरही या बालकांना आहार आणि व्यायामावर भर देणे गरजेचे असते.

जीवनशैलीमुळे आलेला लठ्ठपणा

सातत्याने जंकफूड खाणे, मोबाइल, व्हिडीओ गेम यांमुळे कमीत कमी शारीरिक हालचाल यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो. दहा वर्षांवरील मुलांमध्ये दिसून येणारा हा लठ्ठपणा वेळीच लक्षात आल्यास आहार किंवा व्यायामाच्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. परंतु वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास मात्र शस्त्रक्रिया करणे भाग असते.

उपचारपद्धती

लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत. आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गानेच वजन कमी करता येते. पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये शक्यतो बॅरियाटिक शस्त्रक्रिया करणे टाळले जाते. अशा बालकांमध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शक्यतो आहार आणि व्यायामावरच भर दिला जातो. लठ्ठपणावर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. आनुवंशिकतेने लठ्ठपणा आला आहे का याच्या चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. दहा वर्षांवरील मुलांमध्ये मात्र लठ्ठपणा वाढतच असेल आणि शरीराला त्रासदायक होत असल्यास शस्त्रक्रिया करून अतिरिक्त चरबी काढली जाते. शक्यतो ही शस्त्रक्रिया एकदाच करावी लागते.

मुलांमधील स्थूलतेची लक्षणे

मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १५ किलो वजन अधिक असणे म्हणजे मूल स्थूलतेकडे झुकत आहे, असे म्हणता येईल. घरी बसल्या बसल्याही हालचाली संथ होणे, मैदानी खेळ न खेळणे, वजन सतत वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे ही साधारण लक्षणे मुलांमध्ये दिसून येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्थूलपणा वाढल्यास..

लठ्ठपणा हा आजारांचे द्योतक आहे. मूल हे गुटगुटीत दिसत असले तरी त्याच्या शरीरातील चरबीचे प्रमाण मर्यादित असणे आवश्यक आहे. हे प्रमाण वाढले की तसतसे शरीरात इन्सुलीनचा प्रतिरोध निर्माण व्हायला लागतो. मग मधुमेह, श्वसनाचे आजार, रक्तदाब अन्य आजारही जडायला लागतात. अशा मुलांना हृदय, मूत्रपिंड, डोळ्यांच्या आजारांची बाधा लवकर होण्याची शक्यता असते.

जनजागृती मोहीम

लहान मुलांवरील स्थूलतेवर वेळीच लक्ष केंद्रित केले तर या भावी पिढीला भविष्यात विविध आजारांनी ग्रस्त होण्यापासून वाचवू शकू, या उद्देशातून डॉ. बोरुडे यांच्या पुढाकाराने चाईल्ट ओबेसिटी सपोर्ट टीम निर्मिती केली आहे. वैद्यकीय मदत, मार्गदर्शन आणि यासोबतच लठ्ठपणा, मुलांच्या लठ्ठपणाचे निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांची माहिती, कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देणे, विमा कंपनीच्या मदतीने खर्च कसा उभारता येईल यावर मार्गदर्शन संकेतस्थळाच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाबाबत घर, शाळा आणि बाहेरील वातावरणामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याचा आपोआपच परिणाम मुलांच्या वागण्यावर होतो.

जंकफूड खाण्यावर नियंत्रण

तोंडाला पाणी सुटणारे जंकफूडचे पदार्थ अवतीभवती दिसत असताना त्यापासून त्यांना दूर ठेवणे अशक्य आहे. तेव्हा आठवडय़ातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा कुटुंबासह असे पदार्थ खाण्यास हरकत नाही, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी देतात. त्या पुढे सांगतात, आमच्याकडे येणारे पालक म्हणतात, आम्ही बाहेर खायला जातच नाही, तर घरीच बाहेरचे खाणे येते. हवे तेव्हा बाहेरचे मागविण्याच्या सवयीवर र्निबध आणणे आवश्यक आहे. पालकांनी ही बंधने पाळल्यास मुलांनाही मग हळूहळू सवय लागते.

स्थूलतेकडे जाऊ नये यासाठी..

बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान दिल्यानेही स्थूलता रोखण्यास मदत होते. मुलाला दुधाव्यतिरिक्त आहार सुरू केल्यानंतर पूर्णत: घरी तयार केलेले पदार्थच द्यावेत. यामध्ये मग दुधातले नाचणीचे सत्त्व, तांदूळ-मुगाच्या डाळीची खिचडी, बटाटय़ाची फोड असे हलके पदार्थ द्यायला हरकत नाही. विविध फ्लेवरसह सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डबाबंद पावडर आणून घरी बनवून देणे टाळणेच उत्तम! दुधात बिस्किटे देऊ  नयेत. साखर किंवा गूळ याचा अतिवापर नसलेले पदार्थ शक्यतो द्यावेत, असे आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी सांगतात.