13 July 2020

News Flash

ऑक्टोबरमधील ‘गारवा’!

ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाने परतीची वाट धरली नसली तरी उन्हाचे असह्य़ चटके सुरू झालेले आहेत.

|| डॉ. वैशाली जोशी, आहारतज्ज्ञ

ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाने परतीची वाट धरली नसली तरी उन्हाचे असह्य़ चटके सुरू झालेले आहेत. पावसाने थंड झालेली हवा अचानक गरम होते आणि रणरणते ऊन, प्रचंड घाम, सारखी लागणारी तहान याने सगळेच बेजार झालेले आहेत. तहान भागविण्यासाठी शीतपेय आणि बर्फाचे पाणी रिचवण्यापेक्षा थंडावा देणारी नैसर्गिक शीतपेये शरीरासाठी नक्कीच आरोग्यदायी आहेत.

कडक उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढते. वाढलेल्या उष्णतेमुळे नाकाचा घोणा फुटणे, उष्माघात होणे, शरीरातील पाणी कमी झाल्याने चक्कर येणे, अशक्तपणा येणे व हृदयावर ताण, स्नायूत पेटके येणे, डोकेदुखीचा त्रास होणे, लघवी कमी होणे अथवा लघवीतून रक्त जाणे, शौचाला आग होणे किंवा रक्तस्राव होणे, रक्तदाब वाढणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन आजारांना तोंड द्यावे लागते.

ही काळजी घ्या..

हे सर्व त्रास टाळण्यासाठी दुपारच्या रणरणत्या उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे. टोपी, गॉगल व छत्री यांचा वापर करावा. पाण्याची बाटली जवळ ठेवावी. घट्ट कपडे घालू नये तसेच बंद बूट घालणे टाळावेत. या दिवसात सकस आहार असावा. ताजी फळे व भाज्या यांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश असावा. खूप तिखट व मसालेदार पदार्थ टाळावेत. चीज, बटर व अतिचरबीयुक्त तळलेले पदार्थ टाळावेत.

नैसर्गिक शीतपेय

कोकम सरबत : कोकमामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करणारे ‘क’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असते. तसेच त्यात तंतुमय पदार्थही चांगल्या असल्याने ते पित्तशामक असते. उष्णतेमुळे होणाऱ्या बद्धकोष्ठावर त्याचा फायदा होतो. कोकमाचे सरबत वा सोलकढी करताना जिऱ्याची पूड जरूर घालावी. मधुमेही व्यक्ती कोकमाचे बिनसाखरेचे ‘आगळ’ सरबत म्हणून घेऊ  शकतात. ताज्या कोकम फळांचा (रातांबे) गर साध्या पाण्यात काढून त्याचे सरबतही छान लागते.

वाळ्याचे सरबत – वाळ्यातसुद्धा काही विशिष्ट तेल असून उन्हाळ्यात झोप न येणे, त्वचेला पडणाऱ्या भेगा, स्नायूदुखीसाठीही गुणकारी आहे.

कलिंगड – कलिंगडामध्ये ९२ टक्के पाणीच असते आणि उष्मांक खूपच कमी असतात. १०० ग्रॅममध्ये फक्त ३० उष्मांक असतात. ‘अ’, ‘क’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी खनिजेही असतात.

चिकू – चिकू हे जीवनसत्त्वे व खनिजांचे भांडार आहे. यात त्वचा व डोळ्यांसाठी उपयुक्त असे ‘अ’ , ‘क’, त्वचेसाठी उत्तम असे ‘ई’ जीवनसत्त्व आहे. चिकूमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठ टाळायला मदत होते. कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

वरील फळांचे मिल्कशेक करताना गाईचे दूध, ‘लो फॅट, किंवा ‘स्कीम्ड मिल्क’ वापरावे. याने शरीरात जाणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते.सब्जा बी ही उष्णतेवर खूप फायदेशीर असते. त्यातील तंतुमय घटकामुळे शौचाला साफ होते. अतिरिक्त आम्लता झाली असल्यास ती कमी करण्यासही त्याचा फायदा होतो.

द्रव पदार्थाचे सेवन आवश्यक

उन्हाळ्यामध्ये खूप घाम आल्याने किंवा कोरडय़ा हवेच्या ठिकाणी फारसा घाम न आल्यामुळे शरीरात प्रचंड दाह उत्पन्न होतो. घामामुळे शरीरातील खनिजांचे प्रमाणही कमी होते. पाण्याचे संतुलन राखण्यासाठी व शरीराचे उष्णतामान कमी करण्याकरिता सर्वसाधारणपणे किमान अडीच ते तीन लिटर द्रव पदार्थ पोटात जाणे अत्यावश्यक आहे. एवढे पाणी पिणे शक्य होतेच असे नाही. शिवाय फक्त पाण्यामधून खनिजांची तूट भरून निघत नाही. अशा वेळी नारळपाणी, दूध, कोकम, लिंबू, आवळा इत्यादी सरबते, ताक, उसाचा रस, ग्रीन टी प्यावे. चहा-कॉफीचे प्रमाण कमीच ठेवावे. कलिंगडे आणि टरबुजासारखी पाणीदार फळे व काकडीसारखी भाजी खावी. फळांची स्मूदी प्यावी. कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब यांसारख्या फळांचे रस प्यावेत. तसेच केळी, चिकू यांचे रस व मिल्कशेकही घेतल्याने शरीराला जीवनसत्त्वे व खनिजांचा पुरवठा होतो. अतिप्रमाणात साखर आणि  ‘प्रीझव्‍‌र्हेटिव्ह’ असलेल्या किंवा फसफसणाऱ्या शीतपेयांपेक्षा ताज्या फळांपासून बनवलेली नैसर्गिक पेये उत्तमच!

काकडीचे सरबत

काकडी, पुदिन्याची पाने, साखर, मीठ, थोडीशी मिरपूड व लिंबाचा रस पाण्याबरोबर एकत्र वाटून गाळून घेतात व बर्फ घालून पितात. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि उष्मांक खूप कमी आहेत, तर स्निग्ध पदार्थ नाहीत. त्यात पोटॅशियमदेखील चांगल्या प्रमाणात आहे, ज्यामुळे स्नायूंना पेटके न येण्यास मदत होते.

आवळा सरबत

आवळ्यात ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण उत्तम आहे. शिवाय ‘अ’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम व तांबे हे घटकही आहेत. या सगळ्यामुळे नेहमीच्या सरबतांपेक्षा जरा वेगळ्या चवीचे आवळा सरबत चांगले.

उसाचा रस

उसाच्या रसात पूर्णपणे साखर असली तरी ती शरीराला हानीकारक नसलेली ‘अनरिफाइंड शुगर’ आहे. उसात मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम व लोह ही खनिजे आहेत. पोटॅशियममुळे शरीरातील पाणी कमी होण्यास अटकाव होतो. उसाचा रस प्यायलावर झटकन शरीरातील साखर वाढत नाही.

बडिशेपचे सरबत

हे एक चविष्ट व थंडगार पेय. बडिशेपमध्ये ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, मँगनीज, लोह आणि काही प्रकारची जंतू मारणारी तेले (‘व्होलटाइल ऑइल्स’) आहेत. शिवाय बडिशेप पोटासाठी चांगली असल्याने उन्हाळ्यात हे सरबत विशेष चांगले.

शहाळ्याचे पाणी

शहाळ्याच्या पाण्यात सोडियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील कमी झालेले पाणी भरून निघते आणि ताजेतवाने वाटते. स्नायूंमध्ये येणाऱ्या पेटक्यांना प्रतिबंध करण्यासाठीही पोटॅशियम चांगले.

केळे

न्याहारी व दुपारचे जेवण यामध्ये भूक लागलेली असता एखादे केळे खाणे चागले. यात ‘ब’ जीवनसत्त्व असून इतर फळांत फारसे नसणारे ‘ब६’ अधिक प्रमाणात मिळते.  पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने रक्तदाबावर नियंत्रण राहते. यातील तंतुमय पदार्थामुळे बद्धकोष्ठतेचा व शौचातून रक्तस्रावाचा त्रास कमी होतो.  केळ्याचे फायदे असले तरी त्यात पिष्टमय पदार्थ जास्त असल्यामुळे ते प्रमाणात खावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 2:53 am

Web Title: october hot cooling akp 94
Next Stories
1 बीट बर्फी
2 मंडुकासन
3 कंपवात
Just Now!
X