ऋषिकेश बामणे

खेळाच्या मैदानात घडणाऱ्या घडामोडी आपण प्रत्यक्षात पाहातच असतो; पण मैदानाबाहेर अशा अनेक घडामोडी घडत असतात, ज्या सामन्यापेक्षाही अधिक चर्चेत राहतात. अशाच ‘ऑफ द फिल्ड’ घडामोडींचा वेध घेणारे हे साप्ताहिक सदर..

‘तो आता संपलाय’, ‘कशाला जागा अडवून बसलाय’, ‘उगाच निवृत्ती ताणतोय’.. अशा मथळय़ांनी आणि समाजमाध्यमांवरील संदेशांनी परवाचा दिवस, सोमवार गाजवला. ताजेच उदाहरण घ्यायचे झाले तर शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या संथ खेळीमुळेच दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शतकवीर रोहित शर्मावरील दडपण वाढले व भारताने सामना गमावला, अशी टीका क्रिकेटपंडितांकडून करण्यात आली. टीम इंडियाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला आता संघाबाहेर करण्याची गरज आहे, अशी टिप्पणी क्रिकेटतज्ज्ञ तावातावाने करीत असतानाच, मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने विजय मिळवून देणारी अर्धशतकी खेळी केली. झाले, जितक्या आक्रमकपणे धोनीचे टीकाकार आदल्या दिवशी आपली मते मांडत होते, तितक्याच त्वेषाने धोनीसमर्थक मंगळवारी या टीकाकारांवर तुटून पडले. धोनी समर्थक आणि विरोधक यांच्यात समाजमाध्यमांवर रंगलेली जुगलबंदी मंगळवारी भारताच्या विजयापेक्षाही अधिक चर्चेत होती.

टीकाकारांना टोले

विरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणे त्याच्या खास शैलीत ट्वीट करताना धोनीचा फलंदाजीला येतानाचे छायाचित्र टाकत त्याखाली ‘पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ हा प्रसिद्ध संवाद लिहिला. दुसरीकडे, ‘बीसीसीआय’नेदेखील धोनीचे २०१० व २०१९ अशा दोन विविध वर्षांतील छायाचित्र टाकून तो त्या वेळीही षटकार मारून सामना जिंकवायचा व आताही जिंकवतो, अशा शब्दांत धोनीचे कौतुक केले. एका चाहत्याने गांधीजी सूक्ष्मदर्शिकेतून काही तरी पाहात असल्याचे छायाचित्र ट्विटरवर टाकले आणि त्याखाली ‘धोनीच्या टीकाकारांचा शोध’ अशी ओळ टाकली. ही ‘ट्विप्पणी’ अनेकांना झोंबली. एका इंग्रजी वृत्तपत्राने मंगळवारच्या अंकात ‘धोनी फिनिश्ड?’ असा प्रश्न विचारणारा मथळा प्रसिद्ध केला होता. त्याच मथळय़ावर ‘नॉट’ असा शब्द टाकून ‘धोनी नॉट फिनिश्ड’ असे लिहिलेले वृत्तपत्राचे कात्रणही मंगळवारी फिरत होते. धोनीच्या टीकाकारांना लक्ष्य करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी हिंदी चित्रपटांतील दृश्ये, संवाद यांचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून आले. एका छायाचित्रात बंदुकीचा निशाणा साधणारा नवाजुद्दीन सिद्दिकी (चित्रपटातील दृश्याचे छायाचित्र) दुसऱ्या छायाचित्रात हात जोडून उभा असल्याचे दृश्य चाहत्यांनी टाकले आहे. त्याखाली ‘आधी आणि नंतर’ अशा ओळी टाकून धोनी विरोधकांच्या अवस्थेवर बोट दाखवण्यात आले आहे.

  टीकेचा भडिमार

सिडनी येथील पहिल्या सामन्यात धोनीने ९६ चेंडूंत ५१ धावांची संथ खेळी केली. त्यामुळे त्याच्यावर भारताच्या पराभवाचे खापर फोडून टीकेचा वर्षांव करण्यात आला. काहींनी धोनीचे यष्टिचीत होण्यापासून वाचण्यासाठी पाय लांबवतानाचे छायाचित्र टाकत तो त्याची कारकीर्द कशा प्रकारे लांबवतो आहे, असे लिहिले. तर काहींनी धोनीकडे आता सामना संपवण्याची क्षमता नसून त्याचे केस सफेद झालेले वृद्धापकाळातील छायाचित्र टाकले.

खुद्द ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीदेखील धोनीची खिल्ली उडवली. धोनीचे मैदानावर पाय लांब करून बसलेले छायाचित्र ट्विटरवर टाकत त्यांनी धोनी आता उभाही राहू शकत नाही, अशी टिप्पणी केली होती.

एका नेटकऱ्याने नवाजुद्दीन सिद्दिकीचे धोनीला गोळी झाडतानाचे व नंतर त्याचीच क्षमा मागतानाचे छायाचित्र टाकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.