27 February 2020

News Flash

ऑफ द फिल्ड : ‘कमबॅक किंग’

आजचा लेख अशाच काही ‘कमबॅक स्पेशालिस्ट’ क्रीडापटूंना समर्पित.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

क्रीडापटू आणि दुखापती यांचे एक अतूट नाते आहे. प्रत्येक क्रीडापटूला कारकीर्दीत किमान एकदा तरी गंभीर दुखापतीला अथवा भयानक आजाराला सामोरे जावे लागते. मात्र त्यातूनही झोकात पुनरागमन करू शकणारे खेळाडूच चाहत्यांना कायमस्वरूपी लक्षात राहतात. आजचा लेख अशाच काही ‘कमबॅक स्पेशालिस्ट’ क्रीडापटूंना समर्पित.

युवराज सिंग – क्रिकेट

‘सिक्सर किंग’ नावाने जगभरात लोकप्रिय असलेल्या युवराज सिंगला २०११मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकादरम्यानच कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची चाहुल लागली होती. मात्र विश्वचषक होईपर्यंत युवराजने जवळच्या एक-दोन व्यक्ती सोडल्यास कोणालाच या गोष्टीची खबरदेखील लागू दिली नाही. विश्वचषकानंतर युवराजने अमेरिकेत जाऊन कॅन्सरवरील उपचार घेतले व ११ सप्टेंबर, २०१२ रोजी युवराजने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्याद्वारे भारतीय संघात दणक्यात पुनरागमन केले. त्यांनतरदेखील युवराजने अनेक वेळा संघाला एकहाती सामने जिंकवून दिले. मात्र, चॅम्पियन्स करंडक २०१७ नंतर युवराजच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली.

टायगर वुड्स – गोल्फ

गोल्फ या खेळाचे नाव घेताच सर्वाच्याच तोंडी सर्वप्रथम नाव येते ते टायगर वुड्सचे. नोव्हेंबर २०१८मध्ये वुड्सने तब्बल पाच वर्षांनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. २००८मध्ये वुड्सच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याशिवाय अनेक वादविवादांमध्ये वुड्सचे नाव आढळले. एकदा मद्यपान करताना वाहन चालवल्यामुळेदेखील वुड्सला अटक करण्यात आली होती. तर २००९मध्ये त्याला पत्नीकडून घटस्फोटही स्वीकारावा लागला होता. कारकीर्दीत अशा असंख्य अडचणींना सोमोरे जाऊनदेखील वुड्सने खंबीरपणे पुनरागमन करत काही दिवसांपूर्वीच मास्टर्स स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. मुख्य म्हणजे तब्बल १४ वर्षांनी त्याने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

संदीप सिंग – हॉकी

भारताचा नामांकित हॉकीपटू संदीप सिंगला २००६मध्ये एका इसमाकडून चुकून गोळी लागल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ माजली होती. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी संदीपला अपंगत्व आले होते. त्याशिवाय जवळपास दोन वर्षांसाठी त्याला हॉकीपासून दूर रहावे लागले. मात्र यामुळे माघार न घेता संदीपने भारतीय संघात झोकात पुनरागमन केले. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने २००९च्या अझलन शाह स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

राही सरनोबत – नेमबाजी

कोल्हापूरला नेमबाजीचे धडे गिरवणाऱ्या मराठमोळ्या राही सरनोबतने नेमबाजीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१० व २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहीला २०१६मध्ये नेमबाजीचे पिस्तुल उचलतानादेखील असह्य़ वेदना सहन कराव्या लागत होत्या. हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिने एकवेळ कारकीर्दाला रामराम ठोकण्याचादेखील विचार केला होता. मात्र स्वत:ला आणखी सिद्ध करण्याच्या हेतूने तिला दुखापतीतून सावरण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राहीने दमदार पुनरागमन करत ‘सुवर्ण सर’ केले. अर्जून पुरस्कार विजेत्या राहीला पाहूनच महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांतून असंख्य मुलींनी नेमबाजीत कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉजर फेडरर – टेनिस

टेनिस विश्वातील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने नुकताच कारकीर्दीतील १००व्या विजेतेपदावर नाव कोरले. वयाच्या ३७व्या वर्षीदेखील एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या फेडररलाही २०१६मध्ये गुडघ्याच्या दुखापतीने ग्रासले होते. चालतानासुद्धा फेडररला असंख्य वेदना होत असल्यामुळे अनेकांनी त्याची कारकीर्द संपली, असाच सूर धरला होता. मात्र जिद्दी वृत्तीच्या फेडररने जवळपास वर्षभराच्या विश्रांतीनंतर झोकात पुनरागमन करून २०१७च्या विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपण का महान खेळाडू आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. फेडररने आतापर्यंत आठ वेळा विम्बल्डन, तर एकूण २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत.

First Published on April 18, 2019 12:30 am

Web Title: off the field article on comeback players
Next Stories
1 राजकीय – समाजमाध्यम
2 स्वादिष्ट सामिष : गोव्याची चिकन सागोती
3 आरोग्यदायी सफर
Just Now!
X