13 December 2019

News Flash

ऑफ द फिल्ड : उत्तेजकांबाबत अज्ञान महागात!

काही आठवडय़ांपूर्वीच नाशिकची धावपटू संजीवनी राऊतलाही याचा फटका पडला.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

गेल्या आठवडय़ात भारताचा प्रतिभावान युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधात टब्र्यूटलान उत्तेजकाचा अंश सापडल्याचे निदर्शनास आले आणि संपूर्ण क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. अजाणतेपणी झालेल्या या चुकीचा फटका पडणारा पृथ्वी हा पहिला क्रिकेटपटू अथवा क्रीडापटू नसून यापूर्वीही अनेक नामांकित खेळाडूंवर निलंबनाची आपत्ती ओढावली आहे.

नरसिंह यादव – कुस्तीपटू

मुंबईचा कुस्तीपटू नरसिंह यादवने दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या सुशील कुमारला धूळ चारून २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. परंतु स्पर्धा ऐन तोंडावर आली असताना नरसिंह उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्यामुळे नरसिंहला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतात परतावे लागले व त्याच्यावर चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. सोनिपत येथील ‘साई’च्या प्रशिक्षण शिबिरात जेवणाद्वारे बंदी असलेले उत्तेजक आपल्याला देण्यात आल्याचे नरसिंहने सांगितले असले तरी अद्यापही या प्रकरणातील सत्याचा उलगडा झालेला नाही.

दिएगो मॅराडोना – फुटबॉलपटू

अर्जेटिनाला १९८६चा फिफा विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना कारकीर्दीत अनेकदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. मात्र १९९४ मध्ये मॅराडोनाला एका ‘एनर्जी ड्रिंक’चे सेवन करणे महागात पडले. ‘रिप फ्युअल’ नावाचे अर्जेटिनातील लोकप्रिय पेय त्या वेळी मॅराडोना नेहमी स्वत:जवळ ठेवायचा. परंतु १९९४चा विश्वचषक अमेरिकेत आयोजित करण्यात आल्याने मॅराडोनाच्या साहाय्यकानेच त्याला अमेरिकन आवृत्तीचे उत्तेजकाचा अंश असलेले ‘रिप फ्युअल’ दिल्याचे उघडकीस आले. यानंतरही मॅराडोनावरील बंदी कायम राहिली व त्याच्या अनुपस्थितीत अर्जेटिनाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

शेन वॉर्न – क्रिकेटपटू

२००३चा विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नला वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. खेळाडूंनी घेण्यावर बंदी असलेले मॉडय़ुरेटिक नावाचे टॅबलेट वॉर्नने घेतले होते. परंतु अनेकदा आपण निर्दोष असून बेसावधपणे ते औषध घेतल्याचे सांगूनही वॉर्नवरील बंदी कायम ठेवण्यात आली. वॉर्नच्या आईनेच नैराश्य कमी करून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी त्याला हे औषध दिल्याचे नंतर उघडकीस आले.

अपर्णा पोपट – बॅडमिंटनपटू

२००० मध्ये भारताची त्या वेळची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू अपर्णा पोपटला सर्दीवरील उपचारासाठी घेतलेल्या औषधात उत्तेजक पदार्थ आढळल्यामुळे तिची कारकीर्द डागाळली. डीकोल्डचे टॅबलेट घेतल्यामुळे अपर्णाला तीन महिन्यांच्या बंदीची शिक्षा भोगावी लागली.

यांच्यावरही बंदीची वेळ

वर उल्लेख केलेल्यांव्यतिरिक्त आणखी काही क्रीडापटूही जाणते-अजाणतेपणे उत्तेजक चाचणीत दोषी आढळले. काही आठवडय़ांपूर्वीच नाशिकची धावपटू संजीवनी राऊतलाही याचा फटका पडला. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हा, मार्टिना हिंगिस, धावपटू बेन जॉन्सन, क्रिकेटपटू शोएब अख्तर, युसूफ पठाण हेदेखील उत्तेजकांच्या विळख्यात सापडले आहेत. तर अमेरिकेचा सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने संपूर्ण कारकीर्दीत आपण उत्तेजकांचा वापर करूनच यश मिळवल्याचे काही वर्षांपूर्वी कबूल केले होते.

First Published on August 8, 2019 12:20 am

Web Title: off the field article stimulating consumption issue abn 97
Just Now!
X