|| सुप्रिया दाबके

परदेशातील भूमीवर ५०० कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चौथी कसोटी ही इंग्लंडची परदेशातील ५००वी कसोटी ठरली. विशेष म्हणजे ती कसोटी इंग्लंडने जिंकत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही ३-१ अशी जिंकली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिली कसोटीदेखील इंग्लंडने १८७७मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळली होती. ट्वेन्टी-२०च्या जमान्यातही इंग्लंड कसोटी क्रिकेटला सर्वोच्च महत्त्व देत असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढतही २०२१मध्ये जून महिन्यात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

नदालचा फटका आणि प्रेम

ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या राफेल नदालने बॉलगर्ल अ‍ॅनिताप्रति दाखवलेली कृतज्ञता टेनिसजगताला भावली. नदालने फटकावलेला चेंडू बॉलगर्ल म्हणून टेनिस कोर्टवर असणाऱ्या अ‍ॅनिताच्या डोक्याला लागला. या घटनेनंतर नदाल तातडीने तिच्याकडे धावत गेला आणि त्या मुलीला दुखापत झाली नाही ना याची खात्री केली. इतकेच नाही तर अ‍ॅनिता व्यवस्थित आहे हे कळल्यावर नदालने प्रेमाने तिच्या गालाचे चुंबनही घेतले. नदालने त्याची टोपीही अ‍ॅनिताला भेट म्हणून दिली.

कोबेची जर्सी

अमेरिकेचा महान बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जर्सी क्रमांकाप्रति प्रेम व्यक्त होत आहे. ब्रायंट ८ आणि २४ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. ते पाहता अमेरिकेत नुकत्याच झालेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील (एनबीए) बास्केटबॉलच्या विविध लढतींमध्ये अर्ध्या  खेळाडूंनी ८ आणि अर्ध्या  खेळाडूंनी २४ क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. ८ आणि २४ क्रमांकाची जर्सी घालून खेळलो तर सर्वाधिक प्रेम ब्रायंटप्रति व्यक्त करता येते, असे एनबीएमध्ये बास्केटबॉल खेळणाऱ्यांना वाटते. कारण एनबीएमधील अनेक बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटकडे पाहूनच या खेळात आले आहेत.

न्यूझीलंडचा आदित्य चेन्नईचा चाहता

न्यूझीलंडचा (१९ वर्षांखालील) युवा विश्वचषक संघातील आदित्य अशोकने न्यूझीलंड कसोटी संघ आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांकडून खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आदित्यचा जन्म हा तमिळनाडूतील आहे. मात्र तो चार वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबीयांसह न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे स्थायिक झाला. यंदाच्या युवा विश्वचषकात फिरकीपटू म्हणून आदित्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याने न्यूझीलंड कसोटी संघ आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांकडून खेळण्याची ठेवलेली जिद्द ही निश्चित कौतुकास्पद आहे.

हार्दिक पंडय़ाचा प्रेयसीसोबत ‘रोमॅँटिक फोटो’

हार्दिक पंडय़ाचा सर्बियाची प्रेयसी नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा एकदा ‘रोमॅँटिक फोटो’ प्रसिद्ध झाला आहे. ‘हार्ट इमोजी’ टाकत हार्दिकने पुन्हा एकदा त्याचे नताशावरील प्रेम जगजाहीर केले आहे. हार्दिक सातत्याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. काही दिवसांपूर्वी दुबई येथे हार्दिकने नताशासोबत साखरपुडा केल्याचा व्हिडीयो आणि छायाचित्र प्रसिद्ध करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यावर हार्दिकच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांना नताशा सून म्हणून पसंत असल्याचे म्हटले होते.

supriya.dabke@expressindia.com