News Flash

ऑफ द फिल्ड : चाहत्यांचा रुद्रावतार! 

विश्वचषक म्हटला की सर्वच देशांच्या चाहत्यांमध्ये वेगळेच बळ संचारते.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

विश्वचषक म्हटला की सर्वच देशांच्या चाहत्यांमध्ये वेगळेच बळ संचारते. भारतासारख्या क्रिकेटवेडय़ा देशाव्यतिरिक्त अन्य देशांमधील चाहतेसुद्धा आपापल्या संघातील खेळाडूंचे मनोबल वाढवण्याबरोबरच इतर संघातील खेळाडूंची हुर्यो पण उडवतात. विश्वचषकात किंबहुना क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक सामने चाहत्यांच्या रुद्रावतारामुळे अर्धवट रद्द करावे लागले, तर काही वेळा चाहत्यांनी अक्षरश: मैदानात धाव घेऊन खेळाडूंविषयीचे प्रेम दाखवले.

वॉर्नर-स्मिथची हुर्यो

सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सराव सामना तसेच मंगळवारी झालेला साखळी सामना म्हणजे चाहत्यांच्या हुल्लडबाजीचे उत्तम उदाहरण. चेंडू फेरफार केल्यामुळे तब्बल वर्षभराच्या निलंबनाची शिक्षा भोगून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना इंग्लंडच्या बार्मी आर्मी आणि अन्य चाहत्यांच्या डिवचण्याला सामोरे जावे लागले. त्याशिवाय सराव सामन्यात दोन चाहत्यांनी तर पिवळ्या रंगाच्या ‘सँडपेपर’चे वस्त्र परिधान करून वॉर्नर-स्मिथच्या जखमांवर मीठ चोळले. अर्थात या डिवचण्याचा वॉर्नर-स्मिथ अथवा ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर काहीही परिणाम जाणवला नाही आणि त्यांनी सहज सामना जिंकला. त्याचप्रमाणेच भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांदरम्यानही काही भारतीय चाहत्यांनी स्मिथला चिडवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्यांना शांत करून स्वत:ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे, मंगळवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत इंग्लडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने चाहत्यांच्या या वर्तनाचे एकप्रकारे समर्थनच केले. या सामन्यातही वॉर्नरने अर्धशतक झळकावले, तर स्मिथनेही ३८ धावांची चांगली खेळी केली.

चाहत्यांच्या रोषाची आणखी काही उदाहरणे

१९८१मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवीय सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला सहा धावांची आवश्यकता असताना ग्रेग चॅपेलने भाऊ ट्रेव्हर चॅपेलला ‘अंडरआर्म’ (खाली वाकून) चेंडू टाकायला सांगितल्यामुळे न्यूझीलंडला षटकार लगावता आला नाही आणि निराश झालेल्या चाहत्यांनी थेट मैदानात धाव घेतली. त्याचप्रमाणे १९९९मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिजमधील लढतीत विंडीजच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाला विजयी धाव घेण्यापासून रोखण्यासाठी तब्बल तीन-चार वेळा मैदानात धाव घेतली. त्याशिवाय फलंदाजांची बॅट घेऊनसुद्धा ते पळू लागल्यामुळे पंचांनी अखेरीस नाइलाजास्तव सामना अनिर्णीत घोषित केला.

भारतीय चाहत्यांचा राग आणि प्रेम..

१९९६च्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सचिन तेंडुलकरच्या दिमाखदार अर्धशतकाच्या बळावर १ बाद ९८ अशी आश्वासक सुरुवात केली. परंतु सनथ जयसूर्याने सचिनला बाद केले आणि त्यांनतर भारताची फलंदाजी ८ बाद १२० धावा अशी ढेपाळली. भारताचा पराभव दिसू लागल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या संतप्त चाहत्यांनी जाळपोळ करत मैदानावर पाण्याच्या बॉटल्सचा भडिमार केला. त्यामुळे सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी सामना काही मिनिटे थांबवला. परंतु चाहत्यांच्या रोषाला आवरणे अशक्य झाल्यामुळे सामना रद्द करून श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले.

याच्या उलट चित्र १९८३मध्ये होते. लॉड्स स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताच्या मोहिंदर अमरनाथने वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंगचा बाद करताच जवळपास सर्व खेळाडूंनी जल्लोष करण्याऐवजी थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने धाव घेतली. कारण स्टेडियमच्या चारही बाजूंनी चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी थेट मैदानावर धाव घेतल्यामुळे खेळाडूंना पळण्यापासून पर्याय उरला नव्हता. त्यानंतरच्या काळात मात्र सुरक्षाव्यवस्था अधिक कडक झाल्याने सध्याच्या क्रिकेटमध्ये एखाद-दुसऱ्या चाहत्यानेच खेळाडूच्या अथवा संघाच्या प्रेमापोटी सुरक्षारक्षकांना चकवून मैदान गाठलेले आपल्याला पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 12:10 am

Web Title: off the field fans cricket world cup abn 97
Next Stories
1 धाक नको, दक्षता घ्या..
2 स्वादिष्ट सामिष : करंदी डाळ वडा
3 योग : एक आकलन
Just Now!
X