ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

क्रिकेट अथवा कोणत्याही क्रीडा प्रकाराचा सामना सुरू असताना चाहत्यांनी मैदानात प्रवेश घेत किंवा नैसर्गिक कारणांमुळे सामन्यात विघ्न आल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत कुत्रे, साप यांनीही सामन्यात अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. अशाच काही आणखी घटनांचा घेतलेला हा मनोरंजक आढावा.

माकड चेष्टा

भारत-श्रीलंका यांच्यात २०१५मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात माकडाने थेट मैदानात प्रवेश करून खेळ काही काळासाठी स्थगित करण्यात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे माकडापासून बचाव करण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू पळताना आढळले. मात्र माकडाने काही काळ पंचांच्या आणि खेळपट्टीच्या बाजूने फेरी मारल्यानंतर मैदानाबाहेरचा रस्ता पकडला.

जेव्हा जोकोव्हिचच्या मार्गात चिमणी येते

नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध रॉजर फेडरर यांच्यात २०१५साली झालेला विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना जोकोव्हिचच्या आक्रमक खेळाव्यतिरिक्त कोर्टवर आलेल्या चिमणीमुळेही गाजला. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच सव्‍‌र्हिस करत असतानाच या चिऊताईचे आगमन झाल्यामुळे फेडररसह बॉल-बॉयसुद्धा तिला पकडण्यासाठी धावले. अखेर काही मिनिटे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर चिमणी स्वत:हूनच कोर्टबाहेर गेली.

मांजरीमुळे लिव्हरपूल-टॉटेनहॅम सामन्यात खोळंबा

२०१२च्या प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूल विरुद्ध टॉटेनहॅम यांच्यातील एका फुटबॉल लढतीत मांजरीने सामना सुरू झाल्यावर १० मिनिटांतच मैदानात प्रवेश केला. दोन्ही संघांतील खेळाडू, कर्मचारी आणि चाहतेसुद्धा तिला पकडण्यासाठी धावले. परंतु मांजरीने काही काळ सर्वाचीच दमछाक केली. अखेरीस सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून मैदानाबाहेर नेले.

एकाच महिन्यात साप, कुत्र्याचे दर्शन

विदर्भ विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील १० डिसेंबरला झालेला रणजी करंडकाचा सलामीचा सामना मैदानावर चक्क साप आल्यामुळे विलंबाने सुरू करण्यात आला. विजयवाडा येथे झालेल्या या सामन्यात विदर्भाचा कर्णधार फैझ फझलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र विदर्भाचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरताच त्यांना साप निदर्शनास आला. अखेरीस सात-आठ कर्मचाऱ्यांनी कसोशीने त्या सापाला मैदानाबाहेर नेले व १५-२० मिनिटांनंतर खेळाला सुरुवात झाली. बीसीसीआयने या घटनेची चित्रफीत ट्विटरवर टाकून चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याचप्रमाणे गेल्या रविवारी झालेल्या भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यात कुत्र्याने मैदानात धाव घेतली. २७व्या षटकाच्या सुरुवातीला आलेल्या या कुत्र्यामुळे षटक सुरू होण्यास काहीसा विलंब झाला.कुंबळेला निरोप देण्यासाठी मधमाश्या मैदानात

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८मध्ये कोटलावर झालेला सामना आठवतो आहे का? भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेच्या कारकीर्दीतील हा शेवटचा सामना. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी मधमाश्यांनी मात्र खेळाडूंवर केलेला हल्लाबोल आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे पंच बिली बाऊडेन, ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग व मॅथ्यू हेडन आणि भारताचे खेळाडू या सर्वानीच थेट मैदानातच लोटांगण घातले. जवळपास १५-२० मिनिटानंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात २००७मध्ये झालेल्या लढतीतही असा प्रसंग ओढावला होता.