08 December 2019

News Flash

ऑफ द फिल्ड : ‘भार’दस्त क्रिकेटपटू!

काही खेळाडू याला अपवाद आहेत. अशाच काही ‘वजनदार’ क्रिकेटपटूंवर एक दृष्टिक्षेप.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

आधुनिक क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला फार महत्त्व दिले जाते. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, रवींद्र जडेजा यांसारखे खेळाडू विश्रांतीच्या काळातही स्वत:चे वजन व तंदुरुस्ती यांवर नियंत्रण राखण्यात व्यग्र असतात. परंतु काही खेळाडू याला अपवाद आहेत. अशाच काही ‘वजनदार’ क्रिकेटपटूंवर एक दृष्टिक्षेप.

वॉर्विक आर्मस्ट्राँग

१३३ किलो

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरचे सर्वाधिक वजनदार क्रिकेटपटू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या वॉर्विक आर्मस्ट्राँग यांना ओळखले जाते. सहा फूट, तीन इंच इतकी उंची व १३३ किलो वजनामुळे आर्मस्ट्राँग यांना ‘द बिग शीप’ या टोपणनावाने ओळखले जायचे. १९०२ ते १९२१ या १९ वर्षांच्या कारकीर्दीत आर्मस्ट्राँग यांनी ५० कसोटींत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना २,८६३ धावा केल्या तसेच ८७ बळीही मिळवले.

रहकीम कोर्नवॉल

१४० किलो

भारताविरुद्ध २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी नुकताच जाहीर करण्यात आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघात रहकीम कोर्नवॉलचा समावेश करण्यात आला आहे. सहा फूट आणि पाच इंच उंची असलेल्या कोर्नवॉलचे वजन तब्बल १४० किलो असल्याने समाजमाध्यमांवर त्याच्याविषयी फार चर्चा रंगली. २६ वर्षीय कोर्नवॉलने ५५ प्रथम श्रेणी सामन्यांत २६० बळी मिळवले आहेत. त्याचप्रमाणे १ शतक व १३ अर्धशतकांच्या साहाय्याने त्याने २,२२४ धावाही केल्या आहेत. त्यामुळे जर भारताविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कोर्नवॉलचे पदार्पण झाले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो सर्वाधिक वजनदार क्रिकेटपटू ठरेल.

यांचेही वजन भारी..

श्रीलंकेचा दुलीप मेंडिस, ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून, क्रिकेट पितामह म्हणून ओळखले जाणारे इंग्लंडचे डब्ल्यू. जी. ग्रेस, भारताचा रमेश पोवार, न्यूझीलंडचा जेसी रायडर यांसारख्या खेळाडूंनीसुद्धा वजनाचे तारतम्य न बाळगता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडली. अर्जुन रणतुंगाने तर नव्वदीच्या घरात वजन असूनही १९९६च्या विश्वचषकात श्रीलंकेला जगज्जेतेपद मिळवून दिले होते.

इंझमाम उल हक

१०३ किलो

१९९१मध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू इंझमाम उल हक एके काळी विश्वातील सर्वात वजनदार क्रिकेटपटू होता. १९९२मध्ये पाकिस्तानने मिळवलेल्या विश्वविजयात बहुमूल्य योगदान देणारा तरुण व तडफदार इंझमाम आणि २००७च्या विश्वचषकातील १०३ किलो वजनाचा इंझमाम यांच्यातील बदल अविश्वसनीय असा आहे. कदाचित भारीभक्कम शरीरयष्टीमुळेच इंझी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तब्बल ४० वेळा धावबाद झाला आहे.

ड्वेन लेव्हरॉक

१२७ किलो

२००७च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध बर्मुडा यांच्यातील सामन्यात रॉबिन उत्थप्पाचा हवेत सूर मारून एकहाती झेल घेणारा ड्वेन लेव्हरॉक तुम्हा सर्वाना आठवत असेलच. १२७ किलो वजनाचा लेव्हरॉक खरे तर पोलीस अधिकारी होता. त्यानंतर त्याने फुटबॉल, गोल्फ या खेळातही स्वत:चे नशीब अजमावले. अखेरीस २००६ मध्ये तो क्रिकेटकडे वळला. परंतु बर्मुडाचा संघ क्रिकेटमध्ये फारशी प्रगती करण्यात अपयशी ठरल्यामुळे २००९ साली लेव्हरॉकने क्रिकेटला अलविदा केला.

First Published on August 15, 2019 12:11 am

Web Title: off the field weighty cricketers abn 97
Just Now!
X