ऋषिकेश बामणे

यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा विविध कारणांनी गाजली. एकीकडे राफेल नदालने त्याचे वर्चस्व कायम राखताना १२व्यांदा विजेतेपद मिळवले, तर महिलांमध्ये अ‍ॅशले बर्टीच्या रूपान नवीन विजेती गवसली. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य काही घटनांमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली, त्यावर टाकलेली एक नजर.

नदालचा रडीचा डाव?

आक्रमक व जिद्दी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या नदालने थीमविरुद्धच्या अंतिम फेरीत दुसरा सेट ७-५ असा गमावल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा तब्बल पाच मिनिटे अधिक वेळ विश्रांती घेतली. त्यामुळे थीमला ताटकळत वाट पहावी लागली. त्यानंतर नदालने सलग दोन सेट जिंकून ३-१ अशा फरकाने विजेतेपद पटकावले. त्यामुळे समाज माध्यमांवर याविषयी नदालवर अनेकांनी टीका केल्या. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया अझारेन्कानेसुद्धा उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाविरुद्ध सेट गमावल्यानंतर तब्बल ११ मिनिटे विश्रांती घेतली व पुढील दोन सेट जिंकून ओसाकाचे आव्हान संपुष्टात आणले.

थीम-सेरेनाचे मानापमान नाटय़

आतापर्यंतच्या फ्रेंच ओपनच्या इतिहासात कधीही पाहिली नसेल अशी गोष्ट यंदा पहावयास मिळाली. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पाब्लो केव्हसला धूळ चारल्यानंतर थीम पत्रकार परिषदेत असतानाच त्याला तातडीने बाहेर जाण्यास सांगण्यात आले. कारण शेजारच्या कोर्टवर सेरेना विल्यम्स पराभूत झाल्यामुळे तिची पत्रकार परिषद त्याच सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आधीच निराश झालेल्या सेरेनासारख्या मोठय़ा खेळाडूला ताटकळत ठेवल्यास आणखी समस्या वाढतील, या हेतूने थीमला एकप्रकारे ‘फ्रेंच कट’ देऊन बाजूला करण्यात आले.

असेही काही विक्रम-पराक्रम

२००९ नंतर म्हणजेच तब्बल १० वर्षांनी पुरुष एकेरीत आठही मानांकित खेळाडूंनी उपउपांत्यपूर्व फेरी (टॉप १६) गाठली. तर दुसरीकडे महिलांमध्ये उपांत्य फेरीत पोहचलेल्या चारही खेळाडूंपैकी एकीचाही पहिल्या पाच मानांकित खेळाडूंमध्ये क्रमांक नव्हता. कारण ओसाका, सेरेना, सिमोना हॅलेप, प्लिस्कोव्हा व अझारेन्का यांचे आव्हान उपांत्य फेरीपूर्वीच संपुष्टात आले. तर तब्बल ४६ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या महिला खेळाडूने एकेरीचे विजेतेपद मिळवले. यापूर्वी मार्गारेट कोर्टने १९७३मध्ये विजेतेपद मिळवले होते.

सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या विक्रमाने जोकोव्हिचला हुलकावणी दिली. जोकोव्हिचने गतवर्षी विम्बल्डन, अमेरिकन व यंदा वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर नाव कोरले होते. सलग चौथे ग्रँडस्लॅम मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला असता. दुसरीकडे रॉजर फेडररने पाच वर्षांनंतर फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होऊन वयाच्या ३७व्या वर्षी उपांत्य फेरी गाठणारा सर्वाधिक वयस्कर खेळाडू होण्याचा मान मिळवला.

यंदाच्या हंगामात तब्बल तीन वेळा खराब हवामान व पावसाच्या व्यत्ययामुळे सामना स्थगित करून पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यातही उपांत्य फेरीतील नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध डॉमिनिक थीम यांच्यातील सामना ५ तास रंगला, मात्र तब्बल तीन दिवस लांबला गेला.