(ऑफ द फिल्ड  : ऋषिकेश बामणे)

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाचा ज्वर आता हळूहळू वाढत चालला आहे. तीन महिने रंगणाऱ्या या स्पर्धेत आजवर अनेक भावांच्या जोडय़ा कधी एकाच संघातून खेळल्या, तर काही एकमेकांच्या विरोधातही उभे ठाकले. अशाच काही आजी-माजी कबड्डी बंधूंवर आधारित आजचे हे सदर.

धर्मराज बंधूंचे कबड्डीराज

प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणजे तमिळनाडूचा धर्मराज चेरलाथन. परंतु त्याचा भाऊ धर्मराज गोपूसुद्धा पहिल्या हंगामात खेळला होता. गोपूने तेलुगू टायटन्सचे २०१४मध्ये पहिल्या हंगामात प्रतिनिधित्व केले, तर चेरलाथन बेंगळूरु बुल्सकडून खेळला. या हंगामात गोपूला कोणीही संघात घेतले नाही. परंतु चेरलाथन वयाच्या ४४व्या वर्षीही युवा खेळाडूप्रमाणे हरयाणा स्टीलर्सकडून खेळत आहे.

देसाई घराण्यातील दोन दिवे

गतवर्षी यू मुंबाला बाद फेरीपर्यंत मजल मारून देण्यात सर्वाधिक योगदान देणाऱ्या सिद्धार्थ देसाईला यंदा मुंबईने संघात कायम न राखल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले. परंतु हीच संधी साधून तेलुगू टायटन्सने सिद्धार्थला संघात सामील केले. त्यानंतर लिलाव प्रक्रियेत सिद्धार्थचा मोठा भाऊ सूरजलासुद्धा सहभागी केल्यानंतर महाराष्ट्राच्या दोन ताऱ्यांना एकाच संघात खेळताना पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना मिळाली. परंतु या दोघांच्या चमकदार कामगिरीनंतरही अद्यापही टायटन्सला यंदाच्या हंगामात हवे तितके यश लाभलेले नाही.

चिल्लर बंधूंची गगनभरारी

बेंगळूरु बुल्सचा रोहित कुमार व तमिळ थलायव्हाचा मनजित चिल्लर हे दोघे भाऊ आहेत, हे आजही अनेकांना माहीत नसेल. रोहितचे पूर्ण नाव रोहित कुमार चिल्लर असे आहे, परंतु अभिनेता अक्षय कुमारचा मोठा चाहता असल्याने तो कुमार हेच आडनाव लावतो. प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात रोहितने पाटणा पायरेट्सकडून खेळताना सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. पुढे बेंगळूरुमध्ये संधी मिळाल्यावर तो संघाचा प्रमुख चढाईपटू म्हणून उदयास आला. त्याशिवाय सहाव्या हंगामात त्याने बेंगळूरुला विजेतेपदही मिळवून दिले. दुसरीकडे रोहितचा भाऊ मनजीतने दुसऱ्या हंगामात बेंगळूरुला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

गुजरातचे आधारस्तंभ परवेश-सुनील

हरयाणाच्या सोनपत जिल्ह्य़ातील परवेश आणि सुनील या मलिक बंधूंनी चौथ्या हंगामात प्रो कबड्डीतील कारकीर्दीला सुरुवात केली. सुनीलने पाटणा पायरेट्सचे प्रतिनिधित्व केले, तर परवेश त्या वेळी जयपूर पिंक पँथर्सकडून खेळला. परंतु पुढील हंगामात गुजरात फॉर्च्यूनजायंट्सने दोघांना संघात सहभागी केले. या दोघांनी मिळून बचावात एकूण १०५ गुण मिळवले व गुजरातला अंतिम फेरीत धडक मारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. यंदाच्या हंगामातसुद्धा सुनील-परवेश गुजरातकडूनच खेळत आहेत.