|| ऋषिकेश बामणे

अपंग नीलेशचे क्रिकेटप्रेम

भारतीय क्रिकेट संघाचे आपण आजवर अनेक खास चाहते पाहिले आहेत; परंतु मंगळवारी यामध्ये एका अनोख्या चाहत्याची भर पडली. मुंबईतील कलिना परिसरात राहणारा ४२ वर्षीय अपंग चाहता नीलेश फुर्यासुद्धा दोन्ही हातात काठय़ा घेऊन आयुष्यातील पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. नीलेशसह त्याचे आणखी काही सहकारीसुद्धा होते. परंतु पोलिओ आजारामुळे बालपणीच अपंगत्व आलेल्या नीलेशची जिद्द सर्वाचे लक्ष वेधत होती.

सेरेनाला चाहत्यांचा सलाम

रविवारी या दशकातील पहिल्या जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या अमेरिकेची नामांकित टेनिसपटू सेरेना विल्यम्सने मुलीला कंबरेवर उचलून केलेल्या जल्लोषाचे समाजमाध्यमांवर सर्वानी कौतुक केले. विशेष म्हणजे १९९० पासून ते २०२० यादरम्यानच्या चारही दशकात किमान एक विजेतेपद मिळवणारी ती पहिली टेनिसपटू ठरल्याने तिच्या तंदुरुस्तीवरही कौतुकाचा वर्षांव करण्यात आला. सेरेनाने विजेतेपदाची रक्कम ऑस्ट्रेलियातील वणव्यातील नुकसानग्रस्तांना दान केली. त्यामुळे काहींनी तिला सुपर मॉम, सुपर वुमन अशा पदव्या देण्याबरोबरच तू एक खेळाडू म्हणूनच नाही, तर एक आई आणि माणूस म्हणूनही अनेकांचे प्रेरणास्थान आहेस, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दोन ‘सिंघम’ची भेट

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांची भेट घेतली. अजयच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही भेट झाल्याचे समजते.

हार्दिक-नताशा जोडीवर ‘मीम्स’चा वर्षांव

नववर्षांच्या सुरुवातीला प्रेमबंधनात अडकणाऱ्या हार्दिक पंडय़ा आणि नताशा यांच्या जोडीवर मीम्स बनण्याचा प्रकार अद्यापही जोरात सुरू आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० संघातून वगळण्यात आलेल्या हार्दिकला या वेळी प्रेयसी नताशाने पोस्ट केलेल्या एक छायाचित्रामुळे गोत्यात आणले. समुद्रकिनाऱ्यावरील नताशा आणि हार्दिक यांच्या या बोल्ड छायाचित्रामध्ये काहींनी त्यांना मासेमारी करणाऱ्यांसारखे कपडे घातलेले छायाचित्र एडिट करून ते समाजमाध्यमांवर पसरवले, तर काहींनी हार्दिकला तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचे सल्ले दिले.

bamnersurya17@gmail.com