असिफ बागवाण

नामांकित ब्रॅण्डच्या फ्लॅगशिपफोनना टक्कर देण्यासारखी सर्व क्षमता वन प्लस ५ टीमध्ये आहे. पोर्ट्रेट फोटोग्राफी, स्लो मोशन व्हिडीओ रेकॉर्डिग, जबरदस्त बॅटरी, झटपट चार्जिग अशी वैशिष्टय़े असलेला हा फोन किमतीला थोडा जास्त असला तरी, वापरकर्त्यांचे पूर्ण समाधान करणारा आहे.

भारतात परवडणाऱ्या फोनची ग्राहकसंख्या जास्त असली तरी, हा ग्राहकवर्ग हळूहळू वरच्या किमतश्रेणीतील स्मार्टफोनकडे वळत असल्याचे आढळून आले आहे. नेहमीच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक वैशिष्टय़े असलेला किंवा काही तरी वेगळेपण असलेला स्मार्टफोनसाठी ग्राहकाचा हा शोध सुरू असतो. अशा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोबाइल निर्मात्या कंपन्या ‘फ्लॅगशिप’ स्मार्टफोनची निर्मिती करत असतात. ‘फ्लॅगशिप’ फोन हा त्या कंपनीने आजवर निर्मिलेल्या कोणत्याही फोनपेक्षा चांगली वैशिष्टय़े असलेला फोन असतो. असा फ्लॅगशिप फोन म्हणजे, त्या कंपनीची पुढची वाटचाल कोणत्या दिशेने जाणारी आहे, तेही निश्चित करत असतो. त्यामुळे नामांकित ब्रॅण्ड नियमितपणे ‘फ्लॅगशिप’ फोन आणत असतात. पण हे ‘फ्लॅगशिप’ फोन किमतीच्या बाबतीतही आधीच्या फोनचे सर्व विक्रम मोडणारे असतात. कोणत्याही नामांकित कंपनीचा ‘फ्लॅगशिप’ फोन सध्या ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला आढळणार नाही. पण या फोनना टक्कर देणारा एक फोन गेल्या तीन-चार महिन्यांपासून बाजारात ग्राहकांची पसंती मिळवत आहे. तो म्हणजे ‘वन प्लस ५ टी’. सुमारे ३२ हजार ते ३७ हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध असलेला हा फोन म्हणजे अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांच्या ‘फ्लॅगशिप’ फोनना स्वस्तातला पर्याय ठरू शकतो.

‘वन प्लस ५ टी’ हा ‘वन प्लस’ या कंपनीने काही महिन्यांपूर्वीच बाजारात आणलेल्या ‘वन प्लस ५’ची सुधारित आवृत्ती आहे. खरं तर आपणच आणलेल्या स्मार्टफोनला स्पर्धा करेल, असा नवीन स्मार्टफोन आणण्यास सहसा कुणी धजावत नाही. मात्र, ‘वन प्लस’ ने हे धाडस केलं आहे. ‘वन प्लस ५ टी’ हा जवळपास ‘वन प्लस ५’च्याच किमतीत उपलब्ध असल्याने हे दोन्ही फोन इतक्या कमी कालावधीत आणण्यामागचे कारण कंपनीच सांगू शकेल. परंतु, ‘वन प्लस ५ टी’चा आढावा घेतला असता, हा फोन सध्या ग्राहकांच्या पसंतीक्रमात आघाडीवर का आहे, हे नक्कीच जाणवते.

अंतर्गत व्यवस्था

‘वन प्लस ५ टी’ हा अँड्रॉइड नोगट अर्थात अँड्रॉइडच्या सातव्या आवृत्तीवर आधारित स्मार्टफोन आहे. मात्र, तो अँड्रॉइड आठवर अपग्रेड करण्याची सुविधा कंपनीने पुरवली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८३५ चिपसेट असून २.४५ गिगाहार्ट्झचे चार आणि १.९ गिगाहार्ट्झचे चार असे आठ प्रोसेसर फोनची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित ठेवतात. हा फोन ६ जीबी आणि ८ जीबी अशा दोन प्रकारच्या रॅममध्ये उपलब्ध आहे. तसेच त्यात अनुक्रमे ६४ आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोअरेजची सुविधा आहे.  वरील सर्व वैशिष्टय़े अतिशय तगडी असल्याने ‘वन प्लस ५टी’ अतिशय वेगाने सर्व आज्ञा हाताळतो. आमच्या वापरादरम्यान एकदाही स्मार्टफोन अडखळल्याचे अथवा हँग झाल्याचे आम्हाला आढळले नाही.

बॅटरी

‘वन प्लस ५ टी’मध्ये ३३०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. बॅटरीची क्षमता कमी वाटत असली तरी, एकूण वापराच्या तुलनेत ती जास्त काळ टिकते, असा अनुभव आम्हाला वापरादरम्यान आला.

तसेच ही बॅटरी चार्ज होण्यासही फार वेळ घेत नाही.

एकूणच, वन प्लस ५ टी हा ४० हजारांपेक्षा कमी किमतीत अतिशय चांगली वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन आहे, असे म्हणायला हरकत नाही. विशेषत: कोणत्याही फ्लॅगशिप फोनमध्ये असलेली सर्व वैशिष्टय़े या फोनमध्ये आढळतात. बांधणी वा दिसण्यात हा फोन फारसा आकर्षक नसला तरी त्याची कामगिरी दमदार आहे.

बांधणी व रचना

‘वन प्लस ५ टी’ची बांधणी अगदी साधी आहे. पुढच्या बाजूला पूर्णपणे काचेचा डिस्प्ले असलेल्या या फोनची चौकट आणि मागचे आवरण अ‍ॅल्युमिनियमने बनलेले आहे. त्यामुळे स्मार्टफोनला आकर्षक म्हणावा असा ‘लुक’ येत नाही. मात्र, अ‍ॅल्युमिनियममुळे फोनचे वजन निश्चितच कमी झाले आहे.

या फोनचा अमोल्ड डिस्प्ले ६.०१ इंच आकाराचा आहे. मात्र, नेहमीच्या फोनपेक्षा फोनचा स्क्रीन उभट आहे. यामध्ये १०८० बाय २१६० पिक्सेल इतके रेझोल्युशन असून उभट स्क्रीनमुळे व्हिडीओ किंवा मूव्ही पाहण्याचा अनुभव चांगला आहे. कोर्निग गोर्रिला ग्लास ५मुळे फोनची स्क्रीन मजबूत वाटते. तसेच त्यावरील रंग अतिशय स्पष्ट उमटतात.

कॅमेरा

कॅमेरा ही या फोनची सर्वात उजवी बाजू म्हणावी लागेल. या फोनमध्ये मागील बाजूस १६ एमपी आणि २० एमपीचा डय़ुअल कॅमेरा आहे. मागे एका लेखात आम्ही ‘डय़ूअल’ कॅमेऱ्यांचा फायदा सांगितला होता. ‘डय़ुअल कॅमेऱ्या’मुळे छायाचित्रे अधिक उठावदार, स्पष्ट आणि व्यवस्थित फोकस असलेली येतात. हा अनुभव ‘५ टी’बाबतीत आम्हाला आला. पुढील बाजूसदेखील १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांतून काढलेली छायाचित्रे अतिशय चांगल्या दर्जाची आहेत. या फोनमध्ये ‘पोटर्र्ेट’ छायाचित्रणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. त्या आधारे तुम्ही पाश्र्वभूमी धूसर करून केवळ तुम्हाला ज्या वस्तूचे वा व्यक्तीचे छायाचित्र काढायचे आहे, तेवढेच स्पष्ट काढू शकता. ‘फ्लॅगशिप’ फोनला टक्कर देणारे हे वैशिष्टय़ आहे. ‘५टी’मध्ये फोर के व्हिडीओ रेकॉर्डिगची सुविधा असून ‘स्लो मोशन’ चित्रीकरणाचाही पर्याय यात आहे. एकूणच कॅमेऱ्याच्या बाबतीत ‘वन प्लस ५ टी’ वापरकर्त्यांला पुरेपूर समाधान देतो.

थोडक्यात वैशिष्टय़े

  • ६.०१ इंच आकाराची स्क्रीन
  • ६ जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज
  • १६+ २० मेगापिक्सेल डय़ुअल रेअर कॅमेरा.
  • १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • अँड्रॉइड ७ ऑपरेटिंग सिस्टीम
  • किंमत : ३२ ते ३७ हजार रुपये. (ई कॉमर्स संकेतस्थळांवर)