आसिफ बागवान asif.bagwan@expressindia.com

‘वन प्लस’ या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या कंपनीचे स्मार्टफोन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पसंतीस उतरत आहेत. दर्जेदार वैशिष्टय़े, आकर्षक लुक आणि मजबूत बांधणी यांच्या जोरावर ‘वन प्लस’चे स्मार्टफोन नामांकित कंपन्यांच्या ‘फ्लॅगशिप’ फोननाही टक्कर देऊ लागले आहेत. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला बाजारात आलेल्या ‘वन प्लस ६’ने ग्राहकांची मने जिंकली असतानाच वर्ष संपता संपता ‘वन प्लस’ने याच फोनची सुधारित आवृत्ती असलेला ‘६ टी’ हा स्मार्टफोन बाजारात आणला. ‘वन प्लस ६’च्या किमतीइतक्याच किमतीत उपलब्ध असलेला ‘वन प्लस ६टी’ हा फोन कामगिरी, वैशिष्टय़े, डिझाइन आणि नावीन्य या सर्वच बाबतीत ‘सुपर’ ठरेल, यात शंका नाही.

डिझाइन

डिझाइनच्या बाबतीत ढोबळपणे पाहायला गेलं तर ‘वन प्लस ६’पेक्षा ‘वन प्लस ६ टी’ फारसा वेगळा दिसत नाही. पण बारकाईने पाहिल्यास यातील छोटे पण महत्त्वाचे बदल लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे, या फोनचा आकार थोडासा वाढल्याचे दिसून येते. ‘डिस्प्ले’चा आकार वाढवण्यासाठी फोनचा आकार काही प्रमाणात वाढवण्यात आला आहे. दुसरे म्हणजे, फोनच्या मागील बाजूस असलेले फिंगर प्रिंट स्कॅनर नाहीसे झाल्याचे दिसते. त्याऐवजी डिस्प्ले स्क्रीनवरच ‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत आपण पुढे विस्ताराने मांडणार आहोतच. आणखी एक गोष्ट म्हणजे, या फोनमधून हेडफोनसाठीचा ३.५ मिमीचा जॅक काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी बॅटरी कनेक्टर जॅकलाच हेडफोन जोडण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. ‘६टी’मध्ये ‘सी टाइप’ चार्जिग प्लग पुरवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने हेडफोन खरेदी करावे लागतील. कंपनीने असा हेडफोन दिला नसला तरी, ‘सी टाइप’ प्लगचा कनेक्टर स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये पुरवला आहे. या कनेक्टरशी तुमचा नेहमीचा हेडफोन जोडून तुम्ही संगीत ऐकण्याचा आनंद घेऊ शकता.

डिस्प्ले

मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘वन प्लस ६’पेक्षा ‘६टी’चा डिस्प्ले मोठा आहे. ‘वन प्लस ६’मध्ये ६.२८ इंचाचा डिस्प्ले पुरवण्यात आला होता. तर नवीन फोनमध्ये ६.४० इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अतिशय आकर्षक असून यावर रंगसंगतीत बदल करावा लागत नाही. उजळ चित्रे असो की अंधूक प्रकाशातील दृश्ये दोन्हीबाबतीत डिस्प्ले सुस्पष्ट दिसतो. यामध्येही ‘नॉच’ची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला हवा तेव्हा काठोकाठ डिस्प्ले वापरता येतो.

कॅमेरा

या फोनमध्ये १६+२० मेगापिक्सेलचा डय़ुअल कॅमेरा पुरवण्यात आला आहे. हा कॅमेरा अतिशय उत्तम छायाचित्रे काढून देतो. अगदी दूरची छायाचित्रेही यात व्यवस्थित टिपली जातात. त्याचप्रमाणे पोटर्र्ेट छायाचित्रणासाठीही हा कॅमेरा अतिशय चांगली कामगिरी करतो. फोनच्या पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला असून त्यातील सेल्फी चांगल्या दर्जाचे आहेत. ‘वन प्लस ६’मध्ये असलेल्या कॅमेऱ्याचीच वैशिष्टय़े या फोनमध्येही ठेवण्यात आली आहेत. मात्र, यातील काही वैशिष्टय़ांत भरही टाकण्यात आली आहेत.

कामगिरी

‘वन प्लस’ने ‘६टी’ हा सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा की खोटा हे पडताळण्याची यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र, तत्पर कार्यवाही करण्यात हा फोन अजिबात कसूर करत नाही. सहा ते आठ जीबी रॅम, १२८ जीबीची स्टोअरेज क्षमता आणि आठ प्रोसेसर असल्यामुळे हा फोन वेगवान आहे, यात शंका नाही. गेमिंग मोडमध्ये ईमेल, कॉल आणि अन्य नोटिफिकेशन पाहतानाही तो संथ होत नाही, हे विशेष.

बॅटरी

‘वन प्लस’च्या आम्ही हाताळलेल्या आजवरच्या सर्वच फोनच्या बॅटरी अतिशय दर्जेदार असल्याचे आढळून आले. ‘६टी’ बाबतीतही यापेक्षा वेगळे सांगण्याची गरज नाही. ३७०० एमएएच क्षमतेची बॅटरी फोनचा पसारा अतिशय योग्यपणे सांभाळते. विशेष म्हणजे, बॅटरी चार्ज होण्यासाठी लागणारा वेळही अतिशय कमी असून अगदी १५ मिनिटांत फोनची बॅटरी १० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर गेल्याचा अनुभव आम्ही घेतला. त्यामुळे याबाबतही ‘६ टी’ तक्रारीला वाव ठेवत नाही.

फिंगर प्रिंट स्कॅनर

मघाशी म्हटल्याप्रमाणे ‘वन प्लस ६ टी’मध्ये ‘फिंगर प्रिंट स्कॅनर’साठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही. त्याऐवजी फोनच्या स्क्रीनवरच खालच्या बाजूस ‘अदृश्य’ फिंगर प्रिंट स्कॅनर बसवण्यात आला आहे. त्यामुळे स्क्रीनवर तुमचे बोट ठेवताच फोन अनलॉक होतो. ही सुविधा तशी पाहायला गेले तर आकर्षक आहे. मात्र, तिच्या काही उणिवाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, सर्वसाधारणपणे फोन हातात घेतल्यानंतर तो अनलॉक करण्यासाठी आपल्याला तो विशिष्ट पद्धतीने हातात धरावा लागतो. सवयीने ही अडचण जाणवत नसली तरी, सुरुवातीला हे करताना थोडासा त्रास होतोच. हे फिंगर प्रिंट स्कॅनर व्यवस्थित काम करत असले तरी, काही वेळा बोटांचे ठसे नीट नोंदवले न गेल्याने फोन अनलॉक होताना अडचणी आल्याचेही जाणवले. हे प्रमाण कमी असले तरी, ‘वन प्लस’ने याची नोंद घेऊन त्यात काही आवश्यक बदल करायला हवेत.

अन्य वैशिष्टय़े

* वजन : १८५ ग्रॅम

*  सिम : डय़ुअल सिम

*  मेमरी : अंतर्गत २५६ जीबी, ८ जीबी रॅम (१२८/६चा पर्यायही उपलब्ध)

*  प्रोसेसर : ऑक्टाकोअर

*  ऑपरेटिंग सिस्टीम :  अँड्रॉइड ९.०

*  किंमत : ३७,९९९ रुपये.