लॅपटॉप हे आपल्या दैनंदिन गरजेचे साधन बनले आहे. शालेय विद्यार्थ्यांना करावयाचा ‘प्रोजेक्ट’ असो वा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील मदत असो किंवा कार्यालयीन वापर अशा प्रत्येक कामासाठी आजकाल लॅपटॉपला डेस्कटॉपपेक्षा प्राधान्य दिले जाते. भारतात अ‍ॅपलचे ‘मॅक’बुक आणि आणखी वेगवेगळय़ा कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम असलेले लॅपटॉप उपलब्ध झाले असले तरी, अजूनही मायक्रोसॉफ्टच्या ‘विंडोज’आधारित लॅपटॉपना पहिली पसंती दिली जाते. विंडोज लॅपटॉपमध्ये उपलब्ध असलेले वैविध्य आणि त्यांची सर्वसमावेशक किंमतश्रेणी यांमुळे या लॅपटॉपकडे ग्राहकांचा ओढा अधिक असतो. ‘विंडोज १०’वर चालणाऱ्या लॅपटॉपचे असंख्य पर्याय सध्या उपलब्ध आहेत. या पाश्र्वभूमीवर बाजारात सध्या कोणत्या लॅपटॉपची अधिक चलती आहे, कोणते लॅपटॉप नवनवीन वैशिष्टय़ांसह उपलब्ध झाले आहेत, ते आपण पाहू.

डेल एक्सपीएस १३

भारतीय बाजारात डेल या कंपनीचे लॅपटॉप लोकप्रिय आहेत. ‘डेल’च्या लॅपटॉपबद्दल दीर्घकाळ चालणारे आणि दिसायला आकर्षक अशी पसंतीची पावती दिली जाते. याच कंपनीचा ‘एक्सपीएस १३’ हा लॅपटॉप बाजारात आला आहे. टचस्क्रीन डिस्प्ले, फोर के पॅनल या गोष्टी या लॅपटॉपवर काम करण्याचा अनुभव सुखद करतात. या लॅपटॉपच्या रचनेत अल्पसे बदल करून त्यांची बांधणी अधिक आकर्षक करण्यात आली आहे. अर्थात गेमिंगसाठी हा लॅपटॉप चांगला आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, यातील ‘इंटिगेट्रेड ग्राफिक्स’मुळे तुम्हाला ग्राफिक कार्ड किंवा व्हिडीओ कार्ड न बसवता कमी क्षमता वापरणारे गेम नक्कीच खेळता येतील.

वैशिष्टय़े : इंटेल कोअर आय५-आय७ ची आठवी आवृत्ती, इंटेल अल्ट्रा एचडी ग्राफिक्स ६२०,

आठ ते १६ जीबी रॅम, १३.३ इंच आकाराची स्क्रीन, ४ के डिस्प्ले, २५६ जीबी ते एक टीबी क्षमतेची हार्डडिस्क.

एचपी स्पेक्ट्रे एक्स३६० १५टी

एचपीचे लॅपटॉप भारतात सर्वाधिक ग्राहकांना भावतात. त्यांच्या किमतीही परवडणाऱ्या असतात. याच श्रेणीत आता हा नवा लॅपटॉप आला आहे. या लॅपटॉपचा डिस्प्ले अतिशय आकर्षक असून गेममधील बारीक तपशीलही स्पष्टपणे पाहतात येतात. हा लॅपटॉप नोटबुक आणि लॅपटॉप अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो. हा लॅपटॉप ‘एचपी पेन’शी सुसंगत होऊ शकत असल्याने चित्रकार किंवा तत्सम क्षेत्रातील मंडळींनाही तो उपयोगी पडतो.

वैशिष्टय़े : इंटेल कोअर आय७, एन्व्हीडिया जीईफोर्स जीटीएक्स कार्ड, आठ ते १६ जीबी रॅम, १५.६ इंच आकाराची स्क्रीन, २५६ जीबी ते दोन टीबीपर्यंतची हार्डडिस्क.

मायक्रोसॉफ्ट सरफेस गो

हा लॅपटॉप शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अधिक पसंत पडण्याची शक्यता आहे. मात्र, याची किंमत जास्त असल्याने फारच कमी ग्राहक त्याला पसंती देतात. मात्र, हा लॅपटॉप ‘पैसा वसूल’ अनुभव नक्कीच देतो. या लॅपटॉपचा टॅब्लेटसारखा वापर करता येतो. त्यासोबत मिळणारा कीबोर्ड विलग करता येतो.

वैशिष्टय़े : इंटेल पेंटियम गोल्ड, इंटेल एचडी ग्राफिक्स, चार ते आठ जीबी रॅम, दहा इंच आकाराची स्क्रीन, ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज, १२८ जीबी स्टोअरेजवाढ क्षमता.

ह्राु आई मेटबुक १३

तुम्हाला एकाच वेळी अनेक ‘टास्क’ सक्षमपणे हाताळू शकणारा, गेमसाठीही उपयुक्त आणि तरीही फार किंमत नसलेला लॅपटॉप घ्यायचा असेल तर ह्राु आईचा मेटबुक १३ हा चांगला पर्याय आहे. यामधील वैशिष्टय़े तुम्हाला अव्वल दर्जाच्या लॅपटॉपमध्ये आढळून येतात. मात्र, या लॅपटॉपमध्ये काही उणिवाही जाणवतात. यात कनेक्टिव्हिटीसाठीचे पर्याय मर्यादित आहेत.

वैशिष्टय़े : इंटेल कोअर आय५-आय७ची आठवी आवृत्ती, इंटेल अल्ट्रा एचडी ग्राफिक्स ६२०, एन्व्हीडिया जीफोर्स दोन जीबी जीडीडीआर५, आठ जीबी रॅम,१३ इंच आकाराची स्क्रीन, २५६ जीबी ते ५१२ जीबी हार्डडिस्क.