26 April 2019

News Flash

अवयवदान : नियमावली नि प्रक्रिया

अवयवदान करणे आणि अवयवांचे प्रत्यारोपण करणे यासाठी कायद्यानुसार विशिष्ट नियमावली आहे.

अवयवदान करणे आणि अवयवांचे प्रत्यारोपण करणे यासाठी कायद्यानुसार विशिष्ट नियमावली आहे. अवयवदानाबाबतच्या समाजमाध्यमांवरील संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा ही नेमकी प्रक्रिया कशी असते हे पुण्याच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक आरती गोखले यांच्याकडून समजून घेऊया..

‘सुधीर आणि त्यांच्या पत्नीला रस्ते अपघातात मृत्यू आल्याने चार मूत्रपिंड उपलब्ध आहेत. ही मूत्रपिंड गरजू रुग्णांना मिळाव्यात यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. हा संदेश जास्तीतजास्त व्यक्तीपर्यंत पोहोचवा’ अशी माहिती अनेकदा समाजमाध्यमामधून फिरत असते. माहितीच्या अभावामुळे किंवा गरजू रुग्णाला उपयोग व्हावा या भावनेने अनेकदा हे संदेश कोणतीही शहानिशा न करताच पुढे पाठविले जातात. अवयवदान केल्यामुळे अनेक व्यक्तींना नवे आयुष्य देऊ शकतो, हे खरे असले तरी अशा प्रकारे समाजमाध्यमांवर संदेश पाठवून किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अवयवदान करणे शक्य नाही तसेच गरजू रुग्णाला अवयव मिळणेही शक्य नाही. आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या कायदेशीर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

अवयवदान

रुग्णाच्या शरीरातील एखादा अवयव निकामी झाल्यानंतर त्याच्या शरीरात दुसऱ्या व्यक्तीचा सुस्थितीतील अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. यातून त्या व्यक्तीला नवे आयुष्य मिळू शकते. अवयवदान ही प्रक्रिया दोन पद्धतीने पार पाडली जाते. जिवंत व्यक्ती आपल्याच नातेवाईकाला अवयवदान करू शकते आणि दुसरे म्हणजे मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान करता येतात.

मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान

सद्य:स्थितीत सर्वाधिक अवयवदान मेंदूमृत रुग्णांमार्फत केले जाते. रस्ते अपघातात किंवा इतर एखाद्या गंभीर आजारामध्ये मेंदूमृत झाल्यास अवयवदान करण्याचा निर्णय रुग्णाचे नातेवाईक घेऊ शकतात. रुग्णाचे अवयव निरोगी आणि दान करण्यासाठी योग्य आहेत का याची चाचणी रुग्णालयात केली जाते. त्यानंतरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गरजू रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपित केले जातात.अवयवदान केल्यानंतर योग्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची (झेडटीसीसी)असते. रुग्णालयात एखादा रुग्ण मेंदूमृत असल्याचे जाहीर केल्यानंतर रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक त्याच्या नातेवाईकाशी संपर्क साधून अवयवदानाची गरज, महत्त्व आणि प्रक्रिया याबाबत समुपदेशन करतात. अवयवदान करण्याची तयारी दर्शवल्यानंतर नातेवाईकांच्या इच्छेनुसार दान करावयाच्या अवयवांची माहिती झेडटीसीसीला दिली जाते. उदाहरणार्थ क्ष हा रुग्ण मेंदूमृत झाल्याने त्याच्या दोन मूत्रपिंडांचे दान करण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवल्यास त्यातील एक मूत्रपिंड त्या रुग्णालयाकडे राहते आणि दुसरे झेडटीसीसीकडे प्रत्यारोपणसाठी सोपवले जाते. या समितीकडे संपूर्ण विभागातील मूत्रपिंडांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संपूर्ण यादी असते. रक्तगटानुसार त्या प्रतीक्षा यादीतील योग्य रुग्णामध्ये मूत्रिपड प्रत्यारोपित करण्याचा निर्णय समितीमार्फत घेतला जातो.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)

महाराष्ट्रात, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा चार ठिकाणी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. मेंदूमृत अवयवदाता ते रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून ही समिती काम करते. अवयव निकामी झाल्याने आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संपूर्ण तपशिलासह माहिती या समितीकडे असते. रुग्णाच्या निकामी झालेले अवयव आणि त्यावर सुरू असलेले उपचार याची सर्व वैद्यकीय माहिती दिल्यानंतर रुग्णाचे नाव प्रतीक्षायादीत नोंदवले जाते.

जिवंत दात्याचे अवयवदान

आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी एखाद्या गंभीर विकाराने ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला जिवंतपणी अवयव देण्याचा निर्णय रक्ताच्या नात्यातील व्यक्ती घेऊ शकते. हे नाते कागदोपत्री सिद्ध करणे, तसेच त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हा आवश्यक आहे. याबाबतची माहिती रुग्णाचे उपचार सुरू असलेले रुग्णालय किंवा वैद्यकीय सामाजिक कार्यकता यांच्याकडे उपलब्ध असते.

अवयवदानाबाबत गैरसमज

अवयवदान प्रक्रियेने गेल्या काही वर्षांत वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी अवयवांचे दान करण्याबाबत अनेक गैरसमज अस्तित्वात आहेत. डोळे दान केल्याने पुढील जन्म आंधळ्याचा मिळतो, शरीराचे विद्रुपीकरण होते, मृतदेहाची विटंबना होते अशा गैरसमजांमुळे नागरिक साशंक असल्याचे दिसते.

अवयवदानाबाबत माहिती..

अवयवदान करण्याबाबत संकल्प करण्यासाठी, मरणोत्तर अवयवदानासाठी रिजनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायजेशन किंवा नॅशनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑफ इंडिया या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. याबाबत अधिक माहिती १८००-११-४७७० या टोल फ्री क्रमांकावर किंवा विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या १८००-२७-४७-४४४ या क्रमांकावरही उपलब्ध आहे.

मेंदूमृत रुग्ण म्हणजे काय?

मेंदूमृत परिस्थितीला पोहोचणारे ९९ टक्के रुग्ण हे रस्ते अपघातांमध्ये गंभीररीत्या जखमी झालेले असतात. अतितीव्र पक्षाघात, मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव अशा कारणांमुळे ही काही रुग्ण मेंदूमृत होतात. अशा रुग्णांमध्ये मेंदूचे कार्य बंद झालेले असते, परंतु कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवलेले असते. हृदयक्रिया, मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य सुरू असते. रक्तदाब व्यवस्थित असतो. डोळ्यांची हालचाल होत नाही.

शब्दांकन : भक्ती बिसुरे

First Published on February 12, 2019 2:30 am

Web Title: organ donation