02 July 2020

News Flash

मौखिक आरोग्याकडे लक्ष

तोंडाच्या म्हणजेच मौंखिक आरोग्यावर आपल्या शरीराचे स्वास्थ्य अवलंबून असते.

डॉ. विवेक पाखमोडे, दंततज्ज्ञ

दात किंवा हिरडय़ांचे विकार उद्भवल्यानंतर दातांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पटते. परंतु ही वेळ येण्याआधीच तोंडाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे, हे समजून घेणे अधिक फायदेशीर आहे.

आपल्याकडे दातांच्या तक्रारी निर्माण होण्याचे प्रमाण सर्रास दिसते. कृत्रिम दात बसवण्याची मागणी अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. भारतीयांच्या दातांचे सरासरी आयुष्य हे अवघे ४० वर्षे आहे.

तोंडाच्या म्हणजेच मौंखिक आरोग्यावर आपल्या शरीराचे स्वास्थ्य अवलंबून असते. तोंडाचे आरोग्य बिघडल्यास त्याचा परिणाम अन्नसेवनावर होतो. त्यामुळे सदृढ दात आणि हिरडय़ा ठेवण्यासाठी आहार व खाण्यापिण्याच्या योग्य सवयी लावणे आवश्यक आहे.

दातांची वाढ पाच वर्षांपर्यंत आणि जबडय़ाच्या हाडांची वाढ वीस वर्षांपर्यंत होत असल्याने कॅल्शियम व फॉस्फरसची या कालावधीत अत्यंत गरज असते. मूल लहान असताना दूध पीत असल्याने त्यातून याची पूर्तता होते. परंतु जसजसे मूल मोठे होते, तसतसे दूध पिण्यासाठी नाक मुरडतात. अशा परिस्थितीत दुधाचे इतर पदार्थ दही, ताक, लोणी बालकांना द्यावे. बदाम, अक्रोड, खजूर, बेलफळ, शेंगदाणे आणि गाजर यांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते; तर गाजर, बदाम आणि खोबरे यांमध्ये फॉस्फरसही मोठय़ा प्रमाणात आढळते.

दातांना बळकटी येण्यासाठी फ्लोराइडची आवश्यकता असते. हे खरे असले तरी मर्यादेपेक्षा कमी आणि अधिक फ्लोराईडचे प्रमाण झाल्यास दातांवर त्याचा परिणाम होतो. पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी असल्यास मुलांचे दात लवकर किडू शकतात. चीज, चहा, शेलफिश यासारखी फ्लोराईडची अधिक मात्रा असणारे पदार्थ शक्यतो टाळावेत. फ्लोराईड टूथपेस्टचा वापर कदापि करू नये.

दातासंबंधी मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या दोन समस्या म्हणजे दातांची कीड आणि हिरडय़ांचे विकार. चमचमीत, गोडधोड पदार्थ हे दातांचे शत्रूच आहेत, असे म्हणायला हरकत नाही. दातांच्या फटीत व आजूबाजूला जमणाऱ्या या पदार्थामुळे ब्युट्रिक नामक आम्लनिर्मिती होते. तोंडात आढळणाऱ्या काही जीवाणूंना चिकट गोड पदार्थामध्ये अधिक रस असल्यामुळे हे आम्ल निर्माण होते. या आम्लामुळे पुढे दात किडू लागतात. यालाच आपण दंतक्षय म्हणतो. म्हणूनच गोड आणि चिकट अशा पदार्थाचे अतिसेवन टाळावे. जेवण झाल्यानंतर, दोन जेवणादरम्यान आणि न्याहरीमध्ये गोड पदार्थाचा समावेश करू नये. त्याऐवजी जेवताना असे पदार्थ खाण्यास हरकत नाही.

जेवणानंतर मुखशुद्धीसाठी गाजर, सफरचंद इत्यादी फळे खावीत, जेणेकरून त्यांच्या तंतूच्या साहाय्याने दातांना चिकटलेले अन्नकण निघण्यास मदत होते. चॉकलेट, पेपरिमट खाणे शक्यतो टाळावे. अगदीच खाण्याचा मोह न आवरल्यास खाल्ल्यानंतर दात घासावेत किंवा चॉकलेट खाल्ल्यानंतर सफरचंदाची एखादी फोड खावी. वेफर्स, पापड यासारखे दाताला चिकटणारे पदार्थ केवळ जेवणासोबतच खावेत.

जिभेची काळजी

* आहारातील रिबोफ्लॅवीन या जीवनसत्त्व ब गटातील जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जिभेवरील रंध्रे नष्ट होऊन ती तुळतुळीत होते व वेदना होतात. तोंडाच्या कडांना चिरा पडतात. हे जीवनसत्त्व दूध, हिरव्या पालेभाज्या व अंडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळते.

* लोहाच्या कमतरतेमुळे जीभेवर असे बदल आढळून येतात. मेथी, पालक, कोंथिबीर व खजूर लोह मोठय़ा प्रमाणात असते.

*  पान, सुपारी, तंबाखू यांच्या सेवनाने दात, हिरडय़ांवर दुष्परिणाम तर होतातच, शिवाय मुखाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.

हिरडय़ांची निगा

हिरडय़ांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी दात नीट घासणे जसे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सुदृढ राखण्यासाठी जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’चा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. जीवनसत्त्व ‘अ’मुळे हिरडय़ांचेच नव्हे तर तोंडातील मऊ अशा श्वेषमपटलाचे वरील आच्छादनही मजबूत राहते. जीवनसत्त्व ‘क’ हिरडय़ांच्या आतील भागातील एकसंधतेसाठी महत्त्वाचे असते. या दोन्ही जीवनसत्त्वांचा अभाव झाल्यास हिरडय़ा मऊ होतात आणि त्यातून रक्त येण्याच्या तक्रारी सुरू होतात. अशा हिरडय़ांनी किंचित कठीण पदार्थ खाणेही अशक्य होऊन बसते. गाजर, पिवळी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ तर आवळा, पेरू, टोमॅटो इत्यादी फळांमध्ये जीवनसत्त्व ‘क’ची भरपूर मात्रा असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 3:07 am

Web Title: overview of oral health zws 70
Next Stories
1 घरचा आयुर्वेद : तळपायांच्या भेगा
2 आजारांचे कुतूहल : सिलिअ‍ॅक डिसीज
3 योगस्नेह : भस्रिका प्राणायाम
Just Now!
X