डॉ.अमोल देशमुख

अजय, एक पस्तिशीतला तरुण सरकारी कार्यालयात काम करतो. सगळं सुरळीत सुरू असताना एके दिवशी अचानक त्याच्या कार्यालयातील एका सहकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचं त्याला कळलं. त्यानंतर काही दिवस अजय काळजीतच होता. हे सगळं वर्षांआधी घडलं आणि तेव्हापासून अजयला अचानक बेचैन व्हायला लागलं. कधी कधी थरथर कापायला लागला. तो अस्वस्थ व्हायचा. त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. त्याच्या अचानक छातीमध्ये दुखायचं, आपल्याला हृदयाचा झटका येतो का, असंही त्याला वारंवार वाटायचं. असा त्रास झाला की तो त्रास १५ ते २० मिनिटांसाठी चालायचा. अजयला जवळपास एक-दोन दिवसांतून तरी एकदा असा त्रास होत असे. शहरातील अनेक हृदयरोगतज्ज्ञांना त्याने दाखवून झाले. हृदयासंबंधित बऱ्याच चाचण्या म्हणजे ईसीजी, टूडी इको करून झाल्या. सर्व हृदयरोगतज्ज्ञांनी तुला हृदयाचा कुठलाही त्रास नाही, असं वारंवार सांगितलं तरीही अजयचं समाधान होईना. याउलट त्याचा त्रास मात्र तसाच होता. या त्रासाचा त्याच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम दिसून येत होता.

हृदयाच्या झटक्यांचा वाटणारा पण हृदयाचा झटका नसणारा हा ‘पॅनिक अटॅक’. आजकालच्या धकाधकीच्या युगात हा त्रास जरा जास्तच  दिसून येत आहे. या त्रासात हृदयाची प्रक्रिया व स्थिती एकदम व्यवस्थित असते. तरीही व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणं जाणवत असतात. कदाचित ही लक्षणे पॅनिक अटॅकची असू शकतात. हा पॅनिक अटॅक म्हणजे चिंतेचा झटका. तो जर वारंवार येत असेल तर त्याला आपण पॅनिक डिसऑर्डर किंवा चिंतेच्या झटक्यांचा आजार म्हणतो.

पॅनिक अटॅकची लक्षणे

या झटक्यात व्यक्तीला थोडय़ा वेळासाठी अतिशय बैचेन वाटते, गरगरते, चक्कर येते, तीव्र भीती वाटते, आपण मरतो की काय असं वाटते, छातीत धडधडते, घाम येतो, श्वसनाला त्रास होतो, छातीवर दाब आल्यासारखे वाटते. हा त्रास अचानकपणे सुरू होतो आणि काही सेकंदांपासून १० ते २० मिनिटापर्यंत राहू शकतो.

कारणे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या त्रासाला पॅनिक डिसऑर्डर किंवा चिंतेच्या झटक्यांचा आजार म्हणतात. मेंदूत रासायनिक असमतोल आणि शरीरातील ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम चंचल झाल्याने अशा प्रकारचे चिंतेचे उद्रेक येतात. आनुवंशिकता, जुनाट चिंता, सततचे ताणतणाव, भित्रा स्वभाव अशा प्रकारची बरेचशी  कारणे या पाठीमागे आहेत.

उपचार काय?

या आजारावर उपचार आहेत. उपचार पद्धतीत औषधोपचार आणि समुपदेशन महत्त्वाचे ठरते. औषधोपचाराने रासायनिक बदल आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची अतिचंचलता पूर्ववत होते. यात औषधोपचार केले जातात. त्याशिवाय समुपदेशनाचा सर्वात मोठा वाटा रुग्ण बरा होण्यात आहे. समुपदेशनात प्रामुख्याने सीबीटी आणि आरईबीटी या पद्धतींचा वापर होतो. ध्यानधारणा आणि योगा यांचा बऱ्याच अंशी फायदा होतो, अस निदर्शनास आले आहे.