19 October 2019

News Flash

आजारांचे कुतूहल : अर्धागवायू

कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्या फुटणे किंवा रक्तात गाठी होऊ  शकतात.

डॉ. अविनाश भोंडवे

अर्धागवायू म्हणजेच पक्षाघाताचा झटका. वैद्यकीय परिभाषेत स्ट्रोक किंवा पॅरालिसिस. भारतात अर्धागवायूचे प्रमाण दर हजार लोकसंख्येत दोन इतके आढळते. सुमारे पंधरा लाख रुग्णांना दरवर्षी पक्षाघात होतो.

हृदयापासून मेंदूपर्यंत आणि मेंदूकडून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या अशा दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या मेंदूत असतात. मानेच्या पुढून दोन आणि मागून दोन अशा चार रक्तवाहिन्यांतून मेंदूला रक्तपुरवठा होतो. मेंदूत गेल्यावर रक्तपुरवठा करण्यासाठी या वाहिन्यांचे अतिशय बारीक अशा केशवाहिन्यांमध्ये विभाजन होत एक जाळे बनलेले असते.

पक्षाघाताचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार असतात. रक्तवाहिनीत गुठळी झाल्यास किंवा मेंदूत रक्तस्राव झाल्यास अथवा रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूला पोचणारा रक्तप्रवाह खंडित होतो. हा रक्तपुरवठा मेंदूच्या ज्या भागातील पेशींना होत असतो, त्याला रक्तातून मिळणारा प्राणवायू मिळणे बंद होते आणि त्या निर्जीव होतात. परिणामत: तो भाग अंशत: किंवा पूर्णत: अकार्यक्षम होतो. साहजिकच मेंदूच्या त्या भागाचे शरीरावरील ज्या अवयवावर नियंत्रण असते त्यांचे कार्य कमी होते वा बंद पडते.

जर मेंदूच्या आत रक्तवाहिनी फुटली तर रक्त त्यातून बाहेर येऊन मेंदूत रक्ताची गाठ (थ्रोम्बस) बनते. रक्तवाहिनीतून बाहेर येणारे रक्त जसजसे वाढत जाते, तसतसा गाठीचा आकार वाढत जाऊन रक्तवाहिनी किंवा तिची जखम बंद होते आणि रक्तस्राव थांबतो. मात्र काही रुग्णांत रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात होतो आणि कवटीच्या आतील दबाव वाढत जाऊन मेंदू कार्य थांबते. काही रुग्णांत रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ बनून ती सरकत राहते (एम्बोलस) आणि ती छोटय़ा रक्तवाहिनीत अडकून पुढील रक्तपुरवठा थांबतो.

कारणे

* उतारवय- वाढत्या वयोमानामध्ये रक्तवाहिन्या कडक होतात आणि सहज फुटतात, तसेच त्यात रक्ताच्या गाठी सहजी होतात.

*  उच्च रक्तदाब- यात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. अतिरिक्त रक्तदाबामुळे त्या फुटतात. हृदयविकाराच्या झटक्यात वरचा रक्तदाब ७० पेक्षा कमी झाल्यास पक्षाघाताचा झटका येऊ  शकतो.

*  धूम्रपान, स्थूलत्व, मधुमेह

*  कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्या फुटणे किंवा रक्तात गाठी होऊ  शकतात.

*  मेंदू व मज्जारज्जूच्या विशिष्ट भागात हालचालींचे नियंत्रण करणाऱ्या किंवा संदेशवहन सांभाळणाऱ्या भागांवर दबाव आल्याने, त्यात पू किंवा इजा झाल्यास शरीराच्या संबंधित अवयवाची शक्ती कमी होऊन लुळेपणा येतो.

लक्षणे

* उभ्या शरीराचा अर्धा भाग (एक हात आणि एक पाय), चेहऱ्याचा अर्धा भाग लुळा पडतो. मेंदूच्या एका (डाव्या किंवा उजव्या) भागात रक्तप्रवाह दीर्घकाळ बंद पडून संबंधित भागातली शक्ती, हालचाल अंशत: किंवा पूर्णत: मंदावते आणि तो भाग लुळा पडतो.

* कमरेखाली दोन्ही पाय – पाठीच्या मणक्यातील मज्जारज्जूच्या पेशीत बिघाड झाला किंवा इजा झाली तर कमरेखालील भाग लुळा पडतो. याला पॅराप्लेजिया म्हणतात.

* रक्तप्रवाह काही क्षण खंडित झाला, तर नुसती चक्कर येते, शरीराच्या संबंधित भागाची हालचाल आणि शक्ती तात्पुरती जाते. याला ‘ट्रांझियंट इस्किमिक अ‍ॅटॅक’ म्हणतात.

उपचार

अर्धागवायू ही प्राणघातक स्थिती असल्याने रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. रक्ताची गाठ झाल्यामुळे जेव्हा पक्षाघात होतो, तेव्हा पहिल्या चार तासांत रुग्ण रुग्णालयात दाखल झाला तर, टीपीए नावाच्या औषधाने ती गाठ विरघळवून टाकता येते. सहा ते आठ तासांच्या अवधीत रुग्णालयात रुग्ण आल्यास शस्त्रक्रियेने उपचार करणे शक्य असते.

First Published on April 16, 2019 3:19 am

Web Title: paralysis causes of paralysis and treatment