12 November 2019

News Flash

काळजी उतारवयातली : पक्षाघात – उपचार आणि दुष्परिणाम

हाडे ठिसूळ झाल्याने आणि स्नायूंच्या कमजोरीमुळे रुग्ण पडण्याची आणि त्यामुळे फ्रॅक्चरची शक्यता वाढते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नीलम रेडकर

पक्षाघाताचा त्रास हा उतारवयात कधीही अचानक जाणवू शकतो. पक्षाघाताची लक्षणे मेंदूच्या कुठल्या भागाला आणि किती इजा झाली आहे यावर अवलंबून असतात. तर पक्षाघातावरील उपचार हे पक्षाघात कुठल्या कारणाने म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे की मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे झाला आहे याचे निदान झाल्यानंतर केले जातात. पक्षाघाताचे उपचार तातडीने देणे गरजेचे असते. पक्षाघातामुळे मेंदूचा जो भाग रक्तदाब आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित करतो, त्या भागाला जर इजा झाली असेल तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

पक्षाघाताचे दुष्परिणाम

* फुप्फुसांचा जंतुसंसर्ग

* रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे पायाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होते. (व्हिनस थ्रॉम्बॉसिस)

* आकडी येणे

* मूत्राशयावरील नियंत्रण गेल्याने, लघवी साठून राहाते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो.

* हाडे ठिसूळ झाल्याने आणि स्नायूंच्या कमजोरीमुळे रुग्ण पडण्याची आणि त्यामुळे फ्रॅक्चरची शक्यता वाढते.

* दाबाच्या ठिकाणी इजा होणे (प्रेशर सोर)

* हात- पाय आखडणे (कॉन्ट्रक्चरस)

* नैराश्य येणे

पक्षाघातावरील उपचार पद्धती

पक्षाघातावरील उपचार पद्धतींमध्ये वैद्यकीय उपचार, फिजिओथेरपी, व्यावसायिक उपचार पद्धती यांचा समावेश होतो.

वैद्यकीय उपचार पद्धती- 

रुग्णांना ज्या कारणाने पक्षाघात झाला आहे त्या कारणांना नियंत्रित करणे अतिशय महत्त्वाचे असते.

*  पक्षाघात जर मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे झाला असेल आणि रुग्ण जर लक्षणे दिसू लागल्यानंतर चार ते साडेचार तासांच्या आत आला तर तातडीने  सीटी स्कॅन, एमआरआय केले जाते. मेंदू रक्तस्राव झाला नसल्याची खात्री केल्यावर थ्रॉम्बोलिसिसचे उपचार केले जातात. हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून त्याला ‘गोल्डन हवर’ म्हटले जाते. कारण या उपचार पद्धतीमुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा पूर्णपणे विरघळू शकतो आणि रुग्ण पूर्ववत होऊ शकतो.

*  पक्षाघात उच्च रक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन झाला असेल तर रक्त्दाब नियंत्रित करणे आवश्यक आहे. अतिरक्तस्रावामुळे मेंदूतील दाब प्रमाणाबाहेर वाढला तर रुग्णांना ऑपरेशनची सुद्धा गरज लागू शकते.

फिजिओथेरपी-

पक्षाघातग्रस्त रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी फिजिओथेरपीचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. फिजिओथेरपीमुळे लुळ्या पडलेल्या स्नायूंना बळकटी येते, इतर स्नायूंचे कार्य राखले जाते आणि रक्ताभिसरणसुद्धा व्यवस्थित होते. पक्षाघात झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच फिजिओथेरपी सुरू केली पाहिजे. रुग्णाला जर काहीच हालचाल करता येत नसेल तर फिजिओथेरपिस्ट किंवा नातेवाईकांच्या साह्य़ाने पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय फिजिओथेरपीने स्नायूंची हालचाल दररोज केली पाहिजे. रुग्ण जसा बरा होतो तसा स्वावलंबी होतो आणि स्वत:च हे व्यायाम प्रकार करू शकतो त्याला अ‍ॅक्टिव्ह किंवा सक्रिय फिजिओथेरपी म्हणतात.

व्यावसायिक उपचार पद्धती –

ही उपचार पद्धती रुग्णांना त्यांच्या दैनंदिन आणि व्यावसायिक गरजेनुसार पुन्हा कार्यरत होण्यासाठी साहाय्यभूत ठरते.

इतर उपचार पद्धती-

* पक्षाघाताच्या रुग्णांना मनोधैर्य खचल्यामुळे नैराश्य येते. अशा रुग्णांना वरील उपचार पद्धतींबरोबर मानसिक आधाराची आणि मानसोपचारतज्ज्ञांचीही गरज भासू शकते.

* पक्षाघाताच्या रुग्णामध्ये शरीराच्या दाबाने, पाठीवर किंवा पायावर जखम होऊ शकते (प्रेशर सोर). हे टाळण्यासाठी दर एक तासाने कुशी बदलणे गरजेचे आहे. अशा रुग्णांची झोपण्याची स्थितीसुद्धा दुष्परिणाम टाळण्यासाठी महत्त्वाची असते.

* पक्षाघातांच्या रुग्णांचा आहार प्रथिनेयुक्त, चरबीविरहित आणि जीवनसत्त्वयुक्त असावा.

First Published on June 25, 2019 4:53 am

Web Title: paralysis treatment and side effects zws 70