सुहास जोशी

मुंबईत अनेक ठिकाणी देशातील एखाद्या विशिष्ट प्रांताचे प्रतििबब उमटलेले दिसते. धारावीत ९० फूट रस्त्यावर आणि मांटुग्यात दाक्षिणात्य खाद्यपदार्थाची रेलचेल असते. तर गुरुनानक नगरला पंजाबी पदार्थाचा आस्वाद घेता येतो. चेंबूरला असाच एक भाग आहे तो म्हणजे चेंबूर कॅम्प. निर्वासितांसाठी येथे सुरुवातीच्या काळात बराकी बांधण्यात आल्या. त्यामुळे हा सारा भाग चेंबूर कॅम्प म्हणून ओळखला जातो. मध्यंतरी हा भाग बराच कुप्रसिद्ध होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. इथे अनेक छोटय़ा मोठय़ा हॉटेल्समध्ये अस्सल सिंधी आणि पंजाबी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो. पराठा, डाळ पक्वानपासून भरपूर मिठाया मिळतात. सायंकाळी मांसाहारींचीदेखील चांगलीच चंगळ असते.

पराठा हा त्यापैकीच एक आवर्जून खावा असा पदार्थ. चांगल्या जाडजूड अशा या पराठय़ांचे किमान १५ प्रकार तरी इथे मिळतात. पण हॉटेलमधला पराठा डोळ्यांसमोर ठेवून जर ऑर्डर दिलीत तर नक्कीच फसाल. कारण प्रत्येक पराठय़ात व्यवस्थित मिश्रण भरलेले असते आणि तो चांगलाच जाडजूडही असतो. एक पराठा आणि सोबत थोडे छोले खाल्ले की पोट पॅक. वर चांगली जाडजूड साय घातलेले स्टीलचा मोठा पेला भरून घट्ट ताक. एवढे झाल्यावर खरे तर झोपच काढावी लागेल.

पराठय़ांबरोबरच दुसरा लोकप्रिय पदार्थ म्हणजे छोले पॅटिस. इथले पॅटिस इतके लोकप्रिय आहेत की किमान १०० पॅटिस तरी एकावेळी तयार असतात. ऑर्डरप्रमाणे तव्यावर परतून छोल्यांसोबत दिले जातात.