काळजी उतारवयातली डॉ. नीलम रेडकर

कंपवात (पार्किन्सन) हा चेतासंस्थेचा विकार आहे. हा आजार बहुधा ५० ते ७० या वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. तर ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये हा आजार मुख्यत: जनुकांमधील दोषामुळे दिसून येतो. भारतात कंपवाताच्या रुग्णांचे प्रमाण लाखात ३००-४०० इतके आहे.

मेंदूतील सबस्टॅन्शिया नीग्रा या भागातील पेशी शरीरात डोपामाइन नावाचे रसायन तयार करतात. डोपामाइन शरीरातील संवेदना एका पेशीपासून दुसऱ्या पेशींमध्ये पोहोचवण्याचे कार्य करते. कंपवातात या पेशी  हळूहळू नष्ट होतात आणि डोपामाइनचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम हळूहळू शरीरातील हालचालींवर होतो. परंतु मेंदूच्या या भागातील पेशी कुठल्या कारणांमुळे नष्ट होतात हे अजून समजलेले नाही.

कारणे

घातक कीटकनाशके आणि तणनाशकाचा संपर्क.

आनुवांशिकता – १५ टक्के रुग्णांमध्ये आनुवांशिकतेमुळे हा आजार होतो.

पूर्वी मेंदूला लागलेला मार.

शरीरातील लेडचे (शिसे) प्रमाण वाढल्यास या आजाराची शक्यता वाढते.

लक्षणे

हातांना कंप सुटणे, परंतु झोपेत कंप कमी होतो.

स्नायू घट्ट आणि ताठ होऊन वेदना होणे. शरीराच्या हालचालीस विलंब होणे. अंग जड होते. कुशीवर वळताना त्रास होतो.

चेहऱ्यावरील स्नायू ताठरल्यामुळे, चेहरा भावनाहीन होतो आणि मुखवटय़ाप्रमाणे भासतो.

स्वरयंत्रांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्यामुळे आवाजावर परिणाम होतो.

लिहिताना स्नायूंच्या ताठरतेमुळे त्रास होतो. तसेच गिळताना आणि खाताना त्रास होतो.

कंपवाताने ग्रस्त रुग्णांच्या चालण्याची पद्धत विशिष्ट असते. चालताना हाताची होणारी हालचाल बंद होते. पटापट चालता येत नाही. पावले जवळ पडतात. चालताना पोक येतो. हे रुग्ण चालताना पुढे वाकून चालतात. तसेच त्यांचा तोलही जातो.

कंपवातांच्या रुग्णांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाणही जास्त आढळून येते. निराश किंवा दु:खी वाटणे, स्मृतिभ्रंश होणे, हीसुद्धा लक्षणे दिसू शकतात.

उपचारपद्धती

या आजारात मेंदूतील ‘डोपामाइन’ रसायनाचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे दिली जातात. लिवोडोपा हे मुख्य औषध आहे. लिवोडोपाचे रूपांतर शरीरात गेल्यावर डोपामाइनमध्ये होते आणि शरीरातील स्नायूंचा ताठरपणा कमी करण्याचे आणि हालचाल वाढवण्याचे काम करते. परंतु जसजसा आजार बळावतो तो या औषधांनाही दाद देत नाही.

या आजारावर उपलब्ध असलेली औषधे तितकी प्रभावी नाहीत आणि यांचा परिणाम दीर्घस्वरूपी नाही.

इतर उपचारपद्धतींमध्ये ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ आणि शस्त्रक्रिया आहेत. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’मध्ये मेंदूमध्ये इलेक्ट्रोड बसवून कंपवातामुळे ज्या अनावश्यक हालचाली होतात, त्यावर नियंत्रण मिळवतात. तसेच मेंदूवरील शस्त्रक्रियेत मेंदूचा जो भाग कंपवाताच्या लक्षणासाठी कारणीभूत ठरतो, तो निष्क्रिय केला जातो. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’मुळे ७० टक्के रुग्णांमध्ये हातातील कंपाचे प्रमाण कमी होते असे आढळून आले आहे आणि पुढील दहा वर्षांत या शस्त्रक्रियेमुळे ५० टक्के रुग्ण कंपविरहित राहू शकतात.