सुहास जोशी

गेल्या काही वर्षांत धारावी हे मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. तसे एरव्ही मुंबई दर्शन करणारे लोक या ठिकाणी फारसे फिरकत नाहीत. पण याच धारावीत ९० फूट रोड नावाचा एक रस्ता आहे. हल्ली तो ९० फूट नसतो हा भाग वेगळा. पण तिथे तमिळ खाद्यसंस्कृतीतले अनेक पदार्थ मिळतात. त्यासाठी मुंबई दर्शनमध्ये एखादी चक्कर टाकायला हरकत नाही. तसा हा भाग जरा मिश्र वस्तीचा आहे.

परोटा सालना, कुत्तू परोटा, अंडा फ्राय हे येथील भन्नाट प्रकार. हा परोटा म्हणजे पंजाबी लच्छा पराठय़ाचे छोटे आणि चौकोनी रूप. तीन-चार पापुद्रे सुटलेल्या परोटय़ासोबत भरपूर खोबरं घातलेले पातळसर सालन. काही वेळ या परोटय़ाचे तुकडे करून त्यावर सालन ओतून खाल्ले जाते. परोटा-सालना तसा काही ठिकाणी मिळतोच, पण कुत्तू परोटा खास ९० फूट रोडवर. अशा तीन-चार परोटय़ांचे तव्यावरच बारीक तुकडे केले जातात. कढीपत्त्याची सणसणीत फोडणी करून त्यावर हे तुकडे, त्यात चिकन आणि अंडे एकत्र करून मग ते मिश्रण थोडा वेळ शिजू दिले जाते. एक प्लेट कुत्तू परोटा खाल्ला की पोट तुंडुंब भरायची खात्री असते. कुत्तू परोटा होईपर्यंत एक अंडा हाफ फ्राय खायला हरकत नाही. अजिबात पसरू न दिलेले हाफ फ्राय केळीच्या पानावर दिले जाते. त्यात मीठ, चाट मसाला आपल्या आवडीने टाकून घ्यायचा.