News Flash

पीसीओएस

आजच्या काळात आपली आधुनिक जीवनशैलीतील व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, धूम्रपान या कारणास्तव हा आजार वाढतोय

आजारांचे कुतूहल  : डॉ. अविनाश भोंडवे

पीसीओएस म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम’ किंवा ‘पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज’ (पीसीओडी). या शब्दाचा अर्थ पाहिल्यास, पॉली म्हणजे अनेक, सिस्टीक म्हणजे गाठी, ओव्हॅरियन- स्त्री बीजांडकोषाचा आजार. या आजारात बीजांडकोषात अनेक गाठी निर्माण होऊन हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो आणि शरीरातील अनेक क्रियांवर त्याचा परिणाम होतो. आजच्या वेगवान, पण बैठय़ा जीवनशैलीमधील बदलांमुळे या आजाराचा सामना करावा लागणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमालीचे वाढत चालले आहे.

पीसीओडी होण्यामागील खरे शास्त्रीय कारण अजूनही तंतोतंत ध्यानात आलेले नाही.आजच्या काळात आपली आधुनिक जीवनशैलीतील व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, धूम्रपान या कारणास्तव हा आजार वाढतोय असे जागतिक स्तरावर झालेली निरनिराळी संशोधने, सव्‍‌र्हेक्षण आणि चाचण्यांमध्ये दिसून आले आहे.

 • लक्षणे
 • मासिक पाळी अनियमित येणे
 • चेहरा, हात, पाय, पोट, छाती अशा स्त्रियांमध्ये अनपेक्षित असलेल्या जागांवर केसांची वाढ होते.
 • चेहऱ्यावर आणि पाठीवर बारीक फोड येणे, तारुण्यपीटिका
 • स्थूलत्व- कंबर, नितंब यांवर चरबीचे थर वाढणे
 • वंध्यत्व
 • न्यूनगंडाची भावना

निदान

 • सोनोग्राफी – बीजांडकोषाच्या रचनेत निर्माण झालेला दोष यामध्ये लक्षात येतो. बीजांडकोषातील द्रवाने भरलेल्या गाठी (सिस्ट्स) आणि त्यात अडकलेली स्त्रीबीजे यांचे चित्र आपल्याला मिळते आणि पीसीओडीचे निदान होऊ शकते.
 • संप्रेरके (हार्मोन्स) – स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोन्सची पातळी तपासल्यावर पीसीओएसचे निदान पक्के होते. यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स (एफ.एस.एच.), ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स(एल.एच.), टेस्टॉस्टेरॉन, डीहायड्रोएपिअँड्रोस्टेरॉनचे (डी.एच.ए.एस) थायरॉइड या संप्रेरकांची रक्तातील पातळी तपासली जाते.
 • रक्तशर्करा- रक्तातील साखरेची पातळीही तपासली जाते.

दुष्परिणाम

 • संप्रेरकांचा असमतोल – दर महिन्याला स्त्रीच्या बीजांडकोषातून पक्व होऊन बाहेर पडणारी स्त्रीबीजे अनियमितपणे बाहेर पडतात. परिणामी पाळी अनियमित येते आणि वंधत्व येण्याची शक्यता असते.
 • मोठे आजार- पीसीओडी असल्यास मधुमेह होण्याची शक्यता ५ ते १० पटींनी, उच्च रक्तदाबाची शक्यता चौपटीने आणि कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराची शक्यता दुपटीने वाढते.
 • गर्भाशयाचा कर्करोग (एंडोमेट्रीयल कॅन्सर) होण्याची शक्यता असते.

वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा?

मासिक पाळी अनियमित असेल, शरीरावर अनावश्यक आणि अनपेक्षित ठिकाणी केसांची वाढ होत असेल, स्थूलत्व असून प्रयत्नांनी वजन कमी होत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून घ्याव्यात. स्थूलता नसलेल्या मुलींनाही पीसीओडी असू शकतो.

प्रतिबंध

पीसीओडी होऊ  नये किंवा असल्यास त्याचे विपरीत परिणाम टाळायला जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असते.

 • नियमित व्यायाम – आठवडय़ातून किमान पाच वेळा साधारणपणे दररोज ४५ ते ६० मिनिटे भरभर चालणे, जॉगिंग, पळणे, पोहोणे, दोरीवरील उडय़ा, मैदानी खेळ असे एरोबिक व्यायाम करावा.
 • योग्य आहार -साखरेचे प्रमाण कमी असलेले खाद्यपदार्थ खावेत. यासाठी ज्वारी, बाजरी, हिरव्या पालेभाज्या खाव्यात. मिठाई, शीतपेये, चॉकलेट, केक, फास्टफूड टाळावे. भरपूर जेवण्याऐवजी दिवसातून ४ ते ५ वेळा थोडे थोडे खावे. सकाळच्या वेळत भरपूर नाश्ता करावा, दुपारी आणि संध्याकाळी थोडी न्याहारी आणि अगदी एखादी चपाती किंवा अर्धी भाकरी खावी. जेवणामध्ये ५० टक्के पदार्थ सलाड, कडधान्ये, फळे, भाज्यांचा समावेश असावा.

उपचार

याकरिता मेटफॉर्मिनसारखी काही औषधे, इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या, वजन कमी करणे, स्त्रीबीजांना मुक्त करणारी (ओव्ह्युलेशन इंडक्शन) औषधे आणि क्वचित प्रसंगी ओव्हेरियन ड्रिलिंग, वेज रीसेक्शन अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. अनेक तरुण मुलींना मानसिक समुपदेशनाची आवश्यकता भासते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:23 am

Web Title: pcos irregular periods excess androgen blood sugar
Next Stories
1 ब्रोकोली उसळ
2 शैलीदार, उठावदार सेल्टोस
3 व्हिंटेज वॉर : अशीही बीएमडब्ल्यू
Just Now!
X