राजेंद्र भट

गच्चीतील वाफ्यात किंवा मोठय़ा कुंडय़ांमध्ये तीन वर्षांतून एकदा तरी तेलबियांची लागवड केल्यास माती समृद्ध होते. अशा पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक म्हणजे शेंगदाणा. शेंगदाण्याची लागवड आपण पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात करू शकतो. याच्या मुळांवर असलेल्या नत्राच्या गाठींमधील नत्र मातीत स्थिर होऊन माती समृद्ध होते. या झाडाचा पालासुद्धा माती समृद्ध होण्यासाठी उपयुक्त ठरतो.

खाण्यासाठी आणि तेलासाठी वापरले जाणारे शेंगदाणे वेगवेगळे असतात. वाढीनुसार त्याचे तीन प्रकार असतात. उपटय़ा, निमपसऱ्या आणि पसऱ्या. उपटय़ा प्रकारातील शेंगदाण्यांची वाढ ९० ते ११० दिवसांत होते. निमपसऱ्या प्रकारचे शेंगदाणे १२० ते १२५ दिवसांत, तर पसऱ्या प्रकारचे शेंगदाणे १२० ते १४५ दिवसांत वाढतात. आपण आपल्या कुंडीत उपटय़ा प्रकारचे शेंगदाणे लावावेत.

शक्यतो भुईमुगाच्या ताज्या शेंगांमधून शेंगदाणे काढून ते लावावेत. दाण्याची साल निघाली किंवा फाटली असेल, तर झाड उगवत नाही. वाफ्यात लावताना दोन दाण्यांत साधारण ६ इंच अंतर ठेवावे. बी उगवल्यापासून ३०-३५ दिवसांत पानांच्या बेचक्यात छोटी पिवळी फुले दिसतात. तिथून बाहेर येणाऱ्या मुळीला अरी म्हणतात. ही अरी जेव्हा मातीत जाते, तेव्हा तिच्या टोकाला भुईमुगाची शेंग लागते. अरीला जोर कमी असला, ती हवेत राहिली तर वाळून जाते. हे टाळण्यासाठी झाड जमिनीवर पसरवून त्यात मातीची भर घालतात. त्यामुळे अऱ्या नीट जमिनीत जातात. उपटय़ा जातीचा शेंगदाणा ९० दिवसांत तयार होतो. शेंगा तयार झाल्या की झाडाची पाने पिकून पिवळी पडतात. त्यानंतर एखादे झाड उपटून बाहेर काढावे. ते मुळांवरील शेंगांसहित बाहेर येते. या शेंगा तोडून घेऊन झाड पुन्हा मातीने आच्छादून टाकावे. त्यामुळे मातीची प्रत सुधारते. शेंगदाण्यांवरील महत्त्वाची कीड म्हणजे पाने खाणारी काळी अळी. ती चिमटय़ाने काढून नष्ट करावी. बुरशीजन्य रोगांमुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्यावर बुरशीनाशक फवारावे.