कर्करोग हे नाव ऐकलं तरी धडकी भरते, अशीच आपल्यातील अनेकांची अवस्था असते. चित्रपटसृष्टीत आधी इरफान खान आणि आता सोनाली बेंद्रे हिने आपल्याला कर्करोग असल्याची माहिती समाजमाध्यमांवरून चाहत्यांना कळवली आणि सगळेच हळहळले. सोनालीने तिला ‘हाय ग्रेड’ कर्करोग झाला असल्याचे सांगितले आणि आपल्याला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करण्याविषयीही नमूद केलेय. आताआतापर्यंत कर्करोग म्हणजे असाध्य आणि म्हणूनच जाहीर न करण्याचा आजार अशी मानसिकता होती. मात्र इरफान, सोनालीसारख्या सेलेबेट्रींनी स्वत:हून जाहीर करीत, वेळोवेळी पत्र, छायाचित्र यांद्वारे कर्करोगावर मात करण्याचे प्रयत्न चाहत्यांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचेही आहे आणि कौतुकास्पदही!

सोनाली बेंद्रेने आपल्या आजाराची घोषणा केली आणि सगळ्यांचंच लक्ष वेधलं ते त्यातल्या ‘हाय ग्रेड’ या शब्दाने. आपल्यापैकी अनेकांनी त्यानंतर हाय ग्रेड कर्करोग म्हणजे काय हे शोधण्यासाठी इंटरनेटची मदतही घेतली असेल. सर्वसामान्यांना कळेल अशा साध्या-सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर वेगाने पसरण्याची क्षमता असलेल्या पेशी ज्या कर्करोगामध्ये असतात, तो कर्करोग हाय ग्रेड. सोनाली बेंद्रेला कोणत्या अवयवाचा आजार झालाय हे कळू शकलेलं नाही मात्र हाय ग्रेड कर्करोगामध्ये वेगाने पसरण्याची क्षमता असते आणि त्यावर लवकरात लवकर प्रभावी उपचार करणं आवश्यक आहे हे नक्की. यानिमित्ताने एकंदरच कर्करोग या आजाराबद्दल आपण जाणून घेऊ या.

मानवी शरीर अनेक पेशींपासून तयार झालेलं असतं. एखाद्या अवयवातली एखादी पेशी निकामी झाली तर त्या परिस्थितीला कर्करोग झाला असं म्हटलं जातं. ही पेशी कोणत्या अवयवातली आहे यावर तो कर्करोग कोणत्या अवयवाचा आहे हे ठरतं. पेशी निकामी होण्याचा वेग प्रचंड असतो आणि मुख्य म्हणजे त्यावर आपल्या शरीराचं कुठलंही नियंत्रण नसतं. त्यामुळे लवकरात लवकर निदान झालं तर त्यावर योग्य वेळी उपचार करून तो बरा करता येतो. काही ठरावीक अवयवांचा कर्करोग वगळता हा आजार होण्याचं नेमकं कारण शोधून काढण्यात वैद्यकशास्त्राला अजून तरी यश आलेलं नाही. त्यामुळे अर्थातच कर्करोगप्रतिबंधक उपाय नाहीत. पण कर्करोग बरा करण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार आता उपलब्ध आहेत, ते सामान्य लोकांना परवडणारे आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातून लवकर निदान झालेले कर्करोगाचे ९० टक्के रुग्ण पूर्ण बरे होतात.

शरीरातल्या एखाद्या अवयवात पेशी निकामी होण्याची प्रक्रिया सुरूहोते. निकामी होत चाललेल्या पेशींचा साठा व्हायला सुरुवात होते आणि त्यातून गाठ किंवा टय़ूमर तयार होतो. असा टय़ूमर ही कर्करोगाची पहिली खूण असते. अर्थात प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते. पण गाठ तयार झाली असेल तर तिची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कर्करोगाची गाठ तयार झाल्यावर ती किती भागात पसरली आहे आणि तिचे दृश्य परिणाम किती भागात आहेत यावर कर्करोगाची स्टेज ठरते. अनेकदा या आजाराचं अस्तित्व एकाच अवयवापुरतं मर्यादित असतं, अवयवानुसार गाठीचा आकार लक्षात घेऊन त्याला पहिली किंवा दुसरी पातळी (स्टेज) असं म्हणतात.

ज्या अवयवामध्ये कर्करोग सुरू झालाय त्याच्या जवळपासच तो पसरला असेल तर त्याला तिसरी पातळी म्हटले जाते. पण कर्करोगाची सुरुवात झालेल्या अवयवाच्या जवळपास नसलेल्या, थेट संबंधही नसलेल्या अवयवात कर्करोग पोहोचला असेल तर त्याला चौथी पातळी म्हटलं जातं. लवकर निदान झालेल्या आजारामध्ये लोकलथेरपी म्हणजे शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकणे, रेडिएशनद्वारे संबंधित भागातील पेशी नष्ट करणे आणि आवश्यक तिथे केमोथेरपीचे उपचार पुरेसे ठरतात. त्यापेक्षा वाढ दिसत असेल तर इंजेक्शन्स, औषधं असे अधिकचे उपचारही घ्यावे लागतात. एकूणच आजार किती पसरलाय किंवा किती पसरायची शक्यता आहे यावर रुग्णाला कुठले उपचार द्यायचे हे ठरवलं जातं. रक्ताचा कर्करोग असेल तर मात्र ही मोकळीक नसते कारण तो संपूर्ण रक्तात पसरलेला असतो. त्यामुळे त्याबाबत स्टेज हे परिमाण लावता येत नाही. फार फार तर त्याचा तो वेगानं वाढणारा आहे की संथगतीने पसरणारा आहे हा एक निकष लावणं शक्य आहे. त्यामुळे रक्ताच्या कर्करोगावार उपचार म्हणून अ‍ॅग्रेसिव्ह प्रकारात मोडणारी हाय डोस केमोथेरपीच द्यावी लागते. त्याचे दुष्परिणामही आहेत. मात्र सध्या यापेक्षा दुसरा प्रभावी उपचार नाही.

कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये अनेक बदल होतायेत. रेडिएशन जास्तीत जास्त अचूक देणं शक्य झालंय. केमोथेरपीचे होणारे दुष्पपरिणाम कमी व्हावेत म्हणून समांतर उपचार आहेत. जेनेटिक उपचार, इम्युनोथेरपी यांच्यामुळे कर्करोगावर उपचार करणं सोपंही झालंय आणि रुग्णांसाठी ते सुसह्यसुद्धा झालं आहे.  – डॉ. सचिन हिंगमिरे, कर्करोग उपचारतज्ज्ञ

महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचा विचार करता स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग सामान्यपणे आढळणारे आहेत. गर्भाशयमुखाचा कर्करोग हाही महिलांमध्ये सहजपणे आढळणारा कर्करोग आहे, पण त्याचं कारण स्वच्छता आहे. त्याबाबत पुरेशी जनजागृती झाल्यामुळे आता हा आजार आटोक्यात आला आहे. वेळेवर निदान झालं आणि उपचार केले तर ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये कर्करोग हा पूर्ण बरा होतो हे लक्षात ठेवायला हवं.

कर्करोगाबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्याचे उपचार कसे केले जातात याबद्दल पुरेशी माहिती नसतानाच निव्वळ भीतीपोटी उपचार घेणं लोक टाळतात. उपचारांच्या दुष्परिणामांना घाबरून ते मध्येच सोडून दिले जातात. हे टाळलं तर आपल्याकडे ही कर्करोग उपचारांचा ‘सक्सेस रेट’ वाढू शकतो!

(शब्दांकन – भक्ती बिसुरे)