18 October 2019

News Flash

कंदपिकांची लागवड

सर्व कंदांत मोठा वाढणारा कंद म्हणजे सुरण. कंदावर कोंब आलेल्या तुकडय़ापासून सुरणाची लागवड करतात.

शहरशेती : राजेंद्र भट

सुरण

सर्व कंदांत मोठा वाढणारा कंद म्हणजे सुरण. कंदावर कोंब आलेल्या तुकडय़ापासून सुरणाची लागवड करतात. सुरणासाठी माती पोकळ असणे आवश्यक असते. सुरणाच्या झाडाची वाढ दिवाळी ते संक्रांतीच्या दरम्यान पूर्ण होते आणि त्यानंतर झाड मरते. झाड आडवे पडल्यानंतर कंद खोदून काढतात. आपण लावलेल्या कंदाच्या तीन ते पाच पट वजन वाढते. काढलेला कंद उलटा करून सावलीत पण हवेशीर जागी ठेवल्यास त्याला कोंब येण्याची प्रक्रिया हळूहळू होते. सुरणाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.

आले

कंदपिकांमध्ये सर्वात नाजूक पण ठेवू तितका काळ राहणारा कंद म्हणजे आले. हा कर्दळीसारखा सतत वाढतो. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. सातारा आले आणि बंगळूरु आले. सातारा आले गाठीगाठींचे असते. त्याचा उपयोग औषधात आणि सुंठ तयार करण्यासाठी होतो. बंगळूरु आले मोठे, गुळगुळीत आणि जास्त रस असणारे असते. याला बुरशीजन्य रोगांचा त्रास जास्त होतो. बीजसंस्कार करून योग्य वेळी लावल्यास या समस्या उद्भवत नाहीत. आपल्याला पाहिजे तेवढा तुकडा कंदातून काढून घेऊन बाकी झाड ठेवता येते. याची लागवड कंदापासून करतात.

First Published on October 4, 2019 3:14 am

Web Title: plantation tubers akp 94