ऋषिकेश बामणे

खेळाडूंनी दुखापत अथवा तंदुरुस्तीमुळे एखाद्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र काही क्रीडापटू असेही आहेत, ज्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली किंवा निवृत्ती पत्करली. अशाच काही क्रीडापटूंच्या मानसिक व्यथेचा घेतलेला हा आढावा.

बोयॉ बोर्ग (टेनिसपटू)

स्वीडनचा नामांकित टेनिसपटू बोयॉ बोर्गने एकावेळी वैयक्तिक आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १५ ग्रँडस्लॅम विजेत्या बोर्गने १९८३मध्ये वयाच्या २७ व्या वर्षीच निवृत्ती पत्करली. त्याला उत्तेजक प्रतिबंधकांचे सेवन करण्याची सवय होती, असेही त्यावेळी उघडकीस आले होते. मात्र यामधून यशस्वीपणे त्याने स्वत:ला सावरले.

ग्लेन मॅक्सवेल (क्रिकेटपटू)

मानसिक आरोग्याशी निगडित समस्या जाणवणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील सर्वात ताजे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर मॅक्सवेलने तातडीने विश्रांती घेण्याचे ठरवल्याने क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली. सततच्या सामन्यांमुळे स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरही लक्ष केंद्रित करणे अशक्य झाल्याचे कारण मॅक्सवेलने सांगितले. त्याशिवाय गेल्या दोन आठवडय़ांमध्ये ऑस्ट्रेलियाच्याच विल पुस्कोव्हस्की आणि निक मॅडिन्सन यांनीसुद्धा मानसिक समस्येमुळे क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मायकल फ्लेप्स (जलतरणपटू)

अमेरिकेचा तब्बल २३ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जलतरणपटू मायकल फ्लेप्सला काही वर्षांपूर्वी मानसिक समस्यांनी भेडसावले होते. २०१२मध्ये कारकीर्दीतून निवृत्ती पत्करणाऱ्या फ्लेप्सला त्यावेळी इतके नैराश्य आले होते की त्याची जगण्याची इच्छाच संपलेली. त्यावेळी एका बंद खोलीतच तो पाच-सहा दिवस राहात असे. परंतु काही काळाने त्याने जवळच्या व्यक्तींशी याबाबत संवाद साधण्यास सुरुवात केल्यामुळे त्याची प्रकृती सुधारली व २०१४ मध्ये त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केले.

हे खेळाडूही मानसिक समस्येमुळे नैराश्यात

भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट, ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट यांसारखे अन्य क्रिकेटपटूही कारकीर्दीत मानसिक समस्यांना सामोरे गेले आहेत. २०१३ मध्ये प्रवीणने एका स्थानिक स्पर्धेतील सामन्यादरम्यानच पंचांशी हुज्जत घातली होती. त्याशिवाय त्याची वागणूकही त्यादरम्यान अनाकलनीय झाली होती. तर टेटने २००७-०८ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तणाव आल्यामुळे माघार घेतली होती.

मार्कस ट्रेस्कोथिक (क्रिकेटपटू)

२००६मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघातील प्रमुख फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिकने दौऱ्याच्या मध्यातूनच मायदेशी रवाना होऊन थेट निवृत्तीच जाहीर केली. मानसिक समस्यांनी भेडसावल्यामुळे क्रिकेटवर लक्ष केंद्रित न करू शकल्याचे कारण ट्रेस्कोथिकने दिले होते. त्याशिवाय नैराश्यानेही ७६ कसोटी सामने खेळलेल्या ट्रेस्कोथिकवर दडपण आणले होते. मात्र यावर सरशी साधून त्याने २००७-०८ मध्ये पुन्हा स्थानिक क्रिकेटला पुनरागमन केले आणि नुकतीच २०१९मध्ये निवृत्ती पत्करली.