उरलेले सुट्टे पैसे स्वत:जवळ ठेवता येतात म्हणून आईची सर्व कामे ऐकणारी राधा किंवा पाहुण्यांनी हातात टेकवलेल्या पैशांना ‘नाही.. नाही’ म्हणत मनात या पैशांनी कोणता खाऊ घ्यायचा याचा हिशोब करणारा खटय़ाळ राजू आपल्या प्रत्येकात असतो. हे असे पैशांचे महत्त्व मुलांना लहान वयातच समजलेले असते. पण मोठे झाल्यानंतरही प्रत्येक विद्यार्थ्यांला पाकिटात पुरेसा ‘मनी’ असावा असे वाटते!

दोन महिने ‘पॉकेटमनी’ बंद

आईकडून दर महिन्याला काहीसे पैसे खर्चाला मिळायचे. सुरुवातीला या पैशांचे व्यवस्थित नियोजन केले. खाण्यासाठी काहीसे पैसे बाजूला काढले. त्यातही फिरण्यासाठी, एखाद्या सिनेमासाठी पैशांचा हिशोब ठरलेला होता. पण पुढे खाणे-पिणे, फिरणे काहीसे वाढलेच आणि महिन्याला मिळणारा पैसा अपुरा पडू लागला. एकदा तर पंधरा दिवसांवरच पैशांनी ‘पर्स’चा तळ गाठला होता. फिरायला तर जायचेच होते. पण पैसे नाहीत. पॉकेटमनी वगळून वर पैसे मागायचे म्हणजे आईबाबांचा ओरडा खावा लागणार होता. तरीही धीर एकवटून आईने कमी पैसे दिल्याची थाप बाबांजवळ मारली आणि पैसे मिळवले. मात्र घरी आल्यावर खोटेपणा उघड झालाच आणि त्याची शिक्षा म्हणून दोन महिन्यांचा ‘पॉकेटमनी’ मिळाला नाही. तेव्हापासून पैशांचे योग्य नियोजन सुरू झाले.   – दुर्वा महाजन

खर्च आवरेना

महिन्याकाठी एक विशिष्ट रक्कम मुलांच्या हातावर ठेवली की हिशोबाला बरे म्हणून आईबाबांचीही ‘पॉकेटमनी’ला ना नसते, तरीही महाविद्यालयाची पायरी चढली की खर्चाचे आकडे वाढू लागतात. त्याची कारणंही तशी असतात. मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणं, खाणंपिणं, कपडेलत्यांबाबत थोडीशी चंगळ वाढते.

‘ट्रेक’साठी बचत

महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण-तरुणींना पॉकटेमनीविषयी उत्सुकता असते. शिक्षणासाठी कुटुंबीयांपासून लांब राहत असल्याने या पॉकेटमनीचे माझ्यासाठी विशेष महत्त्व आहे. हा पॉकेटमनी महिन्याच्या शेवटी पुरवून वापरणे माझ्यासाठी महत्त्वाचे असते. यातही मी माझ्या हौसेसाठी पॉकेटमनीतील पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते. मला ट्रेकला जायला खूप आवडते. मित्रमैत्रिणींबरोबर महिन्यातून एक तरी ट्रेक होत असतो. त्यामुळे ट्रेकला जाताना लागणारे साहित्य जमवण्यासाठी मी पॉकेटमनीतील काही पैसे राखून ठेवते. गेल्या अनेक वर्षांपासून मी हे सातत्याने करत आहे.   – मृणाल गोसावी  

पॉकेटमनी मिळाला नाही..

शहरात फिरण्यासाठी लहानपणी मला बसचे मासिक तिकीट काढून दिले जायचे. त्यामुळे महाविद्यालयात जाण्यासाठी किंवा मित्रमैत्रिणींबरोबर भटकंती करण्यासाठी कधीच पैशांची गरज भासत नसे. खाण्या-पिण्यासाठी जे काही पैसे लागत ते गरजेनुसार आई मला देई. माझ्या मित्र-मैत्रिणींना मात्र महिन्याला खर्चासाठी पैसे मिळत होते. त्यामुळे त्यांच्या पैशाच्या नियोजनानुसार आमचे बेत ठरत. त्यांची पैसे वाचवायला चाललेली धडपड पाहून मला भलतेच अप्रूप वाटायचे. मला असे महिन्याला पैसे मिळाले तर मी काय करेन असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. मग कधी तरी आई-बाबांकडे ‘पॉकेटमनी’साठी मीसुद्धा हट्ट करायचे. तेव्हा तुला जेव्हा पैसे लागतील तेव्हा देतो असे सांगून असे पैसे मिळणे कसे फायदेशीर आहे हे ते मला समजावून सांगत. पण ‘पॉकेटमनी’चे वेड मला नेहमीच होते. कदाचित मला महिन्याला पैसे मिळाले असते तर मी खाण्या-पिण्याची चांगलीच चंगळ केली असती. पण ते कधी मिळाले नाहीत..     -अंकिता नाईक

‘पॉकेटमनी’चा तो प्रयोग फसला

शाळेतून महाविद्यालयात जाताच ‘पॉकेटमनी’ ही संकल्पना राबविण्याचा मी आणि आई-बाबांनी एकमताने निर्णय घेतला. माझा महाविद्यालयाचा प्रवास तसा खर्चीक नव्हताच. मात्र महाविद्यालयात जाणार म्हणजे आता मोठा झालो म्हणून आई-बाबांनीही थोडी मोठीच रक्कम देण्याचे ठरविले. प्रवासाचा खर्च सोडला तर बरेच पैसे हातात उरत. त्यामुळे मग खाण्यापिण्याचे, फिरण्याचे बेतही जास्त आखले जात. हातात उरणाऱ्या रक्कमेमुळे माझे खर्च चांगलेच वाढले होते. हे आईबाबांच्या लक्षात येताच मी कोणत्या वाईट मार्गाला लागू नये, याची दखल म्हणून त्यांनी गरजेलाच हवे तितके पैसे द्यायचे ठरवले आणि आमचा ‘पॉकेटमनी’चा प्रयोग चांगलाच फसला.  -अमेय राणे

बचतीवरच रोख

मुलांना पॉकेटमनी दिल्यानंतर त्यांनी तो जपूनच वापरावा, असा आई-वडिलांचा रोख असतो. शालेय जीवनात पॉकेटमनीचा आवाका खूपच छोटा असतो. मात्र महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर तो वाढलेला असतो. पॉकेटमनीतील रकमेतून आवश्यक वस्तूंचीच खरेदी व्हावी यावर पालकांचा भर असतो.   – सायली रावराणे