27 May 2020

News Flash

क्रिकेटचे राजकारण

राजकीय हस्तक्षेपाचे सर्वाधिक प्रभावी उदाहरण म्हणजे झिम्बाब्वेवर घालण्यात आलेली क्रिकेटबंदी.

ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

क्रिकेट आणि राजकारण यांचे एक अतूट नाते आहे, याविषयी काही वेगळे सांगायला नको. नुकतीच पार पडलेली मुंबई क्रिकेट असोसिएशनची वार्षिक निवडणूकसुद्धा राजकीय हस्तक्षेप आणि घराणेशाहीचा उत्तम नमुना आहे. आजच्या सदरात अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा.

राजकीय हस्तक्षेपाचे सर्वाधिक प्रभावी उदाहरण म्हणजे झिम्बाब्वेवर घालण्यात आलेली क्रिकेटबंदी. क्रिकेटला राजकीय प्रवक्तांच्या हस्तक्षेपापासून दूर राखण्यात झिम्बाब्वेचे मंडळ अपयशी ठरल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. मुख्य म्हणजे अनेक खेळाडूंनी कोणतेही मानधन न स्वीकारता देशासाठी मोफत क्रिकेट खेळण्याची तयारी दर्शवली असतानाही ‘आयसीसी’ने त्यांची विनवणी धुडकावून लावली. त्यामुळे तूर्तास तरी झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंना स्थानिक स्पर्धामध्ये खेळण्यावाचून पर्याय उरलेला नाही. २००३च्या विश्वचषकातसुद्धा झिम्बाब्वेच्या काही खेळाडूंनी रॉबर्ट मुगाबे यांच्या शासनाच्या विरोधात क्रिकेट खेळण्यापासून नकार दर्शवला होता.

भारतातही क्रिकेटशी संबंधित संघटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप नेहमीच राहिला आहे. एवढेच नव्हे तर, घराणेशाहीदेखील नेहमीच दिसून येते.  नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतसुद्धा ही घराणेशाही दिसून आली. गतवर्षी उपाध्यक्षपदाची निवडणूक लढणारे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक, माजी महिला क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक यांचा भाऊ संजय नाईक, माजी सहसचिव पी. व्ही. शेट्टी यांचा भाचा गौरव पय्याडे आणि माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांचा जावई अजिंक्य नाईक यांनीही कार्यकारिणीत स्थान मिळवले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन त्यांची मुलगी रुपा गुरुनाथद्वारे तमिळनाडू क्रिकेट संघटना चालवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी एखाद्या राज्य क्रिकेट संघटनेची ती पहिली महिला अध्यक्ष झाली. निरंजन शाह यांचा मुलगा जयदेव सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचा सचिव आहे, अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचा प्रमुख आहे, तर तुरुंगात असलेल्या आशीर्वाद बेहेरा यांचा मुलगा संजय ओदिशा क्रिकेट संघटनेचा सचिव झाला आहे.

या खेळांमध्येही राजकीय हस्तक्षेपाचे पडसाद

क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांमध्येही घराणेशाही कार्यरत आहे. जनार्दनसिंह गेहलोत यांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची सत्ता २८ वष्रे अनुभवली; पण आपली हुकमत कशी सोडायची, यावर तोडगा म्हणून आपली डॉक्टर पत्नी मृदुल भदौरियाकडेच त्यांनी अध्यक्षपद देऊन २०१३ पासून सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या.

महाराष्ट्रातील अनेक क्रीडा संघटनांची सत्ता प्रामुख्याने शरद पवार यांच्याकडेच आहे. मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेसह राज्य खो-खो संघटनेच्या प्रशासनाला ते दिशा देतात. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावर त्यांची गेली अनेक वष्रे सत्ता आहे. त्यांचा पुतण्या अजित पवार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे सुधांशू मित्तल भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्षपद भूषवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:45 am

Web Title: politics cricket akp 94
Next Stories
1 घराणेशाही नको, चळवळीतला नेता हवा..
2 मुर्ग ए मखमल
3 ‘वैद्यकीय’मधील  सांस्कृतिक चळवळी
Just Now!
X